दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणार; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय

Mumbai
maharashtra government decision
मंत्रीमंडळ बैठकीतले निर्णय

राज्यात २०१८ च्या खरीप हंगामातील नैसर्गिक परिस्थितीमुळे १५१ तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी २ हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीच्या १५० कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत २ हजार कोटींनी तात्पुरती वाढ करून ती २ हजार १५० कोटी इतकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीबद्दल तातडीने मदत वाटप करण्यासाठी २ हजार कोटी इतका अतिरिक्त निधी आकस्मिक निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यानुसार आज निर्णय घेण्यात आला.

लाच प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीवेतन काढून घेण्याचा निर्णय

जालना येथे तत्कालीन तालुका भूमी अभिलेख निरीक्षक बाबुराव नानासाहेब आर्दड यांना लाच घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दोषी ठरविल्याने दोषी ठरविलेल्या दिनांकापासून त्यांचे संपूर्ण सेवानिवृत्तीवेतन काढून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला. उच्च न्यायालयाने श्री. आर्दड यांना २३ सप्टेंबर २०१५ च्या निर्णयानुसार दोषी ठरवून सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कर्मचाऱ्यावरील दोष सिद्ध झाल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेच्या समन्यायी तत्त्वानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

पशुआरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना

राज्याच्या दुर्गम, डोंगराळ, आदिवासीबहुल भागामधील पशुपालकांकडील पशुरुग्णांसाठी २०१८-१९ या वर्षापासून मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सूरु करण्यास तसेच या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८० तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्याच्या दुर्गम भागासह पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा असणाऱ्या तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात ८० तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या फिरत्या पशुचिकित्सा पथकासाठी विशेष तयार केलेली ८० वाहने आणि आवश्यक ती उपकरणे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पथकांसाठी उपलब्ध मनुष्यबळातून पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.

सहकारी सूतगिरण्यांच्या मदतीसाठी सरकारकडून आकृतीबंधात सुधारणा

राज्यातील सहकारी तत्त्वावरील वस्त्रोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या असलेल्या 10:30:60 या आकृतीबंधात सुधारणा करून तो 5:45:50 असा करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे सभासद भागभांडवल कमी करून शासकीय भागभांडवल वाढविताना कर्जाचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. नव्या आकृतीबंधामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या कापूस उत्पादक प्रदेशात सहकारी सूत गिरण्यांना मोठी मदत होणार आहे.

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची राज्यात अंमलबजावणी करणार

केंद्र शासनाची राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना 2018-19 पासून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीतील सदस्यांना प्रशिक्षण देण्यासह लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या क्षमता वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून 60:40 या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

पुण्याच्या स्पाईसर युनिव्हर्सिटीवर कारवाई होणार

विविध स्वरुपाची अनियमितता आणि इतर कारणांमुळे पुणे येथील स्पाईसर अॅडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी या विद्यापीठाविरोधात कारवाई करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, या विद्यापीठात २०१४-१५ आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे प्रवेश नियमित करण्यासही मान्यता देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here