घरमुंबईनागपूर वैद्यकीय सुरक्षारक्षक मारहाणप्रकरणी डॉक्टर पुन्हा करणार आंदोलन

नागपूर वैद्यकीय सुरक्षारक्षक मारहाणप्रकरणी डॉक्टर पुन्हा करणार आंदोलन

Subscribe

हॉस्पिटलमधील डॉक्टर्सच नाही तर सुरक्षारक्षक ही सुरक्षित नाहीत. त्यामुळे येत्या काळात डॉक्टर्स सरकार विरोधात आंदोलन पुकारतील असा धमकी वजा इशारा मार्ड संघटनेकडून देण्यात आला आहे.

राज्यातील निवासी डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीची प्रकरण वाढू लागली असतानाच डॉक्टरांना सुरक्षा देणाऱ्या सुरक्षारक्षकांना पुन्हा एकदा मारहाण झाल्याचे प्रकरण नव्याने समोर आले. याप्रकरणी डॉक्टरांनी निषेध व्यक्त करत या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर येत्या काळात डॉक्टर्स सरकार विरोधात आंदोलन पुकारतील असा धमकी वजा इशारा मार्ड संघटनेकडून देण्यात आला आहे.

डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार

५ फेब्रुवारी, २०१९ ला नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात जमावाने एमएसएफच्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याचा आरोप मार्डने केला आहे. आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेबाबत डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जातील, असा इशारा मार्डने दिला आहे. अशा आशयाचे पत्र देखील सरकारला पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यात आली. जवळपास १५० जणांच्या जमावाने सुरक्षारक्षकांना मारहाण केली. तो जमाव चाकू, सुरे शिवाय मारण्याची अनेक हत्यारं घेऊन रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे फक्त डॉक्टर्सच नाही तर सुरक्षारक्षक ही रुग्णालयात सुरक्षित नाहीत. असाच प्रकार आधीही घडला होता. असे पत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पाठवण्यात आले आहे. शिवाय, रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी मार्डने या पत्राद्वारे केली आहे.

याविषयी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सह व्यवस्थापक प्रवीण साळुंखे यांनी सांगितलं, “१० ते १२ जणांनी इंदिरा गांधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गोंधळ घातला. महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षारक्षकांसोबत त्यांनी हाणामारी केली. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

तर, केंद्रीय मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर यांनी सांगितलं की, “ रुग्णालयात कामासाठी योग्य असं वातावरण नाही. निवासी डॉक्टर आणि कर्मचारी सुरक्षित नाहीत. सरकारकडे वारंवार सुरक्षा देण्याची मागणी करत आहोत. सध्या एम एस एफचे ६८ सुरक्षारक्षक कार्यरत आहे, त्यात ३८ ते ४८ सुरक्षारक्षकांची वाढ करण्याचं तसंच पास आणि अलार्म सिस्टिमही कार्यरत करण्याचं आश्वासन मागील बैठकीत देण्यात आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डॉक्टरांना सुरक्षा द्या नाहीतर आम्हाला आमच्या संरक्षणासाठी बंदूक बाळगण्याचा परवाना द्यावा. याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि नागपूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सामूहिक रजेचं आंदोलन पुकारेल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -