घरफिचर्सगाण्यातली रमणीय ठिकाणं!

गाण्यातली रमणीय ठिकाणं!

Subscribe

एखाद्या गाण्यातली एखादी ओळ ही आपल्याला कधी कधी थबकवायला लावते. एखादी ओळ, एखादा शब्द, एखादा सूर, बासरी-सॅक्सोफोन-संतूर-सतार-गिटार अशासारख्या वाद्यांचा वाजलेला एखादा तुकडा गाणं ऐकता ऐकता आपल्याला मागे वळायला लावतो, गाणं रिवाइन्ड करायला लावतो किंवा गाणं पुन्हा पुन्हा ऐकायला भाग पाडतो. बहुतेक गाण्यात असं एखादं सौंदर्यस्थळ दडलेलं असतं आणि कित्येकदा ते न शोधताही सहज सापडतं.

मुकेशदांचं ‘जाऊ कहाँ बता ए दिल’ ऐकताना आपण त्या गाण्याबरोबर एका नादात पुढे पुढे जात असतो आणि ते गाणं आपण कानात प्राण आणून ऐकत असू तर एक ओळ आपल्या मनाचा ठाव घेतेच, ती ओळ असते-चांदनी आयी घर जलाने. आठवणींच्या चांदण्याही घर म्हणजे काळीज जाळायला बसल्या आहेत, अशा अर्थाची ओळ गाणं ऐकताना आपलंच काळीज कुरतडून जाते. ते गाणं गाताना मुकेशदांनी कागदावर उतरलेले ते शब्द वाचले असतील तेव्हा ते डोळ्यांना दिसलेले शब्द बापुडे केवळ वारा असतील; पण जेव्हा ते मुकेशदांच्या तोंडून गाता गाता उच्चारले जातात तेव्हा त्यातला दर्द आतल्या आत कुठे तरी एक टिचकी मारून हलवून जातात. मुकेशदांच्या अनुनासिक, पण हळव्याहळदिव्या आवाजात ती ओळ कुणाच्या तरी मनातलं दु:ख गडद करून जाते.

एखाद्या गाण्यातली एखादी ओळ ही आपल्याला कधी कधी थबकवायला लावते ती अशी. एखादी ओळ, एखादा शब्द, एखादा सूर, बासरी-सॅक्सोफोन-संतूर-सतार-गिटार अशासारख्या वाद्यांचा वाजलेला एखादा तुकडा गाणं ऐकता ऐकता आपल्याला मागे वळायला लावतो, गाणं रिवाइन्ड करायला लावतो किंवा गाणं पुन्हा पुन्हा ऐकायला भाग पाडतो. बहुतेक गाण्यात असं एखादं सौंदर्यस्थळ दडलेलं असतं आणि कित्येकदा ते न शोधताही सहज सापडतं.स्वरसमा्रज्ञी लता मंगेशकरांनी गायलेली बालकवींची ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे’ ही आनंदाने आकंठ भरलेली कविता घ्या. हृदयनाथ मंगेशकरांच्या उत्फुल्ल संगीतात नटलेलं हे गाणं लता मंगेशकर गात जातात, आपण ऐकत जातो…आणि अचानक ‘वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती’ हा अंतरा ऐकता ऐकता पुढच्या ओळीतले बालकवींंचे शब्द ऐकू येतात – ‘पक्षी मनोहर कुजित रे!’…पक्ष्यांचं कुजन म्हणजे गाणं गायलं जाणं. लता मंगेशकर ‘कुजित’ हा विशिष्ट शब्द असा काही गाऊन जातात की पक्ष्यांचं रानावनात गाणं गायलं जाणं आपल्या डोळ्यांसमोर थेट उभं राहिलं जातं. त्या शब्दात बालकवींना अभिप्रेत असलेला अर्थ त्या जसाच्या तसा त्यांच्या सुरातून आणतात, त्याचा परिणाम असा होतो की गाण्यातला तो शब्द एकदा ऐकून मन भरत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.

- Advertisement -

‘शर्मिली’ सिनेमातलं असंच एक गाणं आहे – मेघा छाये आधी रात, बैरन बन गयी निंदिया. पटदीप रागातलं. सचिनदेव बर्मननी संगीत दिलेलं आणि लता मंगेशकरांनी गायलेलं. या गाण्यात सुरुवातीला संगीताचा एक भलामोठा तुकडा आहे. तो शीघ्र लयीतला आहे आणि त्यातही तो पाश्चिमात्य पध्दतीने वाजत असताना असं वाटतं की आता हे संथ लयीतलं गाणं सुरू कसं होणार? खरंतर तो शीघ्र लयीतला तुकडा यासाठी वाजवण्यात आला आहे की त्यावेळी दोन मोटरगाड्या एकमेकींचा पाठलाग करत आहेत असं पडद्यावर दृश्य आहे आणि अशा पाठलागासाठी संथ लयीतला संगीताचा तुकडा वाजवून चालणार नव्हतं! पण संथ लयीतलं मूळ गाणं म्हणजे त्या गाण्यातले शब्द सुरू करताना आधीच्या तुकड्यातली शीघ्र लय अचानक थांबवून आणि बासरीचे सूर वाजवून जी कलाटणी दिली गेली आहे ती कानावर खरोखरच मोरपीस फिरवणारी आहे. बासरीचे ते सूर खरोखरच वर्णन करण्यापलिकडचे तर आहेतच; पण कितीदा ऐकले तरी मन तृप्त न व्हावं असे आहेत!

याच गाण्यात एक ओळ आहे-हवा लागे शूल जैसी ताना मारे चुनरिया. लता मंगेशकरांनी हे शब्द गाताना आपल्या आवाजातली नजाकत अशी काही दाखवली आहे की चुनरीचं म्हणजे ओढणीचं हवेवर लहरणं स्वरांत दिसून येतं. ताना मारे चुनरिया हे शेवटचे तीन शब्द गाताना ही कमाल आपल्याला सहजपणे दिसते.

- Advertisement -

सुमन कल्याणपुरांनी गायलेलं एक भावगीत आहे-मृदुल करांनी छेडीत तारा, स्मरते रूप हरीचे मीरा. दशरथ पुजारींचं संगीत असलेलं हे गाणं ऐकताना ‘छेडीत’ या शब्दापाशी मन जरा घुटमळत राहतं. कारण या शब्दात खरोखरच तार अलगद छेडल्याचा भास होतो. असंच सुमन कल्याणपुरांचं आणखी एक गाणं आहे ते-दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो, आला आला गं सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला गं सुगंध मातीचा. या गाण्यांला संगीत लाभलं आहे ते अशोक पत्कींचं. यातल्या ‘थेंब’ या शब्दाकडे सूर असा काही रेंगाळला आहे की बराच काळ तारेवर लटकून राहिलेला थेंब हळूच गळल्याचा किंवा टपकल्याचा भास व्हावा!

‘एक लाजरा नं साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला गं’ या गाण्यातली मजा तर काही औरच! यातल्या ‘इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू’ या ओळीनंतर येणारा भोळाभाबडा आणि निरागस ‘का’ जितका मजेशीर आहे तितकंच त्या ‘का’ला ‘बघत्यात’ हे उत्तरसुध्दा धमाल करून जाणारं आहे. गाणं ऐकणार्‍याची कळी फुलवून जाणारं आहे. हे गाणं जिथे जिथे गायलं जाते तिथे ‘बघत्यात’ हे जे उत्तर आहे ते बर्‍याचदा श्रोत्यांकडून कोरसमध्ये उच्चारलं जातं हे या गाण्याचं खास वैशिष्ठ्य आहे.

सुरेश वाडकरांनी गायलेल्या ‘सांझ ढले, गगन तले, हम कितने एकाकी’ या गाण्यातला एक विशेष सांगण्यासारखा आहे. यात ‘निशिगंधा के सूर में कह देगी बात सभी’ अशी एक ओळ आहे. या ओळीतला ‘निशिगंधा’ हा शब्द इतका काव्यात्म उच्चारला आहे की केवळ त्या शब्दासाठी ते गाणं सतत ऐकत राहावं.

…तर सांगायचा मुद्दा हा की गाणं ऐकताना कित्येक गाण्यातली ही छोटी छोटी सौंदर्याची ठिकाणं, बारीक बारीक वैशिष्ठ्ये आपल्याला ऐकता ऐकता हुडकून काढता येतील, खुलवून सांगता येतील. फक्त ती शोधून काढण्याची तयारी हवी, दृष्टी आपोआप येतेच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -