घरमुंबईनागपाडा येथे गारमेंट आणि लेदर कारखान्यात छापा

नागपाडा येथे गारमेंट आणि लेदर कारखान्यात छापा

Subscribe

पंधरा बालकामगारांची सुटका तर सहा जणांना अटक

नागपाडा येथे गारमेंट आणि लेदर कारखान्यांत मंगळवारी दुपारी गुन्हे शाखेच्या जापू विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून पंधरा बालकामगारांची सुटका केली. या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली आहे. सुटका केलेल्या बालकामगारांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून सहाही आरोपींना पुढील चौकशीसाठी नागपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र माने यांनी सांगितले.

नागपाडा परिसरातील गारमेंट आणि लेदर वर्क्स कारखान्यात काही अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून कमी मोबदल्यात जास्त तास काम करून घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस शिपाई रामचंद्र माने यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली जापू विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यासह प्रथम संस्थेचे पदाधिकारी आणि कामगार विभागाच्या अधिकार्‍यांनी आर. एस. निमकर मार्गावरील गुलशन कंपाऊंडमध्ये असलेल्या लेदर आणि गारमेंट कारखान्यात छापा टाकला होता.

- Advertisement -

सर्व मूळचे उत्तर भारतीय
दुपारी बारा वाजता पोलिसांनी पाच ते सहा कारखान्यांत छापा टाकून तेथून पंधरा बालकामगारांची सुटका केली. बारा ते सोळा वयोगटातील ते सर्व बालकामगार मूळचे उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवाशी आहेत. या सर्वांना नोकरीचे आमिष दाखवून मुंबईत आणून त्यांच्याकडून जास्त वेळ काम करुन कमी मोबदला दिला जात होता. त्यांना तिथे काम करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नंतर कारखान्यातील मालकासह व्यवस्थापक अशा सहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादंविसह बालकामगार प्रतिबंधक कायदा आणि जे. जे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आज न्यायालयात हजर करणार
अटकेनंतर या सर्वांना पुढील चौकशीसाठी नागपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांना बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र माने यांनी सांगितले. दरम्यान सर्व बालकामगारांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून त्यांच्या पालकांना संपर्क साधून नंतर त्यांचा ताबा पालकांना देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -