घरमुंबईतरूण पिढीत वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण...

तरूण पिढीत वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण…

Subscribe

घटस्फोटामुळे डगमगणारी कुटुंब संस्था वाचवण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनाची गरज असल्याचं मत, ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक माधवी देसाई यांनी व्यक्त केलं.

साधारण तीस वर्षांपूर्वी ४० ते ५० वर्ष वयोगटातील जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक होते. मात्र, गेल्या काही वर्षांत तरुण जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढलं आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, आजकाल लग्न झाल्यानंतर एक वर्षात घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे. त्यामुळे कुटुंब संस्था वाचवण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनाची गरज असल्याचं मत ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक माधवी देसाई यांनी व्यक्त केलं आहे. डोंबिवली पत्रकार संघानी ‘कुटुंब संस्थेचे बदलते स्वरुप ‘या विषयावर आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 मुलींकडून अधिक मागणी

माधवी देसाई यांनी यावेळी सांगितलं की, ‘सध्या तरुणांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून यामध्ये तरुण विवाहित मुलींचे प्रमाण जास्त आहे. यामुळे कुटुंबसंस्था विस्कटीत होत असून, लहान मुलांवर त्याचा परिणाम होत आहे. यासाठी आता विवाहपूर्व समुपदेशानाची गरज आहे’. पूर्वी घटस्फोटाचा निर्णय हा इमोशनल असायचा. महिलांचे हात सही करताना थरथरायचे पण आता त्या प्रॅक्टिकल झाल्याचं दिसून येतं. विवाहित तरुण जोडपी आता स्वतः निर्णय घेऊन कोर्टात येतात. मुली अधिक प्रमाणात केसेस फाईल करतात. सध्या शिक्षणाने प्रगल्भता आल्याने महिला ठामपणे घटस्फोटाचा निर्णय घेताना दिसतात, असंही त्या म्हणाल्या.

पुरुषप्रधान संस्कृतीला तडा

पिढयान-पिढया चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतिला आता तडे जाऊ लागले आहेत.स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचे वारे वाहू लागले आहेत. स्त्रियांचे सबलीकरण, आर्थिक स्वावलंबन, यामुळे  वैवाहिक नात्यातील पती-पत्नीची भूमिका बदलत आहे.दोघेही अर्थाजन करत असून घरातील कामाची वाटणीही समान असावी या स्त्रियांच्या अपेक्षांची पूर्तता पुरुषांकडून तितकीशी होताना दिसत नाही, कुटुंब पातळीवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा मिळवण्याच्या धडपडीत अपेक्षाभंगाचे दुख पदरी आले की नाते संबंधांना तडा जाताना दिसतोय, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

कुटुंबसंस्थेत अस्थिरता

पत्नीला करियरमध्ये पुढे जाताना कुटुंबातून आधार मिळाला नाही तर त्यातूनही नैराश्य येऊन स्त्रिया वैवाहिक नाते संबंधातून बाहेर पडत असल्याचे, देसाई यांनी सांगितले. दरम्यान घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे कुटुंब संस्थेला अस्थिर करण्यास कारणीभूत असून, अस्थिर कुटुंबातून मुलांचे संगोपन नीट होत नाही असंही त्या म्हणाल्या.

काय सांगते आकडेवारी?

 ठाणे कौटुंबिक न्यायालयात करण्यात आलेले घटस्फोटाचे अर्ज :
वर्ष 2015 – 1,067
वर्ष 2016 – 1,188
वर्ष 2017 – 1,219
वर्ष 2018- 1,205
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -