घरमुंबईवसईत सासूने केली सूनेची हत्या

वसईत सासूने केली सूनेची हत्या

Subscribe

घरगुती वादातून सासूने सुनेच्या डोक्यावर फ्लॉवर पॉट मारून हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सूनेची हत्या केल्यानंतर सासू स्वतःहून माणिकपूर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर खूनाचा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी सासूला अटक केली आहे.

आनंदी माने असे सासूचे नाव असून तिने सकाळी सव्वा नऊच्या सुमारास माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन सून रिया माने ( 32) हिला फ्लॉवर पॉटने मारल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी रिया मानेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

- Advertisement -

रिया माने आपला पती आणि सहा महिन्यांच्या मुलीसह पंधरा दिवसांपूर्वीच अमेरिकेहून वसईत सासू आनंदी माने यांच्या नवघर-माणिकपूर शहरातील ओम नगरातील घरी आली होती. सकाळी रियाचे सासरे आणि नवरा मॉर्निंग वॉकला घराबाहेर गेले असताना सासू-सुनेत वाद झाला. त्यावेळी संतापाच्या भरात सासू आनंदीने घरातील फ्लॉवर पॉटने रियाला मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या रियाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर आनंदीने माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगिली.

सासू आनंदीला रिया लग्नापासूनच पसंत नव्हती. आपल्या मुलाला रियाने आपल्यापासून दुरावले ही खंत तिच्या मनात होती. त्याचबरोबर रियाचे नावही तिला पसंत नव्हते. त्यामुळे सासू-सुनेत नेहमी वाद होत असत. आनंदीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत इतकीच प्राथमिक माहिती हाती आली आहे. सध्या अधिक चौकशी सुुरु असून कुटुंबातील इतर सदस्यांच्या चौकशीत अधिक माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -