घरट्रेंडिंगFIFA क्रेझ : 'मेस्सी'साठी भारतीय फॅनचा भन्नाट 'स्टंट'

FIFA क्रेझ : ‘मेस्सी’साठी भारतीय फॅनचा भन्नाट ‘स्टंट’

Subscribe

केरळमध्ये राहणाऱ्या क्लिफनने फुटबॉलच्या प्रेमापोटी चक्क ४ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला. दुबईवरुन सायकल चालवत निघालेला हा पठ्ठ्या थेट जाऊन पोहचला रशियामध्ये. एखाद्या गोष्टीच्या वेडापायी माणूस अगदी वाट्टेल ते साध्य करुन दाखवू शकतो, याची प्रचिती क्लिफनमुळे पुन्हा एकदा आली.

भारतीयांमध्ये क्रिकेट इतकेच फुटबॉलचेही वेड आहे. सध्या संपूर्ण जगभरात FIFA २०१८ ची क्रेझ पाहायला मिळते आहे. भारतीयही यामध्ये मागे नाहीत. कुणी एखाद्या फुटबॉल टीमचा चाहता आहे, तर कुणी एखाद्या विशिष्ट खेळाडूचा. भारतात राहणाऱ्या अशाच एका फुटबॉलवेड्याने त्याच्या लाडक्या प्लेअरसाठी नुकताच एक भन्नाट स्टंट केला आहे.

हजारो किलोमीटरचा ‘सायकल’ प्रवास…

केरळमध्ये राहणाऱ्या क्लिफन नावाच्या या युवकाने नुकताच आपल्या सायकलवरुन तब्बल ४ हजार किलोमीटरचा पल्ला पार केला. दुबईवरुन सायकल चालवत निघालेला हा पठ्ठ्या ४ हजार किलोमीटरचं अंतर पार करुन पोहोचला ते थेट रशियामध्ये. एखाद्या गोष्टीच्या वेडापायी माणूस अगदी वाट्टेल ते साध्य करुन दाखवू शकतो, याची प्रचिती क्लिफनमुळे पुन्हा एकदा आली.

- Advertisement -
सौजन्य- फेसबुक

‘मेस्सी’ला भेटण्यासाठी काय पण…

फुटबॉलचा खराखुरा चाहता असलेल्या क्लिफनचा आवडता खेळाडू आहे ‘मेस्सी’. फुटलची मॅच प्रत्यक्ष पाहता यावी आणि मुख्य म्हणजे मेस्सीला जवळून पाहता यावं, भेटता यावं यासाठी क्लिफनने ही हजारो किलोमीटरची सायकलस्वारी केली आहे. रशियामध्ये पोहचलेला क्लिफन आता लवकरच सायकलने मॉस्कोमध्ये जाणार आहे.

सौजन्य- फेसबुक

असा’ होता सायकल प्रवास

क्लिफनच्या या सायकलवारीची सुरुवात फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली होती. सुरुवातीला त्याने विमानाने भारत ते दुबई असा प्रवास पूर्ण केला. दुबईला पोहचल्यावर तिथे त्याने सायकल विकत घेतली आणि रशियाच्या दिशेने आपला प्रवास सुरु केला. दुबईवरुन निघालेला हा सायकलस्वार इराण – अझबैजा – जॉर्जिया असे ट्प्पे पार करत अखेर रशियामध्ये जाऊन पोहचला.

- Advertisement -
सौजन्य- फेसबुक

‘द विक’च्या मुलाखतीत शेअर केले अनुभव

दरम्यान रशियामध्ये पोहचलेल्या क्लिफनने ‘द विक’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या सायकल स्वारीचा अनुभव शेअर केला आहे. ‘हा सायकल प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला होता’, असं क्लिफनने सांगितलं. ‘द विक’शी बोलताना क्लिफन म्हणाला, ”सुरुवातीला इराण सारख्या देशात आपण जिवंत राहू की नाही याची भीती होती. मात्र, प्रत्यक्षात तिकडे पोहचल्यावरचा अनुभव पूर्णत: वेगळा होता. अनेक इराणी कुटुंबियांनी माझं जंगी स्वागत केलं. तिथले अनेक हिंदी भाषिक लोक तर चक्क बॉलीवूडचे चाहते आहेत. इराण प्रवासादरम्यान मला मशिदीत राहण्याचीही मुभा मिळाली.”

‘मात्र, तुलनेने अझबैजानचा अनुभव थोडासा खराब होता. तिथल्या बहुतांशी लोकांना इंग्रजी आणि हिंदी भाषा अजिबातच येत नसल्यामुळे, मला प्रवासादरम्यान अनेक अडचणी आल्या. अखेर तिथल्या एका मल्ल्याळी कुटुंबियांनी मला खूप मदत केली. पोलीसांनीही मला बरीच मदत केल्याचं’, क्लिफन याने द वीकशी बोलताना सांगितलं.

अजूनही ‘प्रवास’ बाकी…

आपल्या सायकल प्रवासातील अजून ७०० किलोमीटरचा टप्पा बाकी असल्याचं क्लिफनने सांगितलंय. क्लिफन येत्या आठवड्यात रशिया ते मॉस्को हा उरलेला सायकल प्रवास पूर्ण करणार आहे. मेस्सीला भेटण्याचे स्वप्न उराशी बाळगून एवढा मोठा प्रवास पूर्ण केलेल्या क्लिफनची, खरंच मेस्सीशी भेट होतेय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -