उपवन तलावाचा परिसर गर्दुल्ल्यांच्या विळख्यात

Mumbai
उपवन तलावाचा परिसर

मासुंदा तलावानंतर ठाण्यातील उपवन तलाव अत्यंत देखण्या जलस्रोतांपैकी एक ठिकाण आहे. त्याच्या आसपास सुशोभिकरणाची कामे करून हा परिसर ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. येऊरच्या लगत असणार्‍या या परिसरात सकाळ-संध्याकाळ मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येतात. मात्र सध्यस्थितीत या तलावाच्या परिसराला बारचे आणि गर्दुल्ल्यांच्या अड्ड्याचे स्वरुप आले आहे.

या ठिकाणाहून दर दिवशी सकाळी एक भंगारवाला सुमारे 1 गोणीभर दारूच्या रिकाम्या बाटल्या भरून घेऊन जातो. त्याला याबाबत विचारले असता तो म्हणाला, मी काही आठवड्यापासून सातत्याने येथे रोज सकाळी येतो. संपूर्ण परिसरातून हा बाटल्यांचा आणि टिनचा कचरा जमा करतो. कधी एक गोणी तर कधी दोन गोण्या भरतात. त्यामुळे माझी दिवसभराची कमाई होते. इतकेच नव्हे तर या परिसराला आता गर्दुल्ल्यांचा विळखा पडला असल्याची तक्रारही स्थानिक नगरसेवक नरेंद्र सूरकर यांनी केली आहे.

रात्रीच्या वेळेस रस्त्यावर स्ट्रीटलाईट अपुरी असल्याने या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा अड्डा निर्माण झाला आहे. बाहेरून येणारी ही मंडळी सुसाट वेगाने बाईक चालवत असतात. दिवसेंदिवस यांची संख्या वाढत असून या परिसरात ड्रग्स सेवन करताना जे साहित्य वापरले जाते, ते मोठ्या प्रमाणात सर्वत्र पडलेले आढळत आहे.

उपवन तलावाजवळ राजरोसपणे ड्रग्सचे सेवन केले जाते. त्या परिसरात एका बाजूला इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे तर दुसर्‍या बाजूला पालादेवी मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. उपवन तलावाचा भाग दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतो. त्यामुळे हद्दीच्या वादात याकडे दोन्ही पोलीस ठाण्यांकडून दुर्लक्ष होत असल्यानेच हा प्रकार होत आहे. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्या समोर आल्या आहेत. लोकांनी वारंवार मागणी करूनही यावर कायमस्वरुपी उपाययोजना होत नाही. हे प्रकार सुरु राहिल्यास शिवसेना स्टाईलने याचा बिमोड करण्यात येईल. येथील जागृत नागरिकांना याबाबत काहीही माहिती मिळाली अथवा अशा गोष्टी करताना कोणी आढळला तर त्यांनी तात्काळ स्थानिक नगरसेवक किंवा पोलिसांना कळवावे असे आवाहन मी याद्वारे करीत आहे.
– नरेंद्र सूरकर, स्थानिक नगरसेवक.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here