अमानुष अत्याचार प्रकरणात राजकीय दबाव नाही

दरी-मातोरी शिवारातील अमानुष अत्याचार प्रकरण अत्यंत निंदनीय आहे. त्यातील गुन्हेगारांना दयामाया दाखवली जाणार नाही. अमानुष अत्याचार राजकीय व्यक्तीमुळे झाल्याचे पिडितांनी सांगितलेले नाही. ही घटना वाढदिवसाच्या पार्टीत झालेली आहे. त्यामुळे राजकीय रंग देणे चुकीचे आहे. पोलीस तपासावर लक्ष असून, पीडितांना निश्चितच न्याय मिळेल, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी दिली.

nashik
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल

दलित तरुणावर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच थूल गुरूवारी (दि.१६) नाशिक दौर्‍यावर आले होते. त्यांनी रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पीडितांची विचारपूस केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकीय हस्तक्षेप किंवा दबावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरीमातोरी येथील शिवगंगा फार्महाऊसमध्ये तडीपार गुंड संदेश काजळेच्या वाढदिवसानिमित्त ९ जानेवारी रोजी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यात मद्यपी टोळक्याने दोघा डी.जे. वादकांवर अमानुष अत्याचार केला होता. त्यानंतर या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुरुवारपर्यंत मुख्य सूत्रधार संदेश काजळेसह ११ जणांना अटक केली आहे.

कायदेशीर प्रक्रिया तीन दिवसांत पूर्ण करा

अमानुष अत्याचाराच्या घटनेत १२ आरोपी असल्याचे निष्पन्न असून पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. पीडितांवर जात विचारुन अत्याचार व जातीवाचक शिवीगाळ केल्याने आरोपींविरुद्ध अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार पुढे बदलू नये, यासाठी तीन दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची माहिती आयोगाला सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना दिले असल्याची माहितीही थूल यांनी दिली.

आयोगाचे तपासावर लक्ष

अत्याचार गुन्ह्याच्या संदर्भातील पोलीस तपासावर अनुसुुचित जातीजमाती आयोग लक्ष ठेवून आहे. पोलीस दप्तरातील नोंदी व घटनाक्रमानुसार पोलिसांनी लावलेल्या कलमांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. पीडितांची प्रकृती सुधारण्यासाठी भेटण्यास येणार्‍यांची गर्दी कमी करावी. राजकीय व्यक्तींनी गैरफायदा घेवू नये आणि याला आळा बसावा, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांना पीडित व साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्याचे थूल यांनी सांगितले.

आर्थिक मदतीच्या सूचना

पीडिताच्या कुटुंबीयांना समाजकल्याण विभागाकडून शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी लवकरच शासनाकडे अहवाल पाठवला जाईल. पीडितांच्या कुटुंबियांना मदत व निष्णात सरकारी वकील मिळेल, असे थूल यांनी सांगितले.