घरक्रीडाभारतात फुटबॉलच्या प्रचार-प्रसाराची गरज

भारतात फुटबॉलच्या प्रचार-प्रसाराची गरज

Subscribe

भारतीय संघ फिफामध्ये कधी सहभागी होणार ते फुटबॉल खेळ भारतात लोकप्रिय व्हावा, म्हणून कोणत्या प्रकारे प्रयत्न करावे लागतील? याचबरोबर यंदाचा विश्वचषक कोणता संघ पटकावेल? अशा प्रश्नांवर भारताचा माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू स्टीवन डायसशी साधलेला संवाद.

फिफा विश्वचषक सुरू आहे, कुठला संघ विश्वचषकाचा दावेदार असू शकेल?

आतापर्यंत सर्वच संघांनी चांगला खेळ केला आहे. यामुळे कोण जिंकू शकेल, हे सांगता येत नाही. बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. जर्मनीसारख्या संघाचा दक्षिण कोरियाने पराभव केला आहे, असे असताना अंदाज लावणे अतिशय कठीण आहे.

२०२२ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा सहभाग असेल का ?

कठीण आहे. २०१८ सुरू आहे. त्यामुळे कालावधी खूप कमी आहे. दुसरे संघ ताकदवान आहेत. त्यांचे फुटबॉल संघटन मजबूत आहे. विविध फुटबॉल स्पर्धांत भारतीय संघाचा यावर्षी झालेला खेळ हा कौतुकास्पद आहे. आपली तयारी पाहता २०२६ च्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ फक्त खेळणारच नाही तर उत्तम यश मिळवेल.

- Advertisement -

भारतामध्ये क्रिकेटएवढा फुटबॉल लोकप्रिय का नाही?

क्रिकेट हा भारताच्या संस्कृतीचा भाग झाला आहे. ब्राझिलमध्ये फुटबॉलशिवाय काही खेळले जात नाही, तसेच भारतात क्रिकेटचे आहे. मी पण खेळाची सुरुवात क्रिकेटपासूनच केली. आपल्या देशात प्रत्येक घरात तिसरा व्यक्ती हा क्रिकेट खेळतो. क्रिकेटएवढी लोकप्रियता फुटबॉलला लगेच मिळणे शक्य नाही.

भारतात फुटबॉलच्या प्रसारासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत?

जसे बीसीसीआय क्रिकेटच्या प्रसारासाठी प्रयत्न करते तसेच फुटबॉल महासंघाने केले पाहिजे. भारतीय संघ पुढील काही वर्षांत विश्वचषकात पात्र ठरला तर नक्कीच लोकप्रियता आजपेक्षा पाचपटीने वाढेल. यासाठी संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे.

- Advertisement -

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीने तुम्ही आम्हाला शिव्या द्या, आमचा अपमान करा पण सामना बघायला या असे ट्विट केले होते, याबद्दल तुझे मत काय?

हो! मी ते ट्विट वाचले होते. मला ते वाचून खूप वाईट वाटले. चाहत्यांना सामना पाहण्यासाठी बोलवावे लागत आहे. हिरो इंटरकाँटिनेंटल कप मुंबईत सुरू आहे, हेच कोणाला माहीत नव्हते. चांगल्याप्रकारे जाहिरात झाली तर भारताचा आंतराष्ट्रीय प्रेक्षक सामना पहायला नक्कीच येईल. सुनिलच्या आवाहनाला मुंबईकरांनी चांगल्याप्रकारे दाद दिली होती. ९० टक्के मैदान प्रेक्षकांनी भरले होते. जे काम सुनिलच्या ट्विटने केले तेच काम मीडियाने केले पाहिजे. कधी, कुठे सामने आहेत हे प्रेक्षकांना सांगितले पाहिजे.

फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्यासाठी काय करता येईल ?

फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्यासाठी योग्य मार्गावर मार्गदर्शन मिळाले पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात या खेळाचा सहभाग करून घेतला पाहिजे. अ‍ॅकॅडमी सुरू झाली पाहिजे. मुलांमध्ये हा खेळ खेळण्याचे गुण असतील तर त्यांना संधी दिली पाहिजे. जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळाडूंचा सहभाग करून घेतला पाहिजे.

फुटबॉलमध्ये करिअर होऊ शकते का ?

नक्कीच होऊ शकते. मी पण फुटबॉलकडे करिअर म्हणून बघितले नव्हते पण माझे झाले. या खेळात करिअर आहे. खेळाडूंनी विचार करावा. आज अनेक संधी फुटबॉलमध्ये उपलब्ध आहेत. आय लीग आहे. मुलांना लहानपणापासूनच फुटबॉलची आवड पाहिजे. ज्याच्याकडे कौशल्य आहे त्याचे करिअर १०० टक्के घडणारच.

आतापर्यंत खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील अविस्मरणीय सामना कोणता ?

तसे तर सगळे सामने अविस्मरणीय आहेत. त्यापैकी मला २ आठवतात. कारण ते दोन्ही सामने पाकिस्तानविरूद्ध होते. त्यामध्ये मी २ गोल केले होते. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची, जिंकण्याची आणि आनंद साजरा करण्याची मजाच वेगळी असते.

तुझा आवडता संघ आणि खेळाडू कोणता ?

माझा आवडता संघ पोर्तुगाल असून ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मी खूप मोठा फॅन आहे. त्याच्या संघाने हा विश्वचषक जिंकावा असे मला वाटते .

या वर्ल्डकपमध्ये अनेक लहान संघांनी बलाढ्य संघांना धूळ चारली आहे. अशीच काही जादू भारतीय संघ जेव्हा विश्वचषकामध्ये पात्र ठरेल तेव्हा करू शकेल का ?

हो नक्कीच. पहिले तर कोणता संघ मोठा किंवा छोटा नसतो. जो संघ जिद्दीने खेळतो त्याला विजय मिळतोच. सगळेच संघ हे खेळत असतात. जीतता वही है जो जितना चाहता है!

युवा फुटबॉलपटूंना काय सांगशील ?

युवा फुटबॉलपटूंनी टूर्नामेंटच्यामागे पळू नये. चांगल्या संघांची निवड करावी. जिथून खेळाची संधी मिळेल तिथे खेळावे. मिझोराम, केरळ आणि गोवा या राज्यांतच का फुटबॉलला जास्त लोकप्रियता आहे? मग मुंबईत का नाही? कारण आय लीगमध्ये दोन वर्षांपासून मुंबईचा संघ सहभागी होत नाही आहे. तसेच डिव्हिजन संघही नाहीत. मुंबईच्या युवा खेळाडूंमध्ये खूप टॅलेन्ट आहे. पण त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपले खेळाडू मुख्य संघात दिसत नाहीत.


अक्षय गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -