घरफिचर्सआमाशयाचा कॅन्सर - आयुर्वेदिक चिकित्सा,सकारात्मक द़ृष्टीकोन फलदायी

आमाशयाचा कॅन्सर – आयुर्वेदिक चिकित्सा,सकारात्मक द़ृष्टीकोन फलदायी

Subscribe

आयुर्वेदीय चिकित्सेचा विचार करता वात - पित्त - कफ या तीनही दोषांची दुष्टी नाशक, रस व मांस धातू तसेच आमाशयाची शुध्दी करणारी, पचनशक्ती सुधारणारी तसेच शरीराचे बल व प्रतिकारशक्ती वाढवणारी कुष्मांडावलेह, च्यवनप्राशासारखी रसायन औषधे आमाशयाच्या कॅन्सरमध्ये लाभदायी ठरतात. रुग्णाचे बल चांगले असल्यास तज्ज्ञ वैद्याच्या देखरेखीखाली बस्तिसारखी पंचकर्म चिकित्साही उपयुक्त ठरते.

ऑक्टोबर २००३ मध्ये ६७ वर्षाच्या पाटील काकांना पोटात दुखू लागले. भूक मंदावली आणि वजन झपाट्याने कमी होऊ लागले. सोनोग्राफी, सी. टी. स्कॅन तपासण्यांमध्ये आमाशयात (जठरात) तसेच यकृतात गाठी आढळून आल्या. तपासण्याअंती आमाशयाचा कॅन्सर व त्याचा यकृतात प्रसर म्हणजेच स्टेज ४ आमाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले. पाटील काकांना टाटा रूग्णालयात केमोथेरॅपीचा सल्ला देण्यात आला. केमोथेरॅपी सुरू करण्यापूर्वी पाटील काकांनी इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोलीच्या मुंबई केंद्रात आयुर्वेदिक चिकित्सा सुरु केली.

परिणामी त्यांना केमोथेरॅपीच्या साईड इफेक्टसची तीव्रता कमी जाणवली. अपेक्षित कालमर्यादेत त्यांनी केमोथेरॅपी पूर्ण केली. पाटील काकांनी पुढेही १५ वर्षे नियमित आयुर्वेदिक चिकित्सा घेणे चालू ठेवले. आज पाटील काका ८३ वर्षाचे आहेत. वयोमानामुळे तब्येतीच्या तुरळक तक्रारी आहेत. परंतु आधुनिक वैद्यक व आयुर्वेद अशा समन्वयात्मक चिकित्सेमुळे २००४ नंतर पाटील काकांना कॅन्सरचा पुनरूद्भव झाला नाही.

- Advertisement -

आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार आमाशयाच्या कॅन्सरचा प्रसर व अवस्थेनुसार शस्त्रकर्म, केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपी या चिकित्सा पध्दतींचा अवलंब केला जातो. या आधुनिक चिकित्सापध्दतींबरोबरच समन्वयात्मक आयुर्वेदिक चिकित्सेने केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपीच्या साईड इफेक्टसची तीव्रता कमी होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारून शरीराचे बल व प्रतिकारशक्ती वाढते.

आयुर्वेदीय चिकित्सेचा विचार करता वात – पित्त – कफ या तीनही दोषांची दुष्टी नाशक, रस व मांस धातू तसेच आमाशयाची शुध्दी करणारी, पचनशक्ती सुधारणारी तसेच शरीराचे बल व प्रतिकारशक्ती वाढवणारी कुष्मांडावलेह, च्यवनप्राशासारखी रसायन औषधे आमाशयाच्या कॅन्सरमध्ये लाभदायी ठरतात. रुग्णाचे बल चांगले असल्यास तज्ज्ञ वैद्याच्या देखरेखीखाली बस्तिसारखी पंचकर्म चिकित्साही उपयुक्त ठरते.

- Advertisement -

आमाशय हा पचनसंस्थेतील महत्त्वाचा अवयव असल्याने पथ्यकर आहाराचा विचार अनिवार्य ठरतो. पचनास हलका व पोषक आहार आमाशयाच्या कॅन्सरमध्ये लाभदायी ठरतो. आमाशयाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांनी पोळी, भाजी, भात असे घन पदार्थ तुलनेने कमी व सूप, सार, वरण, आमटी, दूध, ताक, फळांचे रस, गाईच्या दुधातील खीरी असे द्रव व अल्पघन पदार्थ अधिक घेणे पचनास सुलभ ठरते. सकाळच्या नाश्त्यात शिरा, उपमा, सांजा, मूगाचे – तांदळाचे किंवा एकत्रित डाळांचे लसूण, आले, ओवा, जिरे सैंधव घालून केलेले धिरडे यांचा समावेश करावा.

दुपारच्या जेवणात साजूक तूप लावलेला गव्हाचा फुलका, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, कोमट मऊ भात (तांदूळ भाजून केलेला), मुगाची खिचडी, दुधी – पडवळ – बीट – मुळा -फरसबी – घेवडा यासारख्या वाफवलेल्या व तूप – जिरे – मिरे – धणे – लसूण – हिंग – आले – कांदा – कढीपत्ता यांची फोडणी दिलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा समावेश करावा. चवीसाठी हळद व आवळ्याचे पथ्याचे लोणचे, लिंबाचे गोड लोणचे, लसूण – कारळ – कढीपत्ता – जिरे – धणे – ओवा – पुदिना – कोकम – सैंधव यांची चटणी, मूगाचा भाजलेला पापड घ्यावा. जेवणानंतर गाईच्या दूधाचे गोड, ताजे व लोणी काढलेले पातळ ताक जिरेपूड, कोथिंबीर व सैंधव घालून घ्यावे. उकळून निम्मे आटवलेले पाणी जेवणाच्या मध्ये तहान असेल एवढेच प्यावे. आहाराचे पचन चांगले व्हावे म्हणून जेवणानंतर शतपावली करावी. दुपारी जेवणानंतर झोपणे टाळावे. सायंकाळी साळीच्या लाह्यांचा चिवडा, साळीच्या लाह्यांचे सूप, राजगिरा किंवा साळीच्या लाहया दुधात भिजवून घ्याव्या.

याशिवाय मुगाचा, रव्याचा, राजगि-याचा लाडूही पथ्यकर आहे. फळांमध्ये डाळींब, गोड ताजी द्राक्ष, चिकू, सफरचंद व सुका मेव्यामध्ये अंजीर, काळ्या मनुका, खजूर याचा समावेश करावा. रात्रीचे जेवण रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान करावे. रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. यात मुगाची खिचडी, मूगाचे पीठ लावलेली कढी व भात, मऊ तूप भात, भाज्यांचे सूप व भूक चांगली असल्यास तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी यांचा समावेश असावा. एकावेळी पोटभर आहार घेण्याऐवजी तीन-तीन तासांच्या अंतराने पोटास तडस लागणार नाही एवढा मर्यादित आहार घ्यावा.

मानसिक आरोग्यरक्षणासाठी योग तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम व योगासने तसेच आपल्या आवडीच्या छंदात मन गुंतविणे हितकर ठरते.

थोडक्यात समन्वयात्मक वैद्यकीय चिकित्सा, पथ्यकर आहार – विहाराचे पालन व जीवनविषयक सकारात्मक द़ृष्टीकोन या त्रिसूत्रीने आमाशय कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता व आयुर्मान वाढविण्यास मदत होते.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -