घरमुंबईदूध भेसळ करणार्‍यांना जन्मठेप

दूध भेसळ करणार्‍यांना जन्मठेप

Subscribe

दूध भेसळीचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम पाहता महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने आता कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित दूध भेसळीचा परिणाम असल्याने एफडीएने आता कायद्यात बदल करण्यासाठी दोषींना थेट जन्मठेप व्हावी म्हणून प्रस्ताव राज्य सरकारपुढे मांडला आहे. सध्याची शिक्षेची तरतूद ही अतिशय कमी असल्यानेच एफडीएमार्फत हा प्रस्ताव राज्य सरकारसमोर मांडण्यात आला आहे. एफडीएने गेल्या काही कालावधीत दूध भेसळीची अनेक प्रकरणे उघडकीस आणल्यानंतर अशा प्रकारांना रोखण्यासाठी हा प्रस्ताव मांडला आहे. या दूध भेसळीचे आरोग्यावरही अनेक परिणाम होतात.

दूध भेसळीचे आरोग्यावर परिणाम

इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासात दूध भेसळीच्या प्रकारामुळे क्षयरोग होत असल्याचे आढळले होते. दुधामध्ये युरियाची भेसळ होत असल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंड, यकृत आणि ह्रदयावर होत असल्याचे निदर्शनास आले होते. भारतीय दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीमुळे २०२५ पर्यंत ८७ टक्के नागरीक कॅन्सर आणि इतर घातक आजाराचे शिकार होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे. तर केंद्रातली संस्था फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय)ने दुधाची भेसळ ६८.७ टक्क्यांपर्यंत होत असल्याचे नमूद केले आहे.

- Advertisement -

एफडीएची कारवाई

उच्च न्यायालयानेही अन्न व औषध प्रशासनाला दूध भेसळीवर आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केली अशी विचारणा सातत्याने केली आहे. दूध भेसळीवर कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील प्रमुख पाच चेक नाक्यांवर वाशी, दहिसर, मुलुंड (पूर्व), ऐरोली, मुलुंड (एलबीएस रोड) याठिकाणी २२७ दूध टँकर आणि वाहनांची तपासणी केली होती. या कारवाईत विभागाच्या फूड इन्स्पेक्टर्सने ९ लाख २२ हजार लीटर दूध तपासले होते. त्यापैकी १९२५० लीटर दुधामध्ये माल्टोडेर्क्स्टीन , साखर, अमोनियम सल्फेट अशा प्रकारची भेसळ आढळली. या कारवाईदरम्यान जवळपास ५ लाख ७१ हजार रूपयांचा दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. फॅट आणि एसएनएफ कमी आढळलेले ३५०० लीटर इतके १ लाख ३० हजार रूपयांचे दूध या कारवाई दरम्यान आढळले. दुधात भेसळ करणार्‍यांविरोधात भारतीय दंड संहिता कलम २७२ आणि २७३ नुसार दूध भेसळ आणि भेसळयुक्त अन्नाचा पुरवठा केल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्यात येत आहे. एप्रिल २०१६ ते २०१७ या कालावधीत १८६१ दुधाचे नमुने एफडीएच्या कार्यशाळेत तपासण्यात आले. तर २०१७-१८ या कालावधीत २१३८ नमुने तपासण्यात आले. तर एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ४०८ नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये अनेक नमुने हे आरोग्यासाठी अपायकारक आढळले.

दुधात काय भेसळ केले जाते ?

दुधामध्ये मुख्यत्वेकरून माल्टोडेर्क्स्टीनची, अमोनियम सल्फेट, युरिया, सुक्रोस यासारख्या केमिकल्सचा वापर होतो. तसेच पाणी आणि साखरेचा वापर करूनही दुधात भेसळ केली जाते. तसेच स्टार्कचा वापरही दुधात भेसळ करण्यासाठी केला जातो. काही प्रकारात खाण्याचा सोडा, कपडे धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडरीचाही वापर केला जातो. अनेक दुध उत्पादकांकडून दुधामधील फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी तसेच दुधातला स्निग्धांश आणि एसएनएफ वाढवण्यासाठी प्रत्येक प्रकाराने प्रयत्न केले जातात. एसएनएफ वाढवण्याच्या प्रकारात दुधातील पोषणमूल्य वाढवण्यासाठी अनेक गैरपद्धतीने याचे प्रमाण वाढवले जाते. एसएनएफमध्ये कॅसेन, लॅक्टोज, व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा समावेश होतो.

- Advertisement -

मुंबई ग्राहक पंचायतीचा अभ्यास
मुंबई ग्राहक पंचायतीने याआधी शुद्ध दूध – आपला अधिकार ही राज्यव्यापी मोहीम २०१४-१५ सालात राबविली होती. मोहीमेअंतर्गत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात हजार नमुने तपासण्यात आले होते. सुमारे ३० टक्के ग्राहकांना भेसळयुक्त दूध मिळत आहे. तसेच ४६ टक्के ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे दूध मिळत आहे असा अहवाल मुंबई ग्राहक पंचायतीने राज्य सरकारला सादर केला होता.

दूध भेसळीसाठी शिक्षा
सध्या भारतीय दंड संहिता कलम २७२, २७३ नुसार दुधात भेसळ करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येते. या कलमानुसार सहा महिन्यांपर्यंत कमाल तुरुंगवास किंवा हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा करण्यात येते.

एफडीएचा प्रस्ताव

दूध भेसळीच्या प्रकारात एफडीएने राज्य सरकारला सध्याची ६ महिन्यांची कमी असलेली शिक्षा वाढवावी असा प्रस्ताव मांडला आहे. कायद्यामध्ये सुधारणा करत ही शिक्षा जन्मठेपेची व्हावी असा प्रस्ताव महाराष्ट्र एफडीएने मांडलेला आहे. पण ही कायदा दुरूस्तीची प्रक्रिया अतिशय वेळ घेणारी आहे. या प्रस्तावावर मंत्रिमंडळात चर्चा होईल. त्यानंतर राज्यसरकारमार्फत हा प्रस्ताव चर्चेसाठी दोन्ही सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. दोन्ही सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्रात पाठवण्यात येईल. केंद्राने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीने या कायदा दुरूस्तीबाबतचे गॅझेट नोटीफिकेशन जाहीर होईल. त्यानंतर महाराष्ट्रात या नव्या कायदादुरूस्तीनंतर अधिक कठोर शिक्षा करणे शक्य होईल. दुसर्‍या पर्यायाअंतर्गत महाराष्ट्र पोलिस कायद्याअंतर्गत राज्य सरकार हा कायद्यातली दुरूस्ती करू शकते. पण या कायद्यातील बदलासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींची मंजुरी गरजेची असेल.

चीनमध्ये फाशी, भारतातही काही राज्यांमध्ये जन्मठेप

चीनमध्ये दुधात मॅलेमाईनचा समावेश केल्याने मुलांच्या किडनीवर परिणाम झाला. त्यामुळे दोघांना फाशी तर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तर भारतातही दूध भेसळीसाठी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि ओरिसा या राज्यांमध्ये याआधीच शिक्षेत जन्मठेप करणारी कायदा दुरूस्ती केली आहे.

आयपीसीनुसार दूध भेसळीचा प्रकार हा अदखलपात्र आणि जामीनसाठी पात्र असा गुन्हा आहे. म्हणूनच या कायद्यामध्ये अतिशय कठोर तरतूद करणे गरजेचे आहे. लवकरच हा कायदा दुरूस्तीबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर येणार आहे. त्यामुळे दूध भेसळ करणार्‍यांवर नक्कीच चाप बसेल.
गिरीश बापट

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -