घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेनेचे बुथप्रमुख; भाजपचे पन्नाप्रमुख

शिवसेनेचे बुथप्रमुख; भाजपचे पन्नाप्रमुख

Subscribe

जिल्ह्यात युतीकडून निवडणूक तयारीला वेग; स्वतंत्र तयारीचेही संकेत

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आत्मविश्वास दुनावलेल्या भाजप- शिवसेना युतीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. शिवसेना जिल्ह्यात सर्व मतदारसंघांमध्ये निष्ठावान बुथप्रमुख नेमणार आहेत. तसेच भाजपने आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात पन्नाप्रमुख यंत्रणा आणखी सशक्त करण्याची सूचना केली आहे. विधानसभेसाठी युतीत जागा वाटपांचे ठरलेले असतानाही स्वबळावर लढण्याचे हे संकेत तर नाहीत ना, अशी शंका दोन्ही पक्षातील पदाधिकार्‍यांना सतावत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत भाजप- शिवसेनेची युती कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असले तरी जागा वाटपाच्या तिढ्यावरून नाशिक जिल्ह्यातील इच्छुकांमधे चिंतेचे ढग दाटले आहेत. शहरात भाजपचे तीन व ग्रामीणमध्ये एकच आमदार असताना वाढीव जागांची मागणी पुढे करत भाजपने दबावतंत्र सुरू ठेवले आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील 15 मतदारसंघांमध्ये शिवसेना 9 व भाजप सहा जागांवर लढल्यास फारशा अडचणी उद्भवणार नाहीत. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे पक्षातील पदाधिकार्‍यांचा विश्वास दुनावला आहे. या आत्मविश्वासामुळे आता राज्यात एकहाती सत्ता मिळवण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. किंबहुना नाशिक जिल्ह्यात भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना पंधरा मतदारसंघांमध्ये तयारी करण्याचे आदेश देऊन त्यादृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पदाधिकर्‍यांच्या बैठकीत निष्ठावान बुथप्रमुख शोधण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

भाजपच्यादृष्टीने पन्नाप्रमुख ही संकल्पना अत्यंत महत्वाची असून प्रत्येक मतदारसंघात बुथनिहाय सुक्ष्म नियोजनावर त्यांचा भर असतो. पन्नाप्रमुखांमुळे लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपलिकडे यश प्राप्त झाल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक बुथवर त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देत त्यांनी बुथरचना बळकट करण्याचे आदेश पक्षातील पदाधिकार्‍यांना दिले आहेत. तसेच शिवसेनेनेही देखील तयारी सुरू केली असून निष्ठावान कार्यकर्त्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. केवळ पक्षाचा झेंडा मिरवणारे कार्यकर्ते ठेवण्यापेक्षा प्रतिष्ठित व्यक्तींनाच हे पद देऊन त्यांचा पक्षाला फायदा करून घेण्याची सूचना चौधरी यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केली. यावरून दोन्ही पक्षांमध्ये आता कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून कोणत्याही परिस्थितीत हमखास यश मिळणार्‍या जागा न सोडण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे स्वतंत्र लढण्याचे हे संकेत तर नव्हेत ना, अशी शंका दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांना वाटू लागली आहे.

सेनेच्या इच्छुकांना चिंता

नाशिक जिल्ह्यात भाजपकडे शहरातील तीन जागा व चांदवड-देवळा मतदारसंघात आमदार असल्यामुळे या चार जागा सोडल्या, तर उर्वरीत दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. यात कळवण-सुरगाणा आणि मालेगाव मध्य मतदासंघांचा समावेश आहे. मात्र, त्याशिवाय अधिक जागा मिळवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -