Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोरोनाकाळात साहित्य संमेलनाचा आग्रह का?

कोरोनाकाळात साहित्य संमेलनाचा आग्रह का?

Related Story

- Advertisement -

हेमंत भोसले


कोरोनाचा प्रभाव अजूनही कायम असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील मर्यादा शासनाने कायम ठेवल्या असताना साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मात्र नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी तयारी करीत आहेत. आजवरच्या संमेलनांचा अनुभव बघता संमेलनाला येणारे सुमारे ६० टक्के वक्ते हे वय वर्षे ६० च्या पुढील असतात. कोरोनाचा धोका वयोवृद्धांना अधिक असल्यामुळे येणार्‍या ज्येष्ठ साहित्यिकांच्या आरोग्य सुरक्षिततेची हमी संमेलनाचे संयोजक कसे घेणार, होणार्‍या गर्दीवर नियंत्रण कसे प्रस्थापित करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ऑनलाईन संमेलनाचा प्रशस्त पर्याय उपलब्ध असताना नाशिकमध्ये संमेलन घेण्यासाठी आग्रह धरण्यामागचे कारण काय, असाही सवाल केला जातोय.

- Advertisement -

९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच साहित्य महामंडळाच्या वतीने औरंगाबादला करण्यात आली. परंतु, या घोषणेनंतर पुन्हा वाद निर्माण झाला आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलनाला यंदा विश्रांती द्यावी किंवा ते ऑनलाईन माध्यमातून घ्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधीलच अनेक साहित्यिक या संमेलनासाठी इच्छुक नाहीत. साहित्याची आदानप्रदान होणे हा संमेलनाचा उद्देश असला तरी सांप्रदकाळ लक्षात घेता कोरोना विषाणूची देवाणघेवाण झाली तर त्याची जबाबदारी आयोजकांना घ्यावी लागणार आहे. आजवर सुमारे २५ संमेलने विविध कारणास्तव रद्द झाली होती. त्यामुळे यंदा खंड पडला असता तर काय बिघडले असते, असे या साहित्यिकांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या काळात बाहेरुन किती साहित्यिक येतील याविषयी आयोजकांनाच साशंकता आहे. जर साहित्यिकच नसतील तर संमेलनाचा उपयोग काय असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नाशिककर उत्सवप्रिय असल्यामुळे कोरोनाकाळातही संमेलनाला गर्दी होईल. मात्र, या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना आयोजकांना नाकीनऊ येणार आहे. शिवाय गेल्या दहा महिन्यांपासून प्रशासनातील कोरोना योद्धे जीवाचे रान करीत आहे. त्यांच्यावरील ताण या संमेलनाने अधिक वाढणार आहे. सर्व यात्रा, धार्मिक अध्यात्मिक सोहळेही रद्द करण्यात आले आहेत. शाळा कॉलेजेस अजून पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. हे सर्व पाहता साहित्य संमेलन घेणे संयुक्तिक होणार नसल्याचा सूर साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.

संमेलनात शरद पवारांचे सहस्त्रचंद्रदर्शन?

- Advertisement -

नाशिकमध्ये होऊ घातलेल्या संमेलनातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळाही करण्याचे नियोजन असल्याचे कळते. त्यामुळे साहित्य संमेलन सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी तर भरवले जात नाही, अशीही शंका आता उपस्थित होत आहे.

मविप्रमागे ताकद होती; कोरोनाकाळात ती कोठून येणार?

नाशिकमध्ये ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने उत्तम आयोजन केले होते. तेव्हाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन आमदार डॉ. वसंत पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून संमेलन यशस्वी केले होते. मविप्र संस्थेचे शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग या संमेलनासाठी दिवसरात्र झटला. यंदा लोकहितवादी मंडळाने आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. मात्र, यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असणार्‍या स्वयंसेवकांची कुमक कोठून आणणार आणि त्यांच्या आरोग्याची हमी कशी घेणार, असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

 

- Advertisement -