घरमहाराष्ट्रनाशिकभाजपमधील बंडाळी देवकरांच्या पथ्यावर

भाजपमधील बंडाळी देवकरांच्या पथ्यावर

Subscribe

जळगाव हा १९९१ पासून भाजपचा मजबूत गड मानला जात आहे. येथे भाजपने दगडही उभा केला तरी विजयी होईल, असे मानले जात होते. मात्र, आता हा बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.

जळगाव हा १९९१ पासून भाजपचा मजबूत गड मानला जात आहे. तसेच खासदार ए.टी. पाटील यांनी सलग तीन वेळा या मतदार संघातून विजय मिळवला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सत्तास्थाने भाजप-शिवसेना युतीच्या ताब्यात आहे. यामुळे येथे भाजपने दगडही उभा केला तरी विजयी होईल, असे मानले जात होते. मात्र,याच आत्मविश्वासामुळे विद्यमान खासदारांना बसवून आमदार स्मिता वाघ यांना दिलेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने बेदरकारपणे घेतला. त्याची प्रतिक्रियाही तितक्याच जोरकसपणे उमटली असून आता हा बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.

जळगाव मतदार संघ भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असला तरी गेल्या पाच वर्षात येथील नेतृत्वाच खांदेपालट झाला आहे. खडसे म्हणजेच भाजप हे समीकरण बदलून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आता भाजपचे संकटमोचक झाले आहेत. यामुळे खडसेंची नाराजी व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनांची न झालेली पूर्तता या मुद्यांमध्ये भाजपमधील बंडाळीची भर पडून भाजपसमोर या मतदारसंघात मोठे आव्हान आहे.

- Advertisement -

भाजपमधील अंतर्गत बंडाळी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या पथ्यावर पडली असल्यामुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी प्रचारात आतापर्यंत आघाडी घेतली असल्याचे दिसते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी जाहीर करीत आघाडी घेतली असताना भाजप नेतृत्व मात्र उमेदवारी कुणाला द्यायची या संभ्रमात होते. परिणामी नवीन उमेदवाराचा शोध भाजपमध्ये सुरू असतानाच गुलाबराव देवकर यांनी प्रचाराच्या दोन फेर्‍या पूर्ण केल्या होत्या. भाजपने विद्यमान खासदाराला डावलताना नवीन उमेदवारी देताना स्पर्धा व गटबाजी याचा विचार न करता सुरुवातीला जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु डॉ. बी. एस. पाटील यांनी या उमेदवारीला जाहीर विरोध केल्यामुळे दोन पावले मागे घेत आमदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची नामुष्की आली. दरम्यानच्या काळात डॉ. बी.एस. पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम म्हणजे भाजपच्या सभेतच राडा झाला. उदय वाघ यांच्या समर्थकांनी डॉ. बी.एस. पाटील यांना केलेल्या मारहाणीमुळे राज्यभर भाजपचे संकटमोचक म्हणून मिरवणार्‍या जलसंपदा मंत्र्यांना त्यांच्या गृहजिल्ह्यातील संकट दूर करता येत नसल्याचा संदेश गेला. एकीकडे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतलेली असताना भाजपमधील अंतर्गत बंडाळीमुळे मतदारसंघात भाजपविषयी चुकीचा संदेश गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते एकनाथ खडसे यांना डावलून भाजप नेतृत्वाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना महत्व दिल्यानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. एकीकडे खडसे समर्थकांची नाराजी व उमेदवारीवरून उफाळलेली बंडाळी याचा विचार करता गिरीश महाजन यांना ही जागा टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. किंबहुना महाजन यांचे राजकीय भविष्यच जळगावच्या निकालावर अवलंबून असल्याचे सांगितले जाते.

जळगाव लोकसभा मतदार संघात जळगाव लोकसभा मतदार संघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. या मतदार संघांतर्गत येणार्‍या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपकडे दोन, शिवसेनेकडे दोन व राष्ट्रवादी, अपक्ष यांच्याकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगर पालिका यांचा विचार करता भाजप-शिवसेना युतीचे पारडे जड आहे; परंतु अंतर्गत बंडाळीमुळे पक्षाच्या प्रतिमेचे झालेले नुकसान भरून काढण्याचे मोठे आव्हान आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर निर्माण झालेली नाराजी दूर करणे, खडसे यांच्या नाराज समर्थकांचे मन वळवणे ही मोठी आव्हाने दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळते, यावरच येथील भाजप उमेदवाराचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

- Advertisement -

गुलाबराव देवकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असली, तरी १९९१ पासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. भाजप व शिवसेनेच्या ताब्यात बहुतांश संस्था आहेत. भाजप नेतृत्वाने शिवसेनेच्या नेत्यांशी जुळवून घेण्यात यश मिळवले आहे. यामुळे देवकर यांना केवळ भाजपमधील बंडाळीच्या भरवशावर अवलंबून राहून जमणार नाही. सध्या आमदार स्मिता वाघ या प्रचारात उतरल्या असून खडसे स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचाराच्या नियोजनात अडकले आहेत. तसेच उन्मेष पाटील यांच्या रुपाने नवीन चेहरा देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. दहा बारा दिवसांत भाजप नेते, कार्यकर्ते वादावर पडदा टाकण्यात कितपत यशस्वी होतील यावरच या मतदार संघातील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -