घरमुंबईदारुच्या नशेत बडबडले, खुनाच्या गुन्ह्यात पकडले गेले

दारुच्या नशेत बडबडले, खुनाच्या गुन्ह्यात पकडले गेले

Subscribe
साकिनाका येथे मोहम्मद सिराज खान या तरुणाच्या हत्येनंतर पळून गेलेल्या दोन मारेकर्‍यांना तब्बल एक वर्षांनी साकिनाका पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना शिताफीने अटक केली. अरुण गुलाबचंद जैयस्वाल ऊर्फ गुल्लू आणि इरफान सत्तार खान अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने 13 डिसेंबरला पोलीस कोठडी आहे. दारुच्या नशेत केलेल्या बडबडीनंतर या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अक्षय अ‍ॅन्थेनी रेगो आणि मोहम्मद सिराज शेख हे दोघेही मित्र असून साकिनाका येथील गणेशनगर, परेरावाडीत राहतात. 15 डिसेंबर 2017 रोजी अक्षयचा पगार झाला होता. त्यामुळे तो मोहम्मद सिराजसोबत चायनीय खाण्यासाठी जात होता. रात्री पाऊणच्या सुमारास जेवणानंतर ते दोघेही साईबाबा मंदिराजवळून जात होते. यावेळी त्यांचा काही अज्ञात व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यावेळी अज्ञातांनी या दोघांना सिमेंटच्या विटांनी बेदम मारहाण केली. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. हल्ल्यानंतर मारेकरी तेथून पळून गेले होते.
सिराजचा मारहाणीत मृत्यू
ही माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरु असताना मोहम्मद सिराजचा मृत्यू झाला होता तर अक्षयला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकर्‍यांविरुद्ध मारामारीसह हत्या, हत्येचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
एक वर्ष मारेकर्‍यांचा गुंगारा
गेल्या एक वर्षापासून पोलीस मारेकर्‍याचा शोध घेत होते. मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. अक्षयच्या जबानीवरुन पोलिसांनी मारेकर्‍याचे स्केच बनवून खबर्‍याच्या मदतीने त्यांचा शोध सुरु केला होता. एक वर्षांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शनिवारी अरुण जैयस्वाल आणि इरफान खान या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, चौकशीत त्यांनीच ही हत्या केल्याची कबुली दिली.
मित्रांना माहिती सांगितली
काही दिवसांपूर्वी ते दोघेही मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते, यावेळी त्यांनी दारुच्या नशेत साकिनाका येथे घडलेला प्रकाराची माहिती त्यांच्या मित्रांना दिली होती. ही माहिती या मित्रांकडून पोलीस खबर्‍यांना समजली आणि या हत्येचा पर्दाफाश झाला असे पोलिसांनी सांगितले. ते दोघेही पूर्वी साकिनाका परिसरात राहत होते, मात्र तीन महिन्यांपूर्वीच ते माहुल रोडवर राहण्यासाठी गेले होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -