घरमुंबईरुग्णवाहिनी चालकांना रुग्ण हाताळण्याचे प्रशिक्षण

रुग्णवाहिनी चालकांना रुग्ण हाताळण्याचे प्रशिक्षण

Subscribe

आरटीओचा भारतातील पहिला उपक्रम ठाण्यात

रस्त्यात अपघात झाला आणि तत्काळ रुग्णवाहिका आली तरी अनेकदा रुग्णवाहिकेतील चालकाला प्रथमोचार करता येत नाही. त्यामुळे अनेकदा कठीण समस्या उभी राहते. परंतु, आरटीओ (ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने) कौतुकास्पद काम केले आहे. रस्ते सुरक्षा सप्ताहात आरटीओने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रस्ते दुर्घटनेत अपघात झालेल्या व्यक्तीला चालकाने रुग्णालयात कसे घेऊन जायचे याचे प्रशिक्षण दिले आहे. असे प्रशिक्षण देणारा हा विभाग देशातील पहिला विभाग ठरला आहे. यावेळी ठाण्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालयासह प्रसिद्ध खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिनींचे चालक सहभागी झाले होते.

बहुतांशी रुग्णवाहिकेतील चालकांना अपघातस्थळी दुर्दैवी घटना झालीच तर त्वरित प्रथमोचार करता येत नाही. अशा चालकांसाठी नामवंत डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णवाहिनी चालकांना अपघात झालेल्या रुग्णांना काय हाताळायचे? त्याला रुग्णवाहिणीत टाकून रुग्णालयापर्यंत कसे पोहोचवायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयासह ठाण्यातील इतर महत्त्वाच्या रुग्णालयांच्या रुग्णवाहिन्यांचे २३ हून अधिक चालक सहभागी झाले होते. या चालकांना डॉ. रिटा सावला, जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भंडारी आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाला रुग्णालयापर्यंत कसे घेऊन जायचे? याचे प्रशिक्षण दिले. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे प्रशिक्षण देशातील एकमेव ठरले आहे.

- Advertisement -

देशात पहिल्यांदाच रुग्णवाहिनी चालकांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेकदा रुग्णवाहिनी चालकांना अपघात झालेल्या रुग्णाला कसे हाताळायचे याचे ज्ञान नसते. त्यामुळे जखमी रुग्णाला उचलताना अपघातग्रस्त रुग्णांची ८० टक्के हानी होते. त्याचा भुर्दंड रुग्णांना भोगावा लागतो. मात्र, या प्रशिक्षणामुळे आता रुग्णांना व्यवस्थितपणे रुग्णालयात पोहचवता येणार आहे. अशा प्रशिक्षणाची गरज असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -