घरमुंबईनवी मुंबई पालिका क्षेत्रात विनापरवाना मांसविक्री

नवी मुंबई पालिका क्षेत्रात विनापरवाना मांसविक्री

Subscribe

मनपाच्या नोटीसीला मांस विक्रेत्यांकडून केराची टोपली

कत्तलखान्याला परवानगी नाकारणारे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन अनधिकृत मांस विक्री करणार्‍यांना पाठीशी घालत असल्याचे उघड्यावर होणार्‍या मांस विक्री वरून दिसून येत आहे. शहरात फक्त 100 मांस विक्रीची दुकाने अधिकृत असून उरलेली जवळपास 500 हून अधिक दुकाने विनापरवाना सुरू असल्याचे चित्र आहे. अनधिकृतपणे सुरू असलेल्या या दुकानदारांकडे कीटकनाशक फवारणी, कामगारांचे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रही विक्रेत्यांकडे नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत दुकान स्वच्छतेचे सर्व निकष धाब्यावर बसविले असून त्यांच्यामुळे मांसाहार करणार्‍यांचे व इतर नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने राजरोसपणे उघड्यावर व्यवसाय सुरू असल्याने या विरोधात मुख्यवैद्यकीय अधिकार्‍याकडे तक्रार करण्याचा इशारा शेकापकडून देण्यात आला आहे.

शहरात चिकन, मटण व मांस विक्री करणार्‍यांनी महापालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. परवाना घेण्यासाठी जागेचा परवाना, व्यावसायिक मालमत्ताकर भरल्याचा पुरावा, जागेचे क्षेत्रफळ, पाणी बिल भरल्याची पावती, कीटकनाशक फवारणी केल्याचे प्रमाणपत्र, या दुकानांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. यावर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात सुमारे पाचशेहून अधिक दुकाने नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधील 100 जणांकडेच अधिकृत परवाना आहे. उर्वरित 500 जण विनापरवाना व्यवसाय करत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने अनेक वेळा संबंधितांना नोटीस पाठविल्या आहेत. यात केवळ कागदी घोडे नाचवण्याचा व्यतिरिक्त प्रत्यक्षात काहीच कारवाई करण्यात न आल्याने अनधिकृतपणे मांस विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनी मनपाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे.

- Advertisement -

महापालिकेने अवैधपणे व्यवसाय करणार्‍यांविषयी धोरण तयार केले आहे.अनधिकृतपणे मांस विक्री करणार्‍यांना नोटीस बजावणे. यानंतरही सदर दुकाने सुरूच राहिल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करता येते. जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव करणे व रक्कम महापालिकेमध्ये जमा करण्याची तरतूद आहे. परंतु आरोग्य विभाग संबंधितांवर कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.

मनपाक्षेत्राच्या विविध विभागात नियमबाह्य मांस विक्रते आपला व्यवसाय आजही राजरोसपणे करत आहेत.यांच्यावर कुणाचेही अंकुश नसल्याने ते निर्ढावलेले असून त्यावर कारवाई करावी. अशी मागणी नवी मुंबई शेकापकडून मुख्यवैद्यकीय अधिकार्‍याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
-गोविंद साळुंखे, सरचिटणीस, शेकाप कार्यालयीन

- Advertisement -

अनधिकृत मांस विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना दिले जातील. त्याच बरोबर मनपा परिसरातील दुकानांची चौकशी केली जाईल.
– डॉ.दयानंद कटके, मुख्यवैद्यकीय अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -