घरमहाराष्ट्रराज्याचा अर्थसंकल्प म्हणजे 'कर्ज काढून सण साजरा' - जयंत पाटील

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे ‘कर्ज काढून सण साजरा’ – जयंत पाटील

Subscribe

माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत राज्य सरकारवर आणि सरकारी विकास योजनांवर खरपूस टीका केली. तसेच, त्यासोबतच काही महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

‘पावसाळी अधिवेशनात फडणवीस सरकारने या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प मांडला. मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर हा अर्थसंकल्प मांडला आहे. ‘कर्ज काढून सण साजरा करू नये’ असे आपल्याकडे म्हणतात. मात्र निवडणुकीचा सण साजरा करण्यासाठी आमच्या सरकारने कर्ज काढायचे ठरवले आहे. एक दोन नव्हे तर या ग्रेट सरकारने २० हजार २९२ कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. एवढ्या मोठ्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल सुधीरभाऊ, तुम्ही तुमच्या सगळ्या आमदारांना पार्टी दिली पाहिजे. राज्याचं सगळ्यात जास्त वाटोळं करणारा निर्णय तुम्ही घेतला’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली.

५ वर्षांत किती नोकऱ्या निर्माण केल्या?

अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या दरम्यान जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘भाजपने आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. पण एकाही गोष्टीला स्पर्श देखील केला नाही. गेल्या पाच वर्षांत किती नवीन सरकारी-खासगी नोकऱ्या निर्माण झाल्या? नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या किती तरुण-तरुणींना नोकऱ्या लागल्या? गेल्या पाच वर्षांत पेट्रोल डिझेलचे दर का कमी झाले नाहीत? गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात किती नवीन उद्योग उभे राहून ते सुरु झाले? गेल्या पाच वर्षांत महागाई का कमी झाली नाही?’ असे अनेक प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केले.

- Advertisement -

निवडणुकांच्या तोंडावर रोजगार निर्मिती कार्यक्रम

‘प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आणि स्टार्टअप इंडिया योजनेतून सरकार रोजगार निर्माण करणार होते. राज्यात गुंतवणूक आणली जाणार होती. मात्र हे सगळं काही फेल झाल्यामुळे सरकारला आता ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ निवडणुकांच्या तोंडावर सुचतो आहे. आमचे आधीचे कार्यक्रम फेल झाले, हे सांगण्याचे धाडस सरकारमध्ये नाही. हे तुम्ही मान्य करा’, असे आव्हान जयंत पाटील यांनी सरकारला दिले. ‘जर राज्याची रोजगाराची स्थिती चांगली आहे, असा सरकारचा दावा असेल, तर मंत्रालयातील वेटरच्या १३ जागांसाठी पाच हजार अर्ज कसे आले?’ असाही प्रश्न सरकारला सभागृहात विचारला.


हेही वाचा – पाहा जयंत पाटलांचं विधानसभेतच झिंग झिंग झिंगाट!

..तर २० हजार गावांमध्ये दुष्काळ कसा?

‘दुष्काळ कसा हाताळू नये याचा वस्तुपाठ या सरकारने सगळ्यांना घालून दिलेला आहे. राज्य दुष्काळामध्ये होरपळत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री राज्याचा विरोधी पक्षनेता फोडण्यात मग्न होते’, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. ‘अर्थमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले कि १८ हजार ६४९ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली आहेत. जर १८ हजार गावांत जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली असतील, तर मग आज राज्यात पंधरा ते पंचवीस हजार गावांमध्ये दुष्काळ का आहे?’ असा सवालही पाटील यांनी विचारला.

- Advertisement -

तुम्ही शेतकऱ्यांना जगवायला आलात की मारायला?

‘सरकार सर्व योजना श्रीमंतांसाठी करत आहे. ट्रॅक्टर, शेती अवजारे, फवारणी यंत्रे, शेततळे आच्छादन यांच्यावरचा GST पाच टक्यांनी कमी करण्याची गरज आहे. सध्याचा जीएसटी पाहता तुम्ही शेतकऱ्यांना जगवायला आहात की मारायला आलात तेच कळत नाही’, अशी शंकाही जयंतराव पाटील यांनी उपस्थित केली. ‘सत्ताधाऱ्यांनी राज्याचा कृषी विकासदर दोन आकडी करणार असल्याच्या बाता मारल्या होत्या. मात्र आज राज्याचा कृषी विकासदर ०.८ इतका आहे. विकासदर किमान एक आकडी तरी करा’, अशी मागणी जयंतराव पाटील यांनी केली.

दोन वर्षांत ३३ हजार बालकांचा मृत्यू

‘दर महिना १ लाख ५२ हजार महिलांना आठवड्यातून सहा वेळा चौरस आहार देण्यात येतो आणि ८. ३७ लाख बालकांना आठवड्यातून चार वेळा अंडी, केळी, पोषण आहाराअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जर हे सत्य असेल तर मग २०१७- १८ आणि १८-१९ मध्ये या राज्यात ३३ हजार ६०१ बालकांचा मृत्यू कसा झाला? तुमची एवढी चांगली योजना जर असेल तर इतके बालमृत्यू कसे आणि का होतात?’ असा संतप्त सवाल जयंत पाटील यांनी सरकारला विचारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -