घरताज्या घडामोडीनेस्को मैदान मनसेला उभारी देणार का?

नेस्को मैदान मनसेला उभारी देणार का?

Subscribe

शिवसेनेची कॉपी आणि नेस्कोचे मैदान मनसेला फळणार का? पक्षाला उभारी मिळणार का? हे दिवसांनी दिसून येईलच.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्थापनेपासूनचे पहिले अधिवेशन आज गोरेगाव येथील नेस्को मैदानावर होत आहे. शिवसेनेपासून वेगळे होत मनसेने आपली वेगळी वाट धरली होती. मात्र या वाटेत शिवसेनेतील सहकारी, शिवसेनेची संस्कृती देखील होती. स्थापनेच्या तेरा वर्षानंतर पुन्हा एकदा मनसेने शिवसेनेची कॉपी केली आहे. शिवसेना ज्या पद्धतीने आणि जिथे आपले अधिवेशन घ्यायची, त्याच गोरेगावमधील नेस्को मैदानावर मनसेचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाची पद्धत देखील अगदी तशीच आहे. त्यामुळे षण्मुखानंद, रवींद्र नाट्य मंदीर, यशवंत नाट्य मंदीर याठिकाणी कार्यक्रम घेतल्यानंतर आता नेस्कोचे मैदान तरी मनसेला उभारी देणार का? हे पाहावे लागेल.

शिवसेनेने वर्धापन दिन, पक्षीय बैठका षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्याची प्रथा सुरु केली होती. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून मनसेने देखील त्यांचे कार्यक्रम षण्मुखानंदमध्ये घेतलेले आहेत. २००९ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला थोडेबहुत यश मिळाले. मात्र त्यानंतर मनसेला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यानंतर मनसेने षण्मुखानंद हॉलच्या ऐवजी रवींद्र नाट्य मंदीर मधील पु. ल. देशपांडे सभागृह, माटुंगा येथील यशवंत नाट्य गृह येथे आपले कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. मात्र ज्याप्रकारचे यश एका राजकीय पक्षाला अपेक्षित असते, ते मनसेला मिळालेच नाही. इतर पक्षांमध्ये मेगाभरती सुरु असताना मनसेला मात्र कायम ओहोटीच पाहायला मिळाली.

- Advertisement -

सततच्या अपयशानंतर मनसेच्या कोअर कमिटीमध्ये याबाबत चर्चा झाली. शिवसेना त्यांचे अधिवेशन, गटप्रमुख मेळावा, पदाधिकारी संमेलन हे गोरेगावच्या नेस्को मैदानात गेल्या दहा – बारा वर्षांपासून घेत आली आहे. या वर्षात शिवसेनेची भरभराट झाली. पक्ष दुसऱ्यांदा सत्तेवर आहे तर यावेळी पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झालेले आहेत. आपण आता शिवसेनेची विचारधारा, भगवा झेंडा अंगिकारल्यानंतर शिवसेना स्टाईलनेच अधिवेशन घेण्याचा निर्णय मनसेच्या कोअर कमिटीने घेतल्याची माहिती आपलं महानगरला मिळाली आहे. शिवसेना ज्यापद्धतीने पुर्ण दिवसाचे अधिवेशन घ्यायची, यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, इतर नेत्यांची भाषणे अशा भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असयाची, त्याप्रमाणेच मनसेने देखील आपले आजचे अधिवेशन घेतलेले आहे. आता शिवसेनेची ही कॉपी आणि नेस्कोचे मैदान मनसेला फळणार का? पक्षाला उभारी मिळणार का? हे दिवसांनी दिसून येईलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -