घरमहाराष्ट्रवृत्तपत्र जाहिरातींची थकबाकी हवेतच!

वृत्तपत्र जाहिरातींची थकबाकी हवेतच!

Subscribe

मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन नाही!

राज्य सरकारकडे ३१ मार्च २०२० पर्यंतची वृत्तपत्रांच्या जाहिरातींची असलेली थकबाकी एकरकमी देण्यात करोनाच्या या आर्थिक संकटकाळात सध्यातरी अडचण आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने ती लवकरच दिली जाईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शुक्रवारी निवडक संपादकांशी दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या हिरवळीवर बोलताना त्यांनी वृत्तपत्रांप्रमाणेच इतर घटकही अडचणीत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी किती कालावधीत वृत्तपत्रांच्या जाहिरातींची थकबाकी दिली जाईल याबाबतीत कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.

गुजरात सरकारने ३१ मार्च २०२० पर्यंतची वृत्तपत्रांच्या जाहिरातींची थकबाकी एकरकमी देण्याबाबत नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण आपल्या फेसबुक लाईव्हमधून नोकरकपात करू नका, वेतनकपात करू नका, असे आवाहन नेहमी करत असता, मग गुजरात सरकारच्या निर्णयाच्या धर्तीवर वृत्तपत्रांना जगवण्यासाठी एकरकमी थकबाकी देण्याबाबत सरकारची भूमिका काय? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी,‘मी सामना म्हणून (६ महिन्यांपूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे सामनाचे संपादक होते) तुमच्या सोबत आहे, पण मुख्यमंत्री म्हणून राज्याकडे सध्या सर्वांची देणी, थकबाकी देण्यासाठी निधी नसल्याने एकरकमी निधी देता येणार नाही, पण टप्प्याटप्प्याने निधी देता येईल’, असे सांगितले.

- Advertisement -

आपलं महानगरने ३१ मार्च २०२० पर्यंतची वृत्तपत्रांच्या जाहिरातींची थकबाकी एकरकमी द्यावी याबाबत पुढाकार घेतलेला होता. तसेच डीएव्हीपी आणि राज्य सरकारची इतर थकबाकी वृत्तपत्रांना मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. राज्यात साडे चारशेहून अधिक वृत्तपत्रे असून त्यांची थकबाकी सुमारे २२५ कोटी इतकी आहे. संपादकांच्या बैठकीत याबाबत काही ठोस आश्वासन मिळेल या आशेवर मुख्यमंत्रांच्या उत्तराने मात्र पाणी फेरले गेले. मुख्यमंत्र्यांसोबत संपादकांच्या या अनौपचारिक बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, माहिती जनसंपर्क संचनालयाचे अजय आंबेकर, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान उपस्थित होते.

युती कोणाचीही कोणाशीही होऊ शकते!

येत्या १५ दिवसांत सगळ्यांनाच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यात सर्दी-खोकल्याची साथ आली नाही. मात्र, पावसाळ्यातही सर्दी-खोकल्याची साथ येणार नाही याची शास्वती कोणीही देऊ शकत नाही. पावसाळा सुरू झाल्यावर डेंग्यूची युती करोनासोबत झाल्यास मुंबईसह राज्याचीही स्थिती बिघडेल, अशी चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. सध्या कोणाचीही कोणाशीही युती होऊ शकते, असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या संभाव्य राजकीय अस्थिरतेवर बोट ठेवले. युती कोणाचीही कोणाशीही होऊ शकते असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि त्याचवेळी टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओकही युती सध्याच्या काळात डेंजरसच आहे असे म्हणाले. त्यांच्या या विधानांमुळे बैठक संपल्यावर सनदी अधिकारी आणि उपस्थित अधिकार्‍यांमध्ये राज्यात पुढे पावसाळ्यात करोनाचे काय होईल आणि राज्य सरकारचे काय होईल याबाबत चर्चा रंगली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -