घरमहाराष्ट्रनाशिकशरद पवारांवर झालेल्या ईडीची कारवाईने पाडली सत्ताबदलाची ठिणगी

शरद पवारांवर झालेल्या ईडीची कारवाईने पाडली सत्ताबदलाची ठिणगी

Subscribe

खा. संजय राऊत यांचा गौप्यस्फोट; आमचे फोन टॅप करुन भाजपने आत्मविश्वास गमविल्याचा टोला

शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यावर खोटे ओरोप करुन ईडीची नोटीस दिल्याने राज्यात सत्ताबदलाची ठिणगी पडली, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने घेतलेल्या ‘आमने-सामने’ या प्रकट मुलाखतीत केला. सत्ता स्थापनाकाळात आमचेही फोन टॅप करण्यात येत होते, असे स्पष्ट करतानाच आमचे संभाषण ऐकून भाजपाच्या मंडळींचा आत्मविश्वास गळाल्याचा टोला त्यांनी लगावला.

महाकवी कालिदास कलामंदिरात ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. त्यांची परखड आणि खुमासदार मुलाखत जेष्ठ राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी घेतली. महापालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी कार्यक्रमाचे अतिशय नेटके आयोजन केले होते. यावेळी खा. राऊत यांनी भाजपावर परखड शब्दात टीका करतानाच सत्ता स्थापन करण्यापुर्वीचे अनेक रंजक किस्से सांगितले. सत्ता आमचीच येणार याचा मला आणि शरद पवारांना फाजील आत्मविश्वास होता, असे सांगत राऊत म्हणाले की, माझा आत्मविश्वास फाजील आहे असे बाळासाहेब नेहमीच म्हणायचे. विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचेच नाही. त्यांना चिरडून टाकायचे अशा विचाराने भाजपाने सत्ताकाळात लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच शरद पवारांना ईडीची नोटीस देण्यात आली. त्यावेळी पवारांच्या बाजूने बोलणे हे देखील गुन्हा केल्यासारखे होते. परंतु मी त्यावेळी पवारांची बाजू घेतली. त्यांना मिळणारा जनाधार बघून पुढे काय होणार याची भणक आम्हाला लागली होती. बाळासाहेब हयात असते तर त्यांनी पवारांवर अशा सूडभावनेने कारवाई करणार्‍यांचा विरोधच केला असता. तुरुंगात टाकायचे आणि विरोध मोडून काढायचा ही अनिष्ठ परंपरा आम्हाला मोडीत काढायची होती. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन आम्ही सत्ता स्थापन केली. खरे तर सत्तांतर ही राज्याचीच नव्हे तर देशाची आणि समाजाचीही गरज होती. आम्ही सरकार बनवतोय हे मी वारंवार बोलत होतो आणि भाजपचे लोक आम्ही सरकार कसे बनवणार याचा शोध घेत बसले होते. माझा फोन टॅप करण्याचा प्रयत्न झालाही असेल. पण त्यातून मी किती शिव्या देतो हेच भाजपाच्या मंडळींना समजले असेल. आमच्या फोनवरील गप्पा ऐकून त्यांचाच आत्मविश्वास डगमगला. त्यातूनच आम्हाला सत्ता स्थापन करण्याचे बळ मिळाले, असेही राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, कृषी मंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे , आ. नरेंद्र दराडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. खा. राऊत यांचे स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, सुनील पाटील, सुधाकर बडगुजर आदींनी केले.

- Advertisement -

भाजपबरोबर कधीही पटले नाही
टोळीने राज्य चालविण्याचा विचार रुजू नये या विचाराचा मी सुरुवातीपासूनच आहे. सत्तेत असताना आणि नसतानाही भाजपाबरोबर माझे कधीही पटले नाही. भाजपकडून ज्या पद्धतीने धार्मिक व्देष पसरवला जातोय त्यापद्धतीने व्देष कधीही पसरवला गेला नव्हता. १९४७ लाही नाही.

काँग्रेसवर उधळली स्तुती सुमने
काही दिवसांपूर्वीच इंदिरा गांधींवर टीका करणार्‍या खा. राऊत यांनी शनिवारी मात्र गांधी घराण्याचे भरभरुन कौतूक केले. गांधी घराण्याने जो त्याग देशासाठी केला आहे, त्याच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी अध्यक्ष असताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली गेली. त्यांना पप्पू म्हणून हिनवण्यात आले. ही बाब कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही असेही त्यांनी नमूद केले. पंडित नेहरुंनी स्थापन केलेल्या कंपन्या कडकीच्या काळात भाजपवाले विकून खाताय अशी टीकाही त्यांनी केली. देशाच्या घडवणुकीत काँग्रेसचे योगदान कुणीही विसरु शकत नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात केवळ काँग्रेसनेच सहभाग घेतला आहे ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. काँग्रेसने देशासाठी काही केले नाही असे म्हणने म्हणजे सूर्यावर थुंकणे आहे असेही खा. राऊत यांनी नमूद केले. .
वर्किंग कमिटीची बैठक ठरली निर्णायक-
सत्ता स्थापनेचा किस्सा सांगताना खा. राऊत म्हणाले, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याविषयीचा निर्णय होणार होता. सोनिया गांधी भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेनेला बरोबर घेतील याचा फाजील आत्मविश्वास मला होता. काँग्रेसने वेगवेगळ्या पदाधिकार्‍यांबरोबर जवळपास १८ बैठका घेतल्या. काँग्रेसची ही निती मला आणि शरद पवारांनाच माहित होती. परंतु आमच्या काही मंडळींना मात्र ही खात्री नव्हती. वर्किंग कमिटीची बैठकच महाविकास आघाडीसाठी निर्णायक ठरली. ४४-५४ आणि ५६ आमदार असलेल्या पक्षांचा कधी मुख्यमंत्री होऊ शकतो का? पण आम्ही करुन दाखविला. त्यामुळे महाराष्ट्रात नवा इतिहास रचला गेल्याचेही त्यांनी सांगितले.
अजय बोरस्तेंच्या शिस्तबद्ध नियोजनाला शाबासकीची पावती-
खा. राऊत यांच्या प्रकट मुलाखतीसाठी शहरातील सर्वपक्षीय राजकारणी, बांधकाम व्यावसयिक, उद्योजक, शिक्षण तज्ज्ञ, विधीज्ज्ञ आदींना निमंत्रीत करण्यात आले होते. सभागृहाबाहेर प्रोजेक्टरच्या सहाय्याने मुलाखतीचे थेट प्रक्षेपण सुरु होते. सभागृह खच्चून भरल्याने अनेकांनी सभागृहाबाहेर बसून थेट प्रक्षेपण बघण्यास पसंती दर्शविली. विरोधीपक्ष नेता अजय बोरस्ते यांचे शिस्तबद्ध संयोजन बघून अनेकजण अवाक झाले. त्यांच्या अशा नियोजनाबद्दल अनेकांनी शाबासकीची पावती दिली.

- Advertisement -
खा. संजय राऊत यांची मुलाखत ऐकण्यासाठी आलेला जनसमुदाय

खा. राऊत उवाच..
– नाशिक हे बंडखोरांचे केंद्रस्थान
– भाजपकडून अजूनही हनीमुन सदृश्य प्रकार सुरु आहेत
– सत्तेचा गैरवापर करुन सुडाने वागणारे तोंडघशीच पडणार
– डर के आगे जित है या तत्वाने मी वागत आलो आहे. मी घाबरेल तेव्हा माझा पराभव होईल, असे मी समजतो
– माझा एक हात नेहमी मृत्यूच्या खांद्यावर असतो
– विरोधीपक्ष नेताही नको म्हणणार्‍या फडणवीस यांना विरोधी पक्षनेतापदी काम करावे लागणे हा काळाने उगवलेला सूड आहे
– मंत्रालय लोककल्याणासाठी असते, षड्यंत्र रचण्यासाठी नाही हे भाजपवाले विसरलेले दिसताय
– फैज अहमद हा पाक सरकार विरोधी होता, त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनआरसीच्या विरोधात त्याचे गुणगाण गायल्यावर राष्ट्रद्रोह कसा ठरेल
– पूर्वी माफियांनाही नितीमत्तेचे बंधन असायचे
– माफियांना समांतर सरकार म्हणून ओळखले जायचे. ते निर्णय घ्यायचे
– आजचे माफिया हे चिंधीचोर आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -