घरमहाराष्ट्रअंगण झाले गायब...रांगोळीची तर्‍हा बदलली!

अंगण झाले गायब…रांगोळीची तर्‍हा बदलली!

Subscribe

भारतीय संस्कृतीत रांगोळीला अनन्यसाधारण महत्त्व असून, दिवाळीचा सण तर दारासमोर रांगोळी काढल्याविना पूर्ण होत नाही. पूर्वी गावागावांतून घरासमोर सारवलेल्या अंगणात सुंदरशी रांगोळी रेखाटली जायची, त्याच्या बाजूने तेलाच्या दिव्यांची किंवा मेणबत्त्यांची आरास केली जात असे. बदलत्या काळात बैठ्या घरांच्या जागी मोठे इमले उभे राहिले अन् आपोआप अंगणेही गायब झाली. स्वाभाविक फ्लॅटच्या दारासमोर किंवा चाळीतील पायरीच्या बाजूला रांगोळी काढण्याची वेळ आली आहे. वेळेअभावी झटपट रांगोळी काढण्यावर भर दिला जात आहे. या झटपट रांगोळीसाठी बाजारात विविध साधनेही उपलब्ध झाली आहेत.

बदललेल्या परिस्थितीत दिवाळीमध्ये नाजूक रेषांच्या, तसेच ठिपक्यांच्या सुबक रांगोळी काढणे सर्वांनाच शक्य नसते. धावपळीच्या जीवनात महिलांना हाताने रांगोळी काढणे शक्य नसल्याने झटपट व आकर्षक रांगोळी काढण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे विविध पर्याय दाखल झाले आहेत. पोलादपूरसारख्या ग्रामीण भागातील बाजारपेठेत महिलांची रांगोळीच्या छापासह जाळीच्या रांगोळ्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे दिसून येते. गोलाकारचे जाळे, देव-देवतांची चित्रे, फुले, वेली असे प्रकार उपलब्ध आहेत. तसेच छोट्या-छोट्या रांगोळी काढण्यासाठी चौकोनी छाप देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या महिलांना चिमटीत रंग पकडून रांगोळी काढणे शक्य नाही त्यांच्यासाठी रांगोळीचे पेनही उपलब्ध आहेत.

- Advertisement -

फ्लॅट संस्कृतीमध्ये रहिवाशांसाठी रांगोळी काढणे शक्य नसते. जागेची कमतरता आणि वेळेचा अभाव यामुळे तासन्तास बसून रांगोळी काढण्यापेक्षा काही मिनिटातच रांगोळी काढण्याचा कल वाढला आहे. रांगोळी सजविण्यासाठी विविध रंगाचे मोती, मणी, लेस आदी साहित्य वापरून कोरीव आयताकृती चौरस आकाराततील विविध रांगोळ्यांसाठीही साधने उपलब्ध झाली आहेत. रांगोळीसाठी लागणारे विविध रंग बाजारात उपलब्ध आहेत. यांची किंमत 50 रुपयांपासून अगदी 200 रुपये किलोपर्यंत आहे. तर रांगोळीच्या छापांची किंमत 5 रुपयांपासून 30 रुपयांपर्यंत आहे. अंगण नसल्याने अनेक महिला अ‍ॅक्रॅलिक वूडन शीटवर रांगोळी काढण्यालाही पसंती देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -