घरमुंबईशस्त्रक्रियेसाठी मुस्लिम रुग्णांची दाढी काढू नये - सपाचे रईस शेख यांची मागणी

शस्त्रक्रियेसाठी मुस्लिम रुग्णांची दाढी काढू नये – सपाचे रईस शेख यांची मागणी

Subscribe

शस्त्रक्रियेसाठी मुस्लिम रुग्णांची दाढी काढू नये. तसेच एखाद्या रुग्णाची दाढी करायची असल्यास सर्वप्रथम रुग्णाच्या कुटुंबाची परवानगी घेऊन नंतर दाढी करावी अशी मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे.

महापालिका रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी पुरुष रुणाच्या चेहर्‍यावरील केस काढले जातात. त्यामुळे पुरुष रुग्ण असल्यास त्यांची दाढीही काढली जाते. परंतु मुस्लिम धर्मात दाढीला महत्व असल्याने दाढी न करताच रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. तर भाजपाने वैद्यकीय सेवा सुविधांमध्ये सपाने धार्मिकता आणू नये असा टोला मारत अप्रत्यक्ष विरोध दर्शवला आहे.

कुटुंबियांची मंजुरी घेवूनच दाढी काढण्यात यावी

समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन आणि उपायुक्त आरोग्य धामणे यांना निवेदन देवून ही मागणी केली आहे. या निवेदनात रईस शेख यांनी, महापालिका रुग्णालयात मुस्लिम रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना रुग्णाची किंवा त्यांच्या कुटुंबियांची मंजुरी घेवूनच दाढी काढण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुस्लिम समाजात दाढीला महत्व असून मुस्लिम समाजातील सर्वच पुरुष आणि धर्मगुरु दाढी ठेवत असतात. दाढी ठेवणे ही मुस्लिम समाजाची धार्मिक पंरपरा आहे. परंतु महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर छोटीसी शस्त्रक्रिया करायची असेल तरीही रुग्णाच्या संपूर्ण चेहर्‍यावरील केस काढण्यात येतात. चेहर्‍यावरील दाढी काढणे हे मुस्लिम धर्माच्या विरोधात असल्याने संबंधित रुग्णाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना समाजात वावरताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याबाबी लक्षात घेवून शस्त्रक्रिया करताना उच्च दर्जाचा वापर करताना त्यात बदल करण्यात यावा आणि जेथे आवश्यकता असेल तरच दाढी करता करण्यात यावी. दाढी न काढता शस्त्रक्रिया होत असेल तेथेच दाढी काढण्यात यावी असे रईस शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी मात्र, सपाच्या रईस शेख यांनी वैद्यकीय प्रक्रियेत धार्मिकता आणू नये अशा शब्दांत समाचार घेतला आहे. वैद्यकीय व्यवस्थेत शस्त्रक्रिया करताना अंगावरील केस शरिरात जाऊन त्यापासून संसर्ग होऊ नये म्हणून ते काढले जातात. त्यामुळे वैद्यकीय शस्त्रक्रियांमध्ये तज्ज्ञांकडून जो मार्ग अवलंबवला जातो, त्यात धार्मिकता आणू नये,असे त्यांनी सांगितले आहे.

मुस्लिम धर्मात दाढीला महत्व

शस्त्रक्रियेत गरजेप्रमाणे अंगावरील केस काढले जातात. ते काही जाणूनबुजून काढले जात नाही. मुस्लिम धर्मात दाढीला महत्व असले तरीही नमाज खुर्चीवर बसून अथवा रोजा बुडाल्यास माफी मागून परत ठेवता येतो. त्यामुळे धर्मात महत्व असले तरी माफी मागून ते करता येतात. त्यामुळे वैद्यकीय प्रक्रियेचा भाग म्हणून जे डॉक्टरांना योग्य वाटते तेच त्यांनी करावे. त्यात धर्माचा विचार करू नये. कारण मरण आले असेल तर वाचण्यासाठी काय काय करता येईल ते करायला हवे. त्यासाठी नंतर माफीही मागता येते. परंतु रईस शेख यांना दाढीचे एवढेच महत्व वाटत असेल तर पक्षाचे अध्यक्ष वांरवार दाढी कसे काढतात असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. त्यामुळे सपाच्या मागणीला राजकीयदृष्ट्या तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही विरोध होण्याची शक्यता आहे. धर्माचे राजकारण आता रुग्णांच्या उपचारापर्यंत पोहोचल्यामुळे अशाप्रकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवताना अनंत अडचणी येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -