Cyclone Update Nashik: ‘निसर्ग’ धडकला; सप्तशृंग गडावर दरड कोसळी

गंगापूररोडला घरावर झाड कोसळले;रस्त्यात ठिकठिकाणी पाण्याचे डबके

गंगापूररोड येथील पंपींग स्टेशन परिसरात घरावर झाड कोसळून महिला जखमी झाली

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग वादळ नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास धडकले. निसर्ग वादळाने कसारा घाट ओलांडून इगतपुरी तालुक्यात प्रवेश केल्यानंतर नाशिकमधील पावसाचा जोर वाढून वारेही जोराने वाहू लागले. दरम्यान जिल्ह्यात काही भागामध्ये चक्रीवादळाआधीच आलेल्या जोरदार वार्‍यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. सप्तशृंग गडावर दरड कोसळली असून ती जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात येत आहे. तर गंगापूर रोड परिसरात घरावर झाड कोसळून एक महिला जखमी झाली.

सप्तशृंग गडावर कोसळलेली दरड जेसीबीच्या सहाय्याने हटवताना

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ नाशिक जिल्हा मार्गे मध्यप्रदेशात जाणार्‍या असल्याचा हवामान विभागाचा इशारा आल्यापासून जिल्हा प्रशासनाने आपत्ती निवारण कक्षामार्फत खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्याबरोबरच पत्र्याच्या घरांची दुरुस्ती करणे, जनावरे सुरक्षित स्थळी हलवणे आदी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या चक्रीवादळापूर्वीच जिल्ह्यात मंगळवारी (दि.२) रात्रीपासून रिमझिम स्वरुपात पडणार्‍या मॉन्सूनपूर्व पावसाने बुधवारी (दि.३) दुपारपासून जोर धरला.

संततधार कोसळणार्‍या या पावसामुळे गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन येथे एका झाडाची फांदी कोसळून दीक्षा कटारे जखमी झाल्या. सुनिता आंधळे यांनी त्यांच्यावर प्रथमोचार केले. नाशिकमधील रविवार पेठ येथील धोकादायक वाडा महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षातर्फे सुरक्षित उतरवून घेण्यात आला. दरम्यान दिंडोरी तालुक्यातील अंदरसूल येथे पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून गेल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्तश्रृंग गड येथे दरड कोसळल्याचीही माहिती हाती आली आहे. दरम्यान चक्रीवादळाने साडेचार वाजता नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर प्रवेश करताना नाशिक शहरात जोराचे वारे वाहू लागले. मात्र, पंधरा मिनिटानंतर पुन्हा वारा शांत होऊन पावसाचा जोरही ओसरला आहे.

शहरात बुधवारी (दि.३) दुपारी वादळी वार्‍यामुळे रविवार पेठेतील पंपाळे वाड्याचा काही भाग रस्त्यावर पडला. त्यानंतर खबरदारी म्हणून महापालिका कर्मचार्‍यांनी धोकादायक भाग काढून घेतला. यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.

येवल्यात वादळापूर्वीचा मोठा तडाखा; पोल्ट्री फार्मचे  सुमारे २५ लाखाचे नुकसान 

येवला तालुक्यात निसर्ग वादळ येण्यापुर्वीच धामणगाव शिव परीसरात पोल्ट्री  फार्म उडाल्याची घटना घडली आहे निसर्ग वादळामुळे वारे जोरात वाहू लागले आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तालुक्यासह शहरात  जोरदार पाऊस पडला
तालुक्यातील अंदरसुल,गोल्हेवाडी रोड परिसरात वादळाचे संकेत दिसण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील ५०० मीटर शिवारात झाडं पडल्याची घटना घडली ढगांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे  रिम झिम पावसाच्या सरी पडत आहे
बुधवारी दुपारी पूर्व भागात आलेल्या वादळ वाऱ्यात पत्रकार गजानन देशमुख  यांच्या पोल्ट्री फार्म वादळामुळे संपूर्णपणे  जमीनदोस्त झाल्यामुळे   सुमारे २१ ते २२ लाखाचे नुकसान झाले आहे यामध्ये  शेकडो पक्षी देखील मृत झाले आहे याबाबत पंचनामा पूर्ण झाल्याचे देशमुख यांनी सांगितले याबाबत त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे कांदाचाळीचे   देखील मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाने मदत करण्याची मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे