घरमुंबईसाध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा; कोर्टाने याचिका फेटाळली

साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा; कोर्टाने याचिका फेटाळली

Subscribe

मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता भोपाळमधून निवडणूक लढणवण्याचा प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञा ठाकूरला मोठा दिसाला मिळाला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता भोपाळमधून निवडणूक लढणवण्याचा प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाने सुनावणी दरम्यान असे सांगितले की, लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या उमेदवारीला स्थगिती देणे हे आमचे काम नाही. तर हे निवडणूक आयोगाचे काम आहे. आरोपींना निवडणूक लढवण्यास कोर्ट रोखू शकत नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. तसंच, कोर्टाच्या जजने हे देखिल सांगितले की, ज्यांनी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकाकर्त्याने याचिकेवर आपली सही केली नव्हती.

- Advertisement -

काय म्हणाले कोर्ट

सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितेल की, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तब्येतीच्या कारणावरुन जामीन देण्यात आला आहे. तसंच त्या कोर्टाच्या सुनावणी दरम्यान हजर राहत नाही. मात्र त्या निवडणूक प्रचार करत आहेत. टिव्हीवर मुलाखत देत आहेत. साध्वींनी एका मुलाखतीमध्ये उपचार सुरु असल्याचा देखील दावा केला आहे. मात्र साध्वी तब्बेत बरी नसल्याचा दावा करतात पण असे कुठेच दिसत नाही की त्या बऱ्या नाहीत. दरम्यान, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत उमेदवाराला विरोध करणे हे कोर्टाचे काम नसल्याचे कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान, साध्वींचे वकील जेपी मिश्रा यांनी सांगितले की, साध्वी यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे. एक डॉक्टर सतत त्यांच्यासोबत असतो. त्या एक विचारधारा आणि देशासाठी निवडणूक लढत आहेत. त्या सिध्द करुन दाखवू इच्छितात की, भगवा दहशतवादासारखे काही नाही. या कारणास्तव त्या निवडणूक लढवत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. याच्यविरोधात मालेगाव बॉम्बस्फोटातील एका पीडितेच्या वडिलांनी साध्वीच्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. नासीर अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली होती. साध्वी यांना निवडणूक लढवण्याची परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोर्टाने यावर साध्वी यांना उत्तर देखील मागवले होते. त्यावर साध्वी यांनी सांगितले होती की, ही याचिका राजकारणाशी प्रेरित आहे. हा केवळ एक पब्लिसिटी स्ंट आहे. याचिकाकर्ता कोर्टाची वेळ वाया घालवत आहे. त्याच्यावर दंड आकारत ही याचिका फेटाळावी असे साध्वींनी म्हटले होते.

- Advertisement -

जामीनावर आहेत साध्वी

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता तर १०० जण जखमी झाले होते. या प्रकरणात साध्वीसह अनेक जण संशयित आरोपी आहेत. एनआयएने तपासानंतर साध्वी यांना क्लीनचिट दिली होती. मात्र कोर्टात हे प्रकरण अद्याप सुरु आहे. सध्या साध्वी जामीनावर बाहेर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -