कोल्हापुरातील ‘मटण’दरावर अखेर तोडगा

कोल्हापुरातील 'मटण'दराबाबतीत वाद मिटला असून ५२० रुपये प्रतिकिलो दराने मटण विकण्यावर आता एकमत झाले आहे

Kolhapur
motton sale at rs 520 started in kolhapur
कोल्हापुरातील 'मटण'दरावर अखेर तोडगा

गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापुरातील ‘मटण’दराबाबतीत वाद सुरु होता. आता या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. ५२० रुपये प्रतिकिलो दराने मटण विकण्यावर आता एकमत झाले आहे. त्यामुळे मटण विक्रेतेही समाधानी झाले असून खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यामुळे झाला होता वाद

मटण विक्रेत आणि कृती समितीच्या बैठकीत मटण ५२० रुपये प्रतिकिलो दराने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मटण दराच्या वादामुळे गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात मटण विक्रेत्यांनी बंद पुकारला होता. कोल्हापुरात मटण दरवाढ झाल्यानंतर मटण दरवाढविरोधी कृती समितीन प्रति किलो ४८० रुपये दराने मटणाची विक्री व्हावी, असा आग्रह धरला होता. मात्र, हा दर परवडत नसल्याचे सांगत मटण विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवली होती. तसेच यावर तोडगा निघणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे या वादात कोल्हापुरकरांचा थर्टीफर्स्ट देखील कोरडाच गेला होता. मात्र, आता कृती समितीने यावर तोडगा काढल्याने अखेर आजपासून मटण विक्रीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी मोठ्या प्रमाणात मटणाच्या दुकानात गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यांपासून मटणावरुन गदारोळ सुरु होता. आधी मटणाचा दर आणि त्यानंतर दर्जा यावरुन दरवाढ कृती समिती आणि मटण विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. एकीकडे न परवडणारा मटणाचा दर तर दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेकडून सुरु असलेली कारवाई यामुळे कोल्हापुरातील मटण विक्रेत्यांनी मटण विक्री बेमुदत बंद ठेवली होती. मात्र, अखेर यावर तोडगा काढण्यात आला आहे.


हेही वाचा – मी तीन चाकी कार नाही सरकार चालवतो