घरमहाराष्ट्रम्हाडाच्या बेपर्वाईमुळे शेतकरी हवालदिल

म्हाडाच्या बेपर्वाईमुळे शेतकरी हवालदिल

Subscribe

 व्याज न भरल्यामुळे ६० लाखांचा बोजा

ग्रामीण निवारा योजना म्हाडाकडे वर्ग झाल्यानंतर म्हाडाकडून व्याजाचे पैसे भरण्यात आले नसल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांवर ६० लाखांचा बोजा पडणार असल्याने ते हवालदिल झाले आहेत. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना-दोन या अंतर्गत तालुक्यातील शेकडो लाभार्थी शेतकर्‍यांनी गृह कर्ज घेतले. या योजनेंतर्गत 2010 साली 90 हजार एवढी रक्कम लाभार्थ्याला देण्यात आली. त्यावर व्याज दर 10 टक्के प्रमाणे आकारला गेला.

व्याजाचे पैसे शासनामार्फत नंतर भरले जाणार असल्याचे मंजुरी पत्र त्यावेळी लाभार्थ्यांसह बँकांनादेखील देण्यात आले. त्यानंतर ही योजना म्हाडाकडे वर्ग करण्यात आली. व्याजाची दहा टक्के रक्कम देण्याची जबाबदारी म्हाडाकडे सोपविण्यात आली. तसे बँकांना कळविण्यात आले. सदर व्याजाची रक्कम ही साधारणतः 50 लाखांच्या पुढे आहे. त्यामुळे म्हाडाकडून ही रक्कम वसूल केली जावी आणि कर्जमुक्त केले जावे, अशी मागणी लाभार्थी करत आहेत. मात्र या मागणीची कुणाही दखल घेत नसून शेतकर्‍यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

- Advertisement -

बँक ऑफ इंडियाच्या पैठण शाखेत 31 लाभार्थ्यांचे 18 लाख, तर पितळवाडीच्या स्टेट बँकेच्या शाखेत 20 लाभार्थ्यांचे 6 लाख भरावे लागणार आहेत. बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेमध्ये 50 लाभार्थ्यांचे 30 ते 35 लाख भरावे लागणार आहेत. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकर्‍यांवर म्हाडामुळे लादला जाणारा लाखोंचा बोजा उतरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी याकडे लक्ष देऊन शासन दरबारी हा प्रश्न मांडावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ न शकल्याने म्हाडाची भूमिका समजू शकली नाही.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना-दोन अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील शेकडो लाभार्थींनी गृह कर्ज घेतले. याचे व्याज म्हाडाकडे भरण्यासाठी वर्ग करण्यात आले, मात्र म्हाडाने व्याजाचे पैसे न भरल्याने आम्हा सर्व लाभार्थ्यांवर बोजा झाला आहे. शासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास उपोषणाला बसणार आहोत.
-अविनाश शिंदे, कोतवाल

- Advertisement -

योजने अंतर्गत कर्ज घेतले, मात्र म्हाडाने व्याजाचे पैसे न भरल्याने याचा बोजा आमच्यावर लादला जात आहे. गेल्या एक वर्षांपासून या गोष्टीचा सर्व लाभार्थीनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे आम्हा शेतकर्‍यांना न्याय मिळावा व कर्जातून मुक्तता करावी.
-सुरेश शिंदे, शेतकरी, खडपी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -