घरमहाराष्ट्रनाशिकनिफाड ड्रायपोर्ट कागदावरच!

निफाड ड्रायपोर्ट कागदावरच!

Subscribe

विक्रीकर विभाग - जिल्हा बँकेच्या साठमारीत अडकला प्रकल्प

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ड्रायपोर्ट उभारण्याच्या घोषणेला आता दोन वर्षे उलटली असली, तरीही प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही. लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंतमध्ये ड्रायपोर्ट उभारण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच नाशिकमधील सभेत त्यांनी ड्रायपोर्टचा पुनरुच्चार करत हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला आहे. मात्र, विक्रीकर विभाग आणि जिल्हा बँक यांच्यातील साठमारीमुळे प्रकल्पाच्या कामाला मुहूर्त लाभलेला नाही.

आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘निसाका’ भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. अहमदनगरचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साई अ‍ॅग्रो या कंपनीला हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला जाणार आहे. तसेच, कारख्यान्याच्या उर्वरीत 104 एकर जागेवर ड्रायपोर्ट उभारण्यासाठी ’जेएनपीटी’सोबत करारही झाला. ‘निसाका’ची जागा १०५ कोटींना खरेदी करण्याची तयारी ’जेएनपीटी’ने दर्शवली आहे. दुसरीकडे 135 कोटींच्या थकीत कर्जामुळे आठ वर्षांपासून बंद पडलेला ‘निसाका’ जिल्हा बँकेकडे तारण आहे. कारखान्याकडे ‘जेएनपीटी’ला देण्यासाठी १04 एकर जागा शिल्लक असल्याने हा करार होऊन भव्य ड्रायपोर्टचा मानस केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप नेत्यांनी वेळोवेळी व्यक्त केला. दरम्यानच्या काळात बँकेने कर्जवसुलीसाठी तीनवेळा या जागेच्या लिलावाची प्रक्रिया राबवली. मात्र, एवढी रक्कम देऊन कारखान्याची जागा खरेदी करण्यास कुणी धजावले नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेला यश आले नाही. ’जेएनपीटी’ला 104 एकर जागा देवून उर्वरीत जागेवर उभा असलेला कारखाना सुरू झाल्यास जिल्हा बँक कर्जाच्या खाईतून बाहेर पडेल, असा विश्वास अनेकदा व्यक्त झाला. त्यादृष्टीने बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्यातील नेत्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, जेएनपीटी देणार असलेल्या पैशांतून 38 कोटी रुपये विक्रीकर विभागाला तत्काळ हवे आहेत. तर, जिल्हा बँक 105 कोटींवर अडून बसली आहे. यावर तोडगा काढण्याचे अनेकदा प्रयत्न होऊनही ड्रायपोर्टच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही.

- Advertisement -

ड्रायपोर्ट म्हणजे काय?

नवी मुंबई स्थित जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून समुद्रामार्गे मोठ्या कंटेनरमधून जहाजांद्वारे मालवाहतूक केली जाते. निसाका ड्रायपोर्ट येथे या कंटेनरला पार्किंगसाठी जागा, मालाची तपासणी व मार्किंग केले जाईल. निसाका शेजारील कसबे-सुकेणे या रेल्वे स्टेशनवर त्याचे लोडिंग करुन हा माल मुंबईकडे पाठवला जाईल. इतर राज्यातून किंवा शहरांतून आलेले कंटेनर थेट ‘जेएनपीटी’कडे पाठवले जातील. ड्रायपोर्ट म्हणजे कोरड्या जागेवरील पार्किंग असा साधा सरळ अर्थ यातून निघतो.

रोजगार निर्मितीची शक्यता धूसर

ड्रायपोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होइल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, दहाव्या मैलावरील ट्रक टर्मिनल प्रमाणेच कंटनेरसाठी हे टर्मिनल उभारले जाणार आहे. त्यामुळे येथे फार तांत्रिक मनुष्यबळाची गरज भासणार नाही. बोटावर मोजण्या एवढ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल. -राजेंद्र डोखळे, संचालक, निसाका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -