दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे उघडणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत, खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंदिरे कधी उघडणार असा सवाल सातत्याने विचारला जात आहे. आता मंदिरेसुद्धा उघडली जातील. दिवाळीनंतर आपण मंदिरे उघडण्याबाबत एक नियमावली करू. या नियमावलीमध्ये काय असेल तर गर्दी टाळली जावी. आपले आजी आजोबा, आई-वडील अशा वृद्ध व्यक्ती मंदिरात जातात. तिथे गर्दी होऊ शकते. त्यामुळे धोका वाढू शकतो म्हणूनच मी जाणीवपूर्वक मंदिरे उघडण्यासाठी उशीर करत आहे. मंदिरात आरती करताना दाटीवाटी केली जाते. इतर प्रार्थनास्थळांवरही हीच परिस्थिती असते. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दूरदर्शनवरून आणि ऑनलाईन राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज अनेकांकडून मंदिरे उघडण्याची मागणी होत आहे. मात्र याचे विपरित परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? मंदिरात प्रवेशासाठी गर्दी टाळणे आण मास्क वापरणे बंधनकारक असेल.

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नका

दिवाळीत सावर्जनिक ठिकाणी फटाके फोडू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत आपण गणपती, नवरात्र असे सण साजरे केले. खरंतर हे सण साजरे केले की पार पाडले हा प्रश्नच आहे. अनलॉक होत असल्याने गर्दी वाढत आहे. गर्दी ही जिवंतपणाचं लक्षण आहे. मात्र अद्याप धोका टळलेला नाही. दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढतो आहे. पाश्चिमात्य देशातही कोरोना वाढत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे कोरोना वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. त्यातून कोरोनाचा धोका वाढतो.त्यामुळे दिवाळीत फटाके फोडण्याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मी बंदी वगैरे घालणार नाही. मात्र शक्यतो दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नका. प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांत जे कमावलंय ते चार दिवसांच्या धुरात वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मेट्रो प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकू नका

मेट्रो कारशेडच्या जागेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की, आरे येथील कारशेड कांजूरमार्गला नेली म्हणून टीका होत आहे. ती जमीन मिठागराची आहे, असा दावा केला जातोय. या सगळ्याला समर्पक उत्तर देऊ. मात्र असे करून तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकता आहात. त्याचा काय इलाज करायचा तो करूच. पण आम्हीसुद्धा डोळे बंद करून काम करत नाही आहोत. तसेच जे जे मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे असेल ते ते काम आम्ही करणार आहोत.मधल्या काळात महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान केले होते. जगभर, देशात, राज्यात संकट असताना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही. ड्रग्सची शेती केली जातेय असे वातावरण निर्माण केले गेले होते. ते आपण मोडून काढले आहे. हे कारस्थान मोडून काढून आम्ही जून महिन्यात १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. अनेक देशी-विदेशी कंपन्या आल्या. त्यापैकी अनेक कंपन्यांना जागा दिल्या आहे. गेल्या आठवड्यात अजून ३५ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधित करताना सांगितले.

लोकलबाबत निर्णय नाहीच

सर्व महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर आता सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. यात रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचेही चांगले सहकार्य राज्य सरकारला मिळत आहे आणि याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले.