घरमहाराष्ट्र'कोळसे-पाटील गो बॅक'; पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गोंधळ!

‘कोळसे-पाटील गो बॅक’; पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गोंधळ!

Subscribe

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांच्या व्याखानाचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये करण्यात आले होते. महाविद्यालयाने हा कार्यक्रम नाकारला होता. त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात तणावग्रस्त परिस्थिती होती.

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आज दुपारी १२ वाजता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आल्यानंतर मोठा गोंधळ झाला. कोळसे-पाटील महाविद्यालयात आल्यानंतर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी ‘कोळसे-पाटील मुर्दाबाद’, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. या घोषणा ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने कोळसे-पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘कोळसे-पाटील गो बॅक’, ‘राज्यघटनेची पायमल्ली करणारे राज्यघटनेवर काय बोलणार?’ अशा प्रकारचे अनेक संदेश लिहून विरोध दर्शवला.

नेमकं काय आहे प्रकरण?

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी अचानक या कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयामध्ये तणाव निर्माण झाला. महाविद्यालयाने परवानगी नाकारल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या एका गटाने व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला अभाविपने विरोध दर्शवत कोळसे-पाटील महाविद्यालयात आल्यावर त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. कोळसे-पाटील विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष न देता महाविद्यालयामध्ये गेले. त्यांनी इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर महाविद्यालयातून बाहेर पडले. दरम्यान, परिसरात पोलिसांनी कडोकट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे दोन गटांमधील हाणामारी रोखता आली.

- Advertisement -

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी – न्या. बी.जी. कोळसे-पाटील

याप्रकरणी न्या.बी.जी. कोळसे-पाटील यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे. ‘फर्ग्युसन महाविद्यालयाचे व्यवस्थापन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहे’, असा आरोप कोळसे-पाटील यांनी केला आहे. दरम्यान, डेक्कन एज्युकेशन नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी महाविद्यालयाच्या वतीने स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “महाविद्यालयाचे डीन यांनी नजरचुकीने कार्यक्रमाला परवानगी दिली होती. ही बाब लक्षात येताच शनिवारी कार्यक्रमाची परवानगी नाकारली”. ‘आम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली ही परवानगी नाकारली नाही’, असे शरद कुंटे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – फर्ग्युसन कॉलेजमधील पुजेवरून वाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -