घरताज्या घडामोडीआयुक्तांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येच सहायक आयुक्त व्यस्त

आयुक्तांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येच सहायक आयुक्त व्यस्त

Subscribe

कोरोनावर मात करण्याऐवजी आयुक्तांच्या मागे जातो अधिक वेळ

एका बाजुला मुंबईत ‘कोविड १९’च्या बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरुन युध्दाला सुरुवात झालेली असताना महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त हे विभागाच्या सहायक आयुक्तांना ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ अथवा ‘झुम कॉल’वर खिळवून ठेवत आहेत. त्यामुळे सुमारे चार ते सहा तास आयुक्तांसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जखडून ठेवल्यामुळे प्रत्यक्षात रणांगणात विभागाचे सहायक आयुक्त कोरानोच्या युध्दात सामना करता कमी पडताना दिसत आहेत. त्यामुळे सेनापतींना अडकवून ठेवत आयुक्त कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी वाढवण्याचाच प्रयत्न करतात की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण १४ मार्च रोजी आढळून आला. त्यानंतर ‘कोविड १९’चा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी विभागांच्या सहायक आयुक्तांना उपाययोजना आखण्याच्या सूचना केल्या. परंतु त्यानंतरही मुंबईत शनिवारपर्यंत सुमारे अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वरळी, प्रभादेवी (जी-दक्षिण), भायखळा, माझगाव, नागपाडा (ई विभाग), धारावी, दादर, माहिम (जी-उत्तर), विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम (के-पश्चिम), कुर्ला (एल विभाग), वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व (एच-पूर्व), विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व (के-पूर्व) व गोवंडी, मानखुर्द (एम-पूर्व) या विभागांमध्ये शंभरहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे आणि आता ही संख्या अधिकच झपाट्याने वाढत आहे.

- Advertisement -

मात्र, सुरुवातीला या जागतिक महामारी विरोधात कशाप्रकारे लढायचे याची रणनिती आखण्यात महापालिकेचा वेळ गेला असला तरी आता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरुन लढायची वेळ आहे. प्रत्येक सेकंद आणि मिनिट हे महत्वाचे असताना, महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी हे सर्व विभागीय सहायक आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सवर अथवा झुम कॉलद्वारे संगणकापुढे बसवून ठेवत आहेत. त्यामुळे विभागातील समस्यांकडे सहायक आयुक्तांचे दुर्लक्ष होत आहे. आजच्या घडीला विभागाचा सहायक आयुक्त हा युध्दातील सेनापती आहे. परंतु तासनतास त्यांना आयुक्तांकडून अशाप्रकारे जखडून ठेवले जात असल्याने त्यांना आपल्या विभागातील समस्यांकडे लक्ष देता येत नाही आहे. शिवाय विभागातील सर्व अधिकाऱ्यांनाही यासाठी तिथे बसवून ठेवल्यामुळे सर्वच यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे विभागाची मदार सध्या आरोग्य विभागावरच अवलंबून आहे. परंतु प्रशासकीय बाबी आणि उपाययोजनांमध्ये तसेच रणनिती आखून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात विभागाचे सहायक आयुक्त कमी पडताना दिसतात.


हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांनी घरीच बनवले आकर्षक मास्क!

- Advertisement -

महापालिकेच्या सहायक आयुक्तांना रस्त्यावर उतरुन प्रत्येक आपत्कालिन प्रसंगी कशाप्रकारे काम करायचे याचे चांगले ज्ञान आहे.परंतु आयुक्तांच्या या कार्यपध्दतीमुळे विभागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयश येताना दिसत आहे. महापालिका आयुक्तांनी जर सर्व विभागांसाठी एक एसओपी ठरवून देत त्याप्रमाणे कार्यवाही करायला लावल्यास त्यांची काटेकोर अंमलबजावणी होवू शकते. ही वेळ कार्यालयांमध्ये बसून गप्पा मारण्याची आणि सल्ले घेण्याची नसून आयुक्तांनी कार्यवाहीचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे एसओपी तयार करायला हवी. त्यानुसार अशाप्रकारची एसओपी असल्यास प्रत्येक सहायक आयुक्त काम करू शकतो. त्यामुळे विभागाचे सहायक आयुक्तांवर खुद्द कनिष्ठ कर्मचारी आणि नगरसेवकही नाराज होत आहे. या ‘व्हीसी’ व ‘झुम कॉल’मुळे सहायक आयुक्त नगरसेवकांच्या तसेच आपल्या अधिकाऱ्यांचे फोनही स्वीकारु शकत नाही. परिणामी विभागांमध्ये नगरसेवक,जनता यांच्या रोषाचे धनी सहायक आयुक्तांना व्हावे लागताना दिसत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -