घरमहाराष्ट्रनाशिकराज्यातील ११ सराईत गुन्हेगारांना अटक

राज्यातील ११ सराईत गुन्हेगारांना अटक

Subscribe

घरफोडी, मोबाईल, दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीसनाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जिल्ह्यात चोरी, लुटमार, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरु केला. पथकाने मालेगाव, येवला, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, कोपरगाव, शिर्डी या ठिकाणांवर जात गुन्हेगारांचा शोध घेतला. पथकाने समांतर तपास करत व सापळा रचत ११ सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता घरफोडी ३, चोरी ५, जबरी चोरी २ असे एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी १० मोबाईल, ५ दुचाकी, ९५ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली आहे.

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी जिल्ह्यातील ना-उघड मालाविरुद्धचे गुन्ह्यांचा आराखडा तयार करुन सराईत गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत व ठाव-ठिकाणांबाबत माहिती मिळवली. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे तपास पथके तयार करुन जिल्हा व राज्यसीमेलगत रवाना केली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचत ११ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

- Advertisement -

सराईत गुन्हेगारांची नावे

अर्जुन संजय पवार (२०), इमरान सुलेमान शेख (२०, दोघेही रा.गुलाबवाडी झोपडपट्टी),अनिल कैलास जाधव (२१, रा.राहता, जि.अहमदनगर), निलेश महादु शेवरे (रा. सापगाव शिवार, ता.त्र्यंबकेश्वर), बंडू जानू चौधरी (रा.त्र्यंबकेश्वर), सागर अनिल कुमावत (रा.नाशिक), निकेश प्रमोद रॉय (रा.तपोवन), अमर झब्बू भोसले (२४, रा.अस्वलदरा, साकोरा, ता.नांदगाव), अनिल महादू ब्राम्हणे (मालेगाव कॅम्प), जहिर अहमद अब्दुल माजीद (रा.इस्लामाबाद, मालेगाव), आसिफ शेख रहिम शेख (जळगाव जामोद, जि.बुलढाणा).

डॉक्टरला लुटणार गजाआड

सिन्नर आडवा फाटा परिसरात शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खेताडे (रा.हरसुले, ता.सिन्नर) यांना चोरट्यांनी मध्यरात्री रस्त्यावर ढकलून दिले. त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हिसकवत चोरटे फरार झाले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत नाशिकरोड रेल्वे स्टेशन मालधक्का परिसरात अर्जुन संजय पवार, इमरान सुलेमान शेख यांना अटक केली. त्यांच्याकडून ७ मोबाईल जप्त केले.

- Advertisement -

फरार गुन्हेगाराला शिर्डीत अटक

एक वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अनिल कैलास जाधव याला शिर्डीत अटक केली. गतवर्षी अनिल जाधव याने साथीदारांसह शिर्डी ते नाशिक महामार्गावर ट्रकचालकाला मारहाण करत लुटमार केल्याची कबुली दिली. या आरोपीवर जालना जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

त्र्यंबक मंदिरात भाविकांना लुटणार गजाआड

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांवर पाळत ठेवून लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत तीन गुन्हेगारांना अटक केली. निलेश महादु शेवरे (रा. सापगाव शिवार, ता.त्र्यंबकेश्वर), बंडू जानू चौधरी (रा.त्र्यंबकेश्वर) या दोघांना पथकाने त्र्यंबकेश्वर बसस्थानक परिसरातून अटक केली. सागर अनिल कुमावत (रा.नाशिक) व निलेश प्रमोद रॉय (रा.तपोवन) या दोघांना सीबीएस परिसरात अटक केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अगस्ती ऋषींच्या भाविकांना लुटणारा अटकेत

येवला तालुका हद्दीत अनकाई किल्ला परिसरात अगस्ती ऋषींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची चोरट्यांनी लुटमार करत दागिने, रक्कम व मोबाईल लंपास केले. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत साकोरा (ता.नांदगाव) येथे अमर झब्बू भोसले याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मोबाईल, रोख रक्कम जप्त केली.

दुचाकीचोरटे गजाआड

मालेगाव शहरात दुचाकी विक्रीकरिता संशयित आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अनिल महादू ब्राम्हणे (मालेगाव कॅम्प), जहिर अहमद अब्दुल माजीद (रा.इस्लामाबाद, मालेगाव) यांना सापळा रचत अटक केली. त्यांच्याकडून ५ दुचाकी जप्त मनमाड, मालेगाव, चांदवड, मुंबई येथील दुचाकी चोरी केल्याची कबुली

बुलढाण्यातील गुन्हेगारास अटक

सराईत गुन्हेगार आसिफ शेख रहिल शेख (रा.जळगाव जामोद, ता.बुलढाणा) हा नांदगावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचत अटक केली. त्याच्याकडून ७७ हजार रुपये जप्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -