स्वत:ला आग लावून प्रेयसीला केलं प्रपोज, तिनंही दिला ‘होकार’!

propose with fire on body viral 1

हल्ली कुठे काय घडेल, याचा काही नेमच नाही. त्यातही प्रेमात बुडालेल्या लोकांचं तर काहीच सांगता येत नाही. त्यातही प्रत्येकाच्या प्रपोज करण्याच्या अजब तऱ्हा असू शकतात. अशीच एका प्रियकराची अजब तऱ्हा पाहून एक प्रेयसी चांगलीच गडबडली. पण त्या गडबडीतही तिनं त्याच्या प्रपोजलचं होकारार्थी उत्तर दिलं आणि प्रियकराच्या या सगळ्या ‘कष्टा’चं चीज झालं! पण असं काय केलं या प्रियकरानं, की त्याच्या प्रेयसीनं त्याला झटक्यात होकार दिला? तर या पठ्ठ्यानं थेट स्वत:लाच आग लावून घेतली आणि जळत्या अंगानं जाऊन बसला प्रेयसीसमोर प्रपोज करायला. आता अशा स्थितीत तुमच्यासमोर कुणी येऊन बसलं, तर तुम्ही कशालाही हो म्हणाल हो! मग प्रेमाचा वायदा काय चीज आहे! पण हा पठ्ठ्या नक्की आहे तरी कोण आणि त्यानं असं का केलं असाव?

propose with fire on body viral

तर झालं असं की…

नॉटिंगहॅममध्ये राहणारा व्यवसायाने स्टंटमॅन असलेला रिकी अॅश आणि केंटमध्ये राहणारी व्यवसायाने नर्स असणारी कटरिना डॉबसन यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम! कटरिना कोरोना काळात रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करते, तर रिकी हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये स्टंटमॅनचं का करतो. त्या दिवशी रिकीनं कटरिनाला त्याच्या स्टुडिओमध्ये काहीतरी कारण सांगून बोलावून घेतलं. आरोग्य यंत्रणा आणि तुझ्यासारख्या असंख्य नर्स कोरोना काळात करत असलेल्या रुग्णसेवेवर एक संदेश देणारं फोटोशूट करायचंय, असं रिकीनं तिला सांगितलं. कटरिनाही त्याच्यावर विश्वास ठेऊन नर्सच्याच पेहेरावात तिथे आली.

आणि मग सुरू झाला भयानक स्टंट…

कटरिनाला काही कळायच्या आत रिकीला त्याच्या हेल्परनं मागच्या बाजूने आग लावली. रिकी स्टंटमॅन असल्यामुळे अशा गोष्टी तो नेहमीच करत असतो. त्यामुळे हा फोटोशूटचाच एक भाग असावा, असं वाटून कटरिना पुढे काय होणार, हे पाहात तिथेच उभी राहिली. तेवढ्यात रिकी गुडघ्यांवर बसला आणि त्यानं थेट खिशातून रिंग काढून कटरिनासमोर धरली. स्वत:ला आग लागलेली असताना रिकी त्या आगीत कटरिनाला प्रपोज करत होता. तिच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले. तेवढ्यात रिकी पोटावर पालथा झोपला आणि काही क्षणांच्या आत त्याच्या हेल्परने सराईतपणे आणि कमालीच्या व्यावसायिक कौशल्याने त्याच्या पाठीवर एक्स्टिंग्विशरने फवारा सोडला. आग काही सेकंदातच विझली!

रिकीनं आगीचं अचूक टायमिंग साधलं होतं…

‘कटरिना डॉबसन, तू माझ्याशी लग्न करशील का?’ एवढं बोलण्यासाठी लागणाऱ्या वेळासाठीच ती आग पेटती राहील असं परफेक्ट प्लॅनिंग रिकीनं त्याच्या हेल्परसोबत केलं होतं. त्यानुसार ती आग विझलीही. पण झाल्या प्रकारामुळे कटरिना मात्र पुरती हबकली होती. आणि अर्थात, आपल्या प्रियकराच्या या हटके अंदाजातल्या प्रपोजलला तिने होकार दिला! शेवटी प्रसारमाध्यमांशी बोलताना कटरिना म्हणते, ‘रिकीचं त्याच्या कामावर खूप प्रेम आहे. तो दिवस-रात्र हे स्टंट करत असतो. त्यामुळे त्याच्याकडून याहून सुंदर प्रपोजल कुठलं असणार होतं?’