घरदेश-विदेशसंजय राऊत म्हणतात, 'आता गोव्यात भूकंप'; शिवसेनेचं मिशन गोवा!

संजय राऊत म्हणतात, ‘आता गोव्यात भूकंप’; शिवसेनेचं मिशन गोवा!

Subscribe

महाराष्ट्रानंतर आता गोव्यातील भाजप सरकार देखील पाडण्याच्या तयारीत शिवसेना असून त्या दृष्टीने संजय राऊत कामाला लागले आहेत.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत यांनी ‘आता माझी जबाबदारी संपली’, अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा संजय राऊत अॅक्शनमध्ये दिसू लागले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी शिवसेनेचं ‘मिशन गोवा’ सुरू केलं आहे. गोव्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या सरकारला खाली खेचण्याची रणनीती शिवसेनेने आखली असून त्यासाठी संजय राऊत नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. यासंदर्भात त्यांनीच पत्रकारांसमोर खुलासा केला असून, ‘गोव्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल’, असं विधान त्यांनी केलं आहे.

‘गोव्यात भूकंप होणार’

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांनी शिवसेनेकडून चाणक्याची भूमिका निभावली. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना गोव्यात देखील नव्या आघाडीची स्थापना करण्याच्या तयारीत आहे. ‘गोव्यात नक्कीच भूकंप होईल. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ३ आमदार आमच्या संपर्कात आहेत. विजय सरदेसाई त्यांच्या आमदारांसोबत इथे हजर आहेत. त्यांच्यासोबत आघाडी करून शिवसेना एक नवीन फ्रंट करत आहे. लवकरच गोव्यात आम्ही नवीन सरकार बनवणार आहोत. गोवा सरकारला पाठिंबा देणारे इतर काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. सुधीर ढवळीकरांसोबत आमचं बोलणं झालं आहे.’, असं राऊत यावेळी म्हणाले. त्यामुळे भाजपमधल्या धुरीणांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील.

- Advertisement -

हेही वाचा – पदांच्या वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद?

‘देशभरात नॉन-बीजेपी फ्रंट सुरू करणार’

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी गोव्यातल्या भाजपच्या नेतृत्वातील प्रमोद सावंत सरकारवर टीका केली. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. ‘अनैतिक पायावर उभं असलेलं गोव्यातलं सरकार आहे. लवकरच गोव्यात फार मोठी हालचाल झालेली दिसेल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ज्या पद्धतीने सरकार बनवलं, महाराष्ट्रात आमच्याकडे बोट दाखवतात की आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो. पण काँग्रेसचे ते सगळे लोकं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, त्यांच्यासोबत त्यांनी सरकार बनवलं आहे’, असं राऊत यावेळी म्हणाले. तसेच, ‘आता पूर्ण देशात ही हालचाल दिसेल. महाराष्ट्र झाल्यावर गोवा, गोव्यानंतर बाहेर जाऊ. देशभरात नॉन बीजेपीची एक वेगळी फ्रंट आम्ही सुरू करणार आहोत’, असं देखील राऊतांनी यावेळी सांगितलं.

गोव्यात भाजपचं जुगाडू सरकार!

गोव्यात भाजपने बहुमत काँग्रेसकडे असतानाही काँग्रेसच्या दोन आमदारांना फोडून भाजपमध्ये घेतलं आणि त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यायला लावली. या जोरावर गोव्यात सरकार देखील स्थापन केलं. या पार्श्वभूमीवर गोव्यात महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या आमदारांच्या पाठिंब्यावर काँग्रेससोबत मिळून आघाडी करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. त्यासाठी सरकारला पाठिंबा देणारे काही आमदार काँग्रेसकडे वळवून गोव्यातील भाजपचं सरकार पाडण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या मार्फत शिवसेना करू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -