घरताज्या घडामोडीडॉ. झाकिर हुसैन रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाही करोनाचा विळखा

डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाही करोनाचा विळखा

Subscribe

महापालिकेतील नगररचना, विद्युत विभागापाठोपाठ आता रुग्णालय कर्मचारीही बाधित.एक महिला व पुरुष कर्मचार्‍याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; अन्य कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्याची मागणी

नाशिक महापालिकेच्या कर्मचार्‍यांवर आता करोनाने हल्ला करणे सुरु केले असून नगररचना, विद्युत या विभागांपाठोपाठ आता डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील एका महिला व एका पुरुष कर्मचार्‍याचाही करोना रिपोर्ट सोमवारी (दि. २२) रात्री पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एरवी रुग्ण आढळल्यास संबंधित ऑफिसच्या कर्मचार्‍यांना क्वारंटाईन केले जाते. हाच न्याय झाकीर हुसैन रुग्णालयातील कर्मचार्‍यांना लागू व्हावा अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. रुग्णालयातील कर्मचारीच करोनाचे रुग्ण बनले तर या आजाराशी लढा देणार कोण असाही प्रश्न आता निर्माण होत आहे.
महापालिकेतील नगररचना विभागात एका कर्मचार्‍याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेत नगररचना विभागात सर्वाधिक गर्दी असते. त्यात हा कर्मचारी शिपाई असल्याने त्याचा संपर्क या विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांशी आला आहे. त्यामुळे आता नगररचना विभागातील कोण-कोण क्वारंटाईन होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा ‘मलाईदार’ विभाग असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आपण क्वारंटाईन होऊ नये म्हणून काही कर्मचारी देव पाण्यात बुडवून असल्याचे समजते. याशिवाय पश्चिम विभागातील विद्युत विभागातील एक चालक पॉझिटिव्ह आला आहे. या चालकासोबत काम करणार्‍या तिघा कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी मोरवाडी येथील रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा चालक तसेच तेथील एक सिस्टरचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. महापालिकेची मदार ज्या रुग्णालयावर आहे त्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील कर्मचार्‍यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील एका सुरक्षा रक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर एक महिला कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेच्या कुटुंबातील सात सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे कळते. तसेच एक पुरुष कर्मचार्‍याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे करोनाचा विळखा आता या रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाही बसत असल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे अन्य कर्मचार्‍यांनाही क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी होत आहे. हे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोघा कर्मचार्‍यांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे त्यांचीही टेस्ट करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे.

असुविधांच्या गर्तेत कर्मचारी :

डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात स्वत : चा जीव धोक्यात घालून कार्यरत महापालिका, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या कर्मचार्‍यांना पुरेशा सोयी सुविधा देखील मिळत नसल्याचे दिसून येते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षाचा फटका आता कर्मचार्‍यांना बसत आहे. पुरूष कक्षाजवळ डॉक्टर , परिचारीका यांना वेगळी व्यवस्था फार पूर्वी पासून असतांनाच त्याठिकाणी सुरवातीला कोरोनासाठी काम करणार्‍या परिचारीकांना दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या रूम देखिल काढुन घेण्यात आल्या. महिला परिचारीकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना रूम देण्यासंदर्भात सातत्याने महिला व पुरुष परिचारीकांनी पाठपुरावा करुन देखील कुठलेही उपाययोजना न केल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे समुह संसर्गाचा धोका लक्षात घेऊन रूग्णांना सुविधा देण्यात आल्या. परंतु समुहात करोनासाठी काम करणार्‍या परिचारीकांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रारही कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे. याशिवाय तृतीय श्रेणी कर्मचार्‍यांची संख्या अतिशय तुटपूंजी आहे. त्यामुळे रुग्णालयात आरोग्य सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना हे काम करावे लागते. परिणामी या आरोग्यसेवकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

अन्य रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाही आता जबाबदार्‍या द्या :

नाशिक महापालिकेची पूर्णत: मदार डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयावरच आहे. कोणताही विषाणूजन्य आजाराची साथ आल्यास या रुग्णालयाचाच वापर केला जातो. गेल्यावर्षापर्यंत या रुग्णालयात स्वाईन फ्लूचा कक्ष होता. त्यापूर्वी डेंग्यूचा कक्ष स्थापन करण्यात आला होता. परिणामी रुग्णालयातील कर्मचार्‍यांवर सातत्याने कामाचा ताण असतो असे सांगितले जाते. गेल्या तीन महिन्यापासून येथील कर्मचारी अव्याहतपणे काम करीत आहेत. या कर्मचार्‍यांना काही दिवसांसाठी आराम देऊन किंवा इतर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बदल्या करुन अन्य रुग्णालयातील कर्मचार्‍यांना आता झाकीर हुसैन हॉस्पिटलची जबाबदारी द्यावी अशी मागणीही पुढे येत आहे.

आरोग्य सेवा बाजूला, नवीन कर्मचार्‍यांचा उपयोग डाटा एन्ट्रीसाठी:

रुग्णालयात प्रत्येकी २० हजारांचा पगार देऊन नव्याने कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली. मात्र या कर्मचार्‍यांचा उपयोग डाटा एंट्रीसाठी होत आहे. डाटा एन्ट्रीसाठी महापालिकेतील अन्य विभागातील कर्मचार्‍यांचाही उपयोग होऊ शकतो. या नवीन कर्मचार्‍यांना आरोग्य सेवेचीच जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाही करोनाचा विळखा
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -