Viral Video: हत्तीवर बसून योगा करत होते रामदेव बाबा; हत्ती हलला आणि

रामदेव बाबा योगा करताना हत्तीवरुन खाली पडले; व्हिडिओ व्हायरल

योगगुरु बाबा रामदेव हे योगासाठी चांगलेच लोकप्रिय आहेत. मात्र मथुरेतील एका आश्रमात हत्तीवर बसून योगा करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. हत्तीवर बसून योगा शिकवत असलेले रामदेव बाबा हत्तीच्या चालीमुळे थेट जमिनीवर कोसळले. हत्तीवरुन खाली पडण्याचा २२ सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप सारख्या सोशल मीडिया साईटवर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक एकाबाजुला या व्हिडिओची मजा घेत असताना दुसऱ्या बाजुला रामदेव बाबा यांना इजा तर झाली नाही ना? अशीही काळजी व्यक्त करत आहेत. आश्रमाने दिलेल्या माहितीनुसार रामदेव बाबांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

मथुरेतील शरणानंद आश्रम रामनरेती येथे रामदेव बाबा आश्रमातील साधूंना योग शिकवत होते. आश्रमाचे प्रमुख संत गुरु शरणानंद महाराज हे देखील या योग शिबिरात सामील झाले होते. यावेळी रामदेव बाबा आश्रमातील हत्तीवर बसून प्राणायम करत होते. मात्र हत्तीने हालचाल करायला सुरुवात केली आणि रामदेव बाबांचा तोल गेला आणि ते हत्तीवरुन थेट जमिनीवर पडले.

आश्रमातील जमिनीवर बऱ्यापैकी वाळू असल्यामुळे हत्तीवरुन पडल्यानंतर रामदेव बाबांना फार इजा झाली नाही. ते जमिनीवरुन हसत हसतच उठले. बाबा रामदेव लोकप्रिय असल्यामुळेच त्यांच्या या २२ सेकंदाच्या व्हिडिओला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. सामान्य माणसाला जमणार नाहीत, अशी योगासने बाबा रामदेव करत असतात. मध्यंतरी रामदेव बाबा सायकलवरुन पडल्याचा व्हिडिओ देखील असाच व्हायरल झाला होता.

मथुरेतील एका आश्रमात हत्तीवर बसून योगा शिकवत असताना रामदेव बाबा हत्तीवरुन खाली पडले.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, October 13, 2020