घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचं ‘अपना घर’ एका क्षणात पोरकं करून गेलं

नाशिकचं ‘अपना घर’ एका क्षणात पोरकं करून गेलं

Subscribe

लहानग्यांची तयारी, स्वयंपाक, धुणी-भांडी अशी रोजची आवराआवर सुरू असताना दुर्घटनेच्या रुपाने मृत्यूने झडप घातली अन् हा काळ लहानग्यांना पोरके करून गेला. मुलांचे हट्ट पुरवणं असो की गावाकडे परतून स्वतःच्या घराचं स्वप्न साकारणं... हे सारं अधुरं राहिल्याचं चित्र अपना घरमधील दुर्घटनेप्रसंगी दिसून आलं. अपना घरमधील या दुर्घटनेने पोटापाण्यासाठी घरापासून कोसो दूर नाशिकमध्ये आलेल्या चारही कुटुंबांना पोरकं केलं.

सम्राट ग्रुपच्या अपना घर प्रकल्पातील दुर्घटनेत चार बांधकाम मजुरांचा बळी गेल्यानंतर आता या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जातो आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी उभारलेली पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असल्याने तिची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी येथील मजुरांनी व्यवस्थापक व मालकाकडे तक्रारीही केल्या होत्या. तसेच, आंदोलनदेखील केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती.

चार मुलांचे छत्र हरपले

मजहर शेख व बेबी खातून या दोघांना तीन मुले व एक मुलगी आहे. ही मुले २ ते ५ वर्षांची आहेत. बेबी खातून सकाळी पत्र्याच्या शेडमधून कपडे धुण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ आल्या होत्या, तर पती मजहर शेख आंघोळीसाठी आले होते आणि अचानक पाण्याची टाकी कोसळली. टाकीचा काही भाग बेबीच्या अंगावर कोसळला, तर दुसरा भाग मजहर यांच्या पायावर पडला. ते मदतीसाठी याचना करू लागले. इतर कामगार तातडीने धावून आले. कामगारांनी जेसीबीच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करत टाकीचा कोसळलेला भाग बाजूला केला. सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचाराआधीच बेबी यांचा मृत्यू झाला. जखमी मजहरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर तो निःशब्द झाला.

- Advertisement -

बच्चों को खाना खिलाओ

जिल्हा रुग्णालयात मजहर शेखला मित्रांनी वडापाव खायला आणला असता तो रडू लागला. मुझे खाना नहीं चाहिए, खाने का मन नही है। मेरे बच्चों को कुछ तो खाना खिलाओ, ओ सुबहसे भुखे है।, असे बोलत तो रडू लागला. त्यावेळी गृह प्रकल्पाशी संबंधित व्यक्तीने त्याची समजूत काढली. आम्ही मुलांना खायला दिले आहे. मुले सुखरूप असून, भाभी अंगुरी के पास है, असे सांगितले. त्यावेळी तो अंतर्मुख झाला.

तक्रारींकडे दुर्लक्ष

अपना घर प्रकल्पाच्या कामासाठी पश्चिम बंगाल, बिहार, ओडीशा, दिल्ली येथून मजूर कुटुंबियांसह आले आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी आम्ही सर्व राहतो. पाण्याच्या सोयीसाठी जमिनीवर सहा फूट पाण्याची बांधण्यात आली होती. मात्र, टाकीचे कामकाज निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत अनेकवेळा व्यवस्थापक व मालकाकडे तक्रार केली होती. टाकी दुरुस्तीसाठी एक दिवस कामबंद आंदोलनही केले होते. तरीही टाकी दुरुस्त करण्यात आली नाही. – मजहर शेख, जखमी कामगार

- Advertisement -

बिल्डरकडून प्रतिसाद नाहीच

अपना घर गृहप्रकल्पात दुर्घटना घडल्याने रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस यंत्रणा मदतीसाठी तात्काळ धावून आली. सर्वांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. याप्रकरणी प्रकल्पाचे चेअरमन सुजॉय गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ठेकेदाराने या घटनेसंदर्भात कोणालाही माहिती देऊ नका, असे मजुरांना सांगितल्याचे एका मजुरांने सांगितले.

कारवाई केली जाईल

पाण्याच्या टाकीचे बांधकाम विटांमध्ये केल्याचे निदर्शनास आले आहे. बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेचे अधिकारी करतील. टाकीला चारही बाजूने तडा गेल्याचे निदर्शनास आले आहे. टाकीखालील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसले आहे. महापालिकेचा अहवाल आल्यानंतर अपना गृह प्रकल्पाच्या मालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. ठेका कुणाला दिला आहे, त्याच्याकडे परवाना आहे किंवा नाही, याची विचारपूस करून कारवाई केली जाईल. – विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त

सिव्हिलमध्ये धावपळ, कामगार शोकाकूल

जखमी कामगारांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता नातेवाईक, इतर कामगार व अपना घर गृह प्रकल्पाशी संबंधित व्यक्तींनी गर्दी केली. त्यावेळी अब्दुल बारी, बेबी खातून व सुदाम गोहिर यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कामगारांमध्ये शोकाकूल वातावरण झाले.

घटनाक्रम असा…

सकाळी ८.05 – पाण्याची टाकी कोसळली.
सकाळी ८.१५ पाच जण ढिगार्‍याखाली अडकले. जखमी कामगार मजहर शेखची मदतीसाठी हाक.
सकाळी ८.२० जेसीबीने मलबा बाजूला करत पाच जणांना ढिगार्‍याखालून बाहेर काढले.
सकाळी ८.४५ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
सकाळी ९.00 जखमी कामगार उपचारासाठी खासगी रुग्णालयात.
सकाळी ९.१५ आयुक्त गमे, पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी.
सकाळी ९.३० – उपचारादरम्यान अनामी चंदन याचा मृत्यू.
सकाळी ११ – सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी अब्दुल बारी, बेबी खातून, सुदाम गोहिर यांना मृत घोषित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -