घरमुंबई३० सप्टेंबरपर्यंत एकही झाड कापता येणार नाही

३० सप्टेंबरपर्यंत एकही झाड कापता येणार नाही

Subscribe

आरे कारशेडसाठी झाडांच्या कत्तलीला हायकोर्टाची स्थगिती

आरे वसाहतीमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यासाठी झाडे कापण्याला मंगळवारी मुंबई हायकोर्टाने अंतरित स्थगिती दिली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे, तोपर्यंत संबंधित कोणत्याही विभागाकडून या परिसरातील एकही झाड कापू नये, असा आदेश हायकोर्टाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ला दिल्याने आता कारशेडचा विषय पूर्णपणे न्यायप्रविष्ठ बनला आहे.

आरे मेट्रो-कारशेडप्रकरणी हायकोर्टात एकूण ११३ याचिका दाखल झाल्या असून यावर मंगळवारी एकत्रित सुनावणी झाली. आरेमधील २ हजार १८५ झाडे तोडण्यासाठी आणि ४६१ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यासाठी मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयाला पर्यावरण प्रेमी जोरु बथेना यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे.

- Advertisement -

मागील सुनावणीच्या वेळी मुंबई हायकोर्टाने एमएमआरसी आणि मुंबई महापालिका यांना या प्रकरणी शांततेत आंदोलन करणार्‍या पर्यावरण प्रेमींच्या भूमिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी अर्धवट प्रतिज्ञापत्र सादर केले गेल्याने हायकोर्टाने सुनावणी तहकूब केली.

न्यायमूर्ती आरेचा दौरा करणार
आम्ही वैयक्तिकरीत्या आरे परिसराचा दौरा करणार आहोत. यावेळी आरे येथील मेट्रो कारशेडला नक्की विरोधात का आहे, हे पाहणार आहोत. काही वेळा पर्यावरणासारखे गंभीर प्रकरण व्यक्तिश: सत्यता पडताळणे आवश्यक असते, असे मुख्य न्यायमूर्ती नादरजोग म्हणाले.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांचा मेट्रोला पाठिंबा
’आरे’मधील मेट्रो कारशेडवरून वाद सुरू असतानाच हिंदी चित्रपटातील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मात्र मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी एका मित्राचे उदाहरण दिले. ‘माझ्या मित्राने मेडिकल इमर्जन्सीवेळी कारऐवजी मेट्रोचा पर्याय निवडला. मेट्रो सुविधा सोयीस्कर असल्याचे त्याने परतल्यानंतर सांगितले. प्रदूषणाला हा उत्तम पर्याय म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावा, मी माझ्या बगीचामध्ये झाडे लावली आहेत, तुम्ही लावली आहेत का,’ असा सवाल बच्चन यांनी ट्वीटद्वारे केला.

काँग्रेस नेते रमेश यांनी केली उद्धव, आदित्य ठाकरेंची प्रशंसा

आरेमध्ये होऊ घातलेल्या कारशेडला स्थानिक आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून तीव्र विरोध होत असताना आता माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी देखील विरोध केला आहे. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची जयराम रमेश यांनी प्रशंसा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘मेट्रोच्या कारशेडमुळे आरेमधील जीवसृष्टी धोक्यात येणार आहे. पर्यावरणाच्या मुद्यावर फक्त बोलून काही होणार नाही. त्याअनुषंगाने कृती होणे देखील गरजेचे आहे. विकासाला आमचा विरोध नसून होणारा विकास योग्य पद्धतीने आणि नियोजित असायला हवा. पर्यावरण आणि विकास यांच्यामध्ये संतुलन असायला हवे, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनीही आरेच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आरेविषयी घेतलेल्या भूमिकेचे जयराम रमेश यांनी स्वागत केले. पक्ष म्हणून नेहमीच आम्ही शिवसेनेच्या विरोधात लढत आलो आहोत. मात्र, आरे आणि मेट्रो प्रकल्पाविषयी त्यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. ते दोघे प्रकल्पाच्या विरोधात बोलले हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,असे जयराम रमेश यावेळी म्हणाले.

प्रकल्पाच्या नावाखाली चालवलेला विकास हा खरंतर दबावतंत्राचा भाग आहे. यातून पर्यावरणाचा र्‍हासच होणार आहे. देशाचे पंतप्रधान पर्यावरणाची नेहमीच वकिली करत असतात. मात्र भाजपमधल्याच अनेकांनी आम्हाला सांगितले की पर्यावरणाबाबतची आमचीच भूमिका योग्य आहे, फक्त सरकारच्या विरोधी आम्ही काही बोलू शकत नाही, असेही रमेश यावेळी म्हणाले.

आरेच्या जागेवर अनेकांचा डोळा
मुंबई शहराच्या आणि शहरातल्या वातावरणाच्यादृष्टीने आरेचे महत्त्व जास्त आहे. पण आरेच्या जागेवर आज अनेकांचा डोळा आहे. इथे प्रकल्प आणला तर तेथील लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे आरेच्या जंगलामध्ये कारशेड आणून तिथे घुसखोरी करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप रमेश यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -