शॉक ट्रीटमेंटने वाचवला बाळाचा जीव!

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका ४ दिवसांच्या बाळाचा जीव शॉक ट्रीटमेंटने वाचवण्याच डॉक्टरांना यश आलं आहे.

Navi Mumbai
shock treatment for child

नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये नुकतीच एका चार दिवसाच्या बाळाला इलेक्ट्रिकल कार्डिओव्हर्जन पद्धतीने म्हणजेच शॉक ट्रीटमेंट देऊन जीवदान देण्यात आलं आहे. गेल्याच आठवड्यात या बाळाच्या हृदयाचे ठोके वाढल्यामुळे एका महिलेची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली होती. प्रसूतीनंतरही बाळाची प्रकृती स्थिर न झाल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं होतं. पहिले दोन दिवस औषधं आणि इतर उपचार करून बाळाच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण, त्या उपचाराला यश न आल्यामुळे बालहृदय शल्यचिकित्सक डॉ. भूषण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बाळाला शॉक ट्रीटमेंट देऊन त्याच्या हृदयाचे ठोके पूर्ववत करण्यात आले.

चौथ्या दिवशी वाचले बाळाचे प्राण

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे बालहृदय शल्यचिकित्सक डॉ. भूषण चव्हाण यांनी सांगितलं की, ‘बाळ पोटामध्ये असताना बाळाच्या हृदयाचे ठोके जर वाढत असतील तर लगेचच सिझेरियन पद्धतीने प्रसूती करून बाळाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही चौथ्या दिवशी बाळाला इलेक्ट्रिकल कार्डिओव्हर्जन पद्धती म्हणजेच शॉक ट्रीटमेंट दिल्यावर बाळाच्या हृदयाचे ठोके नॉर्मल झाले आणि सातव्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. नवजात बालकांमध्ये ह्रदयस्पंदन वेगाने होण्याच्या आजाराला सुप्रा व्हेंट्रिकुलर टॅकिकार्डिया संबोधले जाते. हृदयस्पंदनाचा वेग दर मिनिटाला ९० असायला हवा. पण, या प्रकरणात या बाळाच्या हृदयस्पंदनाचा वेग २०० होता आणि अशावेळी त्याला शॉक ट्रीटमेंट देऊन त्याच्या हृदयस्पंदनाचा वेग पूर्ववत करण्यात यशस्वी झालो.’


हेही वाचा – पुण्यात ‘वॉर्डबॉय’ बनला डॉक्टर; गर्भवतीवर केले उपचार

गर्भवती महिलांनी काळजी घेणं आवश्यक

दरम्यान, महिलांनी गर्भवती असताना किंवा प्रसूतीच्या वेळी पुरेशी काळजी न घेणं किंवा त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होणं, यातून असे प्रकार उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी मातेचे आरोग्य, अर्भकाची सुरक्षितता, अर्भकाचा जन्म होताना असलेली परिस्थिती याचे सतत परीक्षण करणे आवश्यक असते. महाराष्ट्र सरकारच्या गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत १३ हजार ५०० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता आणि यामध्ये २१ टक्के बालके जन्म झाल्यानंतर २८ दिवस ते १ वर्षांत दगावली आहेत. गर्भवती महिलेला रक्तदाब, मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा विकार असणे, गर्भाशयात दोष असणे, लसीकरणाचा अभाव, गर्भ पोटात असताना जड वस्तू उचलणे, खूप शारिरीक कष्ट, आहारात योग्य अन्न घटकांचा अभाव अशा गोष्टी लहान मुलं दगावण्यासाठी कारणीभूत ठरतात.


हेही वाचा – कर्करोग-मधुमेहावर सर्पविषातून उपचार शक्य

भारतामध्ये एक हजार नवजात बालकांपैकी ८ ते १० बालकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार असल्याचं आढळून येतं. त्यामुळे, प्रसूती होताना माता आणि अर्भकाची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन योग्य वैद्यकीय निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेताना अथवा वैद्यकीय उपचारास थोडाही विलंब झाला तर माता आणि अर्भकाच्या जीवाला धोका पोहचू शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here