कोकणात रोहयोतून विविध कामे सुरू करा

डॉ. नीलम गोर्‍हे यांचा आदेश

Mumbai

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कोकण व आदिवासी भागात रोजगार हमीची कामे हाती घेण्यात यावीत, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिले आहेत.या संदर्भात डॉ.गोर्‍हे यांच्या कार्यालयात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. मस्टर सादर करण्यात आल्यानंतर १५ दिवसांऐवजी ८ दिवसांत कामाला मंजुरी देण्यात येणार आहे. अभिसरणच्या माध्यमातून १८ कामे घेतली जातात. १५ ऑगस्टपासून ग्रामसभा घेऊन त्याद्वारे प्रसिद्धी करण्यात येईल. कोकणामध्ये संरक्षण बांध फलोत्पादन योजनेमध्ये द्राक्षाची लागवड करण्यात यावी, ज्याचा खर्च अभिसरणच्या माध्यमातून करण्यात यावा. व्यवसाय करामधून शेतीकामाची मंजुरी देण्याबाबत रोहयो विभागाने शासनाला प्रस्ताव सादर करावा. कोकणात यासाठी एकदिवसीय अभ्यास शिबीर आयोजित करण्यात यावे, अशा व अन्य सूचना करण्यात आल्या.
बैठकीला रोहयोचे सचिव एकनाथ डवले, उप सचिव डॉ. प्रमोद शिंदे, तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर व अन्य उपस्थित होते.