घरक्रीडानोव्हाक पुन्हा एकदा विम्बल्डनचा राजा

नोव्हाक पुन्हा एकदा विम्बल्डनचा राजा

Subscribe

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाकने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव करत विम्बल्डनचे जेतेपद पटकावले.

टेनिस जगतातील मानाची मानली जाणारी विम्बल्डन स्पर्धा नुकतीच लंडनमध्ये पार पडली. ज्यात पुरूष गटाच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचने दक्षिण आफ्रिकन केविन अँडरसनचा ६-२, ६-२, ७-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील चौथे विम्बल्डन तर तेरावे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले.

असा होता मॅचचा थरार

केविन अँडरसन आपल्या पहिल्याच विम्बल्डन अंतिम सामन्यात खेळत होता. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीपासूनच अँडरसन आणि जोकोविच यांच्या अनुभवातील तफावत दिसून आली. जोकोविच संयमाने खेळ करत होता तर अँडरसनवर अंतिम सामन्याचा दबाव दिसून येत होता. जोकोविचने अँडरसनची पहिलीच सर्विस मोडून काढत आक्रमक सुरुवात केली. तर आपली सर्विस त्याने अँडरसनला मोडू दिली नाही. जोकोविचने आणखी एकदा अँडरसनची सर्विस मोडली. त्यामुळे अँडरसनला आपल्या सर्विसवर फक्त २ गेम जिंकता आले. याचा फायदा घेत जोकोविचने पहिला सेट ६-२ असा जिंकला.
तर दुसर्‍या सेटची सुरुवातही पहिल्या सेटसारखीच झाली. जोकोविचने पुन्हा अँडरसनची पहिलीच सर्विस मोडली. त्यामुळे अँडरसनचा आत्मविश्वास खालावला आणि जोकोविचने त्याची आणखी एक सर्विस मोडली. तर जोकोविचने आपली सर्विस मोडायची अँडरसनला संधीच दिली नाही. त्यामुळे पहिल्या सेट सारखाच दुसरा सेटही जोकोविचने ६-२ असा जिंकला.
तिसर्‍या सेटमध्ये मात्र, अँडरसनने जोकोविचला चांगला लढा दिला. त्याने जोकोविचला आपली सर्विस मोडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे हा सेट टाय ब्रेकरमध्ये गेला. ज्यात नोवाकने पुन्हा आपली जादू दाखवत ७-३ असा टाय ब्रेकर जिंकत सामनाही जिंकला. या विजयामुळे त्याने विम्बल्डनचे जेतेपदी पटकावले. हे त्याचे चौथे विम्बल्डन जेतेपद होते. तर २०१६ नंतर हे त्याचे पहिले ग्रँड स्लॅम ठरले.

- Advertisement -


याआधी नोव्हाकने स्पेनच्या राफेलला तर केविनने स्वित्झरलँडच्या रॉजररला पराभूत करत अंतिम सामन्यात जागा मिळवली होती, दोघांनीही जगातील टॉपच्या खेळांडूना पराभूत करत अंतिम सामना गाठल्यामुळे या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ज्यात नोव्हाकने विजय मिळवत विम्बल्डनच्या ट्रॉफीवर नाव कोरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -