घरमहाराष्ट्रनाशिकसोशल मीडियाही होणार ‘स्वच्छ’

सोशल मीडियाही होणार ‘स्वच्छ’

Subscribe

नाशकात ई-स्वयंसेवक चमू कार्यरत; ३० आक्षेपार्ह मजकूर केला ‘रिपोर्ट’

फेसबुकवरील आक्षेपार्ह आणि अश्लिल मजकुरामुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अनेक तरुण-तरुणींचे आयुष्यही उद्धवस्त होऊ शकते या विचाराने नाशिकमधील काही ‘ई-स्वयंसेवकांनी’ सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सोशल मीडिया अभियान‘ बुधवारी (ता.१७) सुरू केले आहे. भारतात अशा प्रकारचा एकत्रित प्रयोग प्रथमच नाशिकमध्ये सुरू झाला आहे. या चमूने पहिल्या दिवशी फेसबुकवरील सुमारे ३० अकाउंटवरील आक्षेपार्ह फोटो ‘रिपोर्ट’ केले असून त्याची शहानिशा करून फेसबुक त्यावर २४ तासांच्या आत पुढील कार्यवाही करेल.

‘स्वच्छ भारत अभियाना’च्या धर्तीवरच हा उपक्रम राबवला जात आहे. सोशल मीडिया विशेषत: फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे वापरकर्त्यांमध्ये दिवसागणिक कमालीची वाढ होत आहे. या माध्यमाचा सकारात्मक वापर करणारे अनेक आहेत. मात्र, काही विकृत मंडळी या माध्यमाचा गैरवापर करताना दिसतात. धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर, मन विचलीत होईल असे रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो, मृतदेहाचे फोटो, बालकांचे नग्न फोटो वा व्हिडिओ, मुलींचे अश्लिल फोटो वा व्हिडिओ, एकतर्फी प्रेमातून वा प्रेमभंगातून केला जाणारा खोडसाळपणा आदी पोस्ट सोशल मीडियावर वाढत आहेत. भारतीय सायबर कायद्यानुसार कोणतीही धोकादायक माहिती पोस्ट करणे हा गुन्हा आहे; परंतु परदेशात अशा प्रकारचा कायदा नाही. त्यामुळे परदेशातून सोशल मीडियावर अशा पोस्ट करणार्‍यांचे प्रमाणही मोठे आहे.

- Advertisement -

तसेच काही भारतीय मंडळी बनावट अकाउंट तयार करून त्यावरून फोटो अपलोड करतात. त्यातून संबंधिताचे मानसिक खच्चीकरण होते. लैंगिक शोषणापासून, आर्थिक फसवणूक आणि आत्महत्येपर्यंतच्या कृती अशा पोस्ट केल्याने होऊ शकतात. गुगल सर्व इंजिनवरही अशा प्रकारचा मजकूर, चित्र, फोटो वा व्हिडिओ अपलोड होऊ शकतो. या बाबी टाळण्यासाठी नाशिकमधील ‘ई स्वयंसेवकांनी’ ‘स्वच्छ सोशल मीडिया’ अभियान हाती घेतले आहे. हे सर्व स्वयंसेवक प्रशिक्षित सायबर तज्ज्ञ आहेत.

असे राबवणार अभियान

ई- स्वयंसेवकांचा दहा जणांचा चमू सोशल मीडियावरील वेगवेगळे अकाउंट तपासतील. हे अकाउंट राज्यभरातील कुठलेही असतील. त्यावर आढळणार्‍या आक्षेपार्ह पोस्टवर तातडीने फेसबुककडे ‘रिपोर्ट’ केला जाईल. रिपोर्टचा पर्याय प्रत्येक पोस्टसाठी उपलब्ध असतो. त्याचा वापर केल्यानंतर फेसबुक संबंधित पोस्टची शहनिशा करेल. फेसबुकच्या निकषांमध्ये न बसणार्‍या पोस्ट या रिपोर्टच्या आधारे तातडीने हटवल्या जातील.

- Advertisement -

नंबर गेम

  • ६० कोटी भारतात इंटरनेट वापरकर्ते
  • २५ कोटी- ग्रामीण भागात इंटरनेट वापरकर्ते
  • २.३८ अब्ज -फेसबुकचे जगभरात वापरकर्ते
  • ३००० लाख -भारतातील फेसबुक वापरकर्ते
  • ६४ लाख- भारतातील इन्स्टाग्रामचे वापरकर्ते

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार

प्रतिमा मलीन करण्यासाठी वा कुणाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो आणि पोस्ट टाकल्या जातात. तसेच खोट्या जाहिराती व संदेश पसरवले जातात. मुलांचे अपहरण करण्यासाठी देखील काही अकाउंट कार्यरत आहेत. या गोष्टींमुळे समाजावर विघातक परिणाम होऊ शकतो. अशा पोस्टचे रिपोर्ट आजवर कुणीही एकावेळी केलेले नाहीत. ही बाब आम्ही बुधवारपासून हाती घेतली आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ शकते.

-तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -