घरताज्या घडामोडीखडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्रिगटात होणार मोठे फेरबदल

खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्रिगटात होणार मोठे फेरबदल

Subscribe

खडसेंकडे जलसंपदा, जयंत पाटील गृहनिर्माणमंत्री, आव्हाड सामाजिक न्यायमंत्री, धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष

 भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. हे फेरबदल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यात बदल केले जातील. जयंत पाटील यांचे जलसंपदा खाते खडसे यांच्याकडे देण्यात येणार असून जयंत पाटील यांच्यावर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी सोपवण्यात येईल. हे खाते सध्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असून त्यांना सामाजिक न्यायमंत्री पदाचा कारभार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सार्‍या अदलाबदलीमुळे राष्ट्रवादी पक्षाचे महत्त्वाचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार ही उत्सुकता संपवताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

भाजपचे अनुभवी नेते खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस निश्चित होता. मात्र, ते कधी राजीनामा देणार हे ठरत नव्हते. अखेर माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते यांच्या अरेरावी कारभाराला कंटाळून शेवटी खडसे यांनी भाजप पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आता ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील. खरेतर बुधवारी किंवा गुरुवारी प्रवेश करतील असे ठरले होते. मात्र, आपल्या समर्थकांशी बोलून आणि त्यांना विश्वासात घेऊन मगच प्रवेश करतो, असे खडसे यांनी शरद पवार यांना सांगितल्यामुळे शेवटी खडसेंच्या सोयीनुसार प्रवेश कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

आपली सारी राजकीय हयात भाजप पक्ष वाढवण्यासाठी देणार्‍या खडसे यांच्यासारखा नेता पक्ष सोडून येतो म्हटल्यावर त्यांना मानाचे स्थान देणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी गरजेची बाब होती. शरद पवार यांनी ही गोष्ट ध्यानात घेऊन आपल्या वाट्याला असलेल्या खात्यात मोठे फेरबदल करण्याचे ठरवले असून हे करताना पक्ष तर वाढला पाहिजे आणि सध्या ज्यांच्याकडे खाती आहेत त्यांच्या कारभाराचा पंचनामा करत खाती बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपदाबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. मात्र, मंत्रिपदाचा अनुभव असला तरी पक्ष वाढीसाठी जो काही आक्रमक भूमिका घ्यावी लागते ती जयंत पाटील यांच्याकडे दिसत नसल्याने प्रदेशाध्यक्षपद आक्रमक चेहरा असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष सत्तेत असला तरी या निमित्ताने पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत तर त्याचा दूरगामी परिणाम होण्याचा धोका असतो. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना ताकद देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मैदानावर उतरणारा पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांच्याकडे हे पद देण्यात येईल.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रिपद असून सध्या त्यांच्या या खात्याचा कारभार फार वेगाने सुरू असल्याचे बोलले जाते. महत्त्वाच्या फाईली थेट पक्षाच्या प्रमुखांना विश्वासात न घेता थेट मातोश्रीवर जात असल्याचे बोलले जाते. आव्हाड हे शरद पवार यांचे विश्वासू नेते असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फाईलवर स्वाक्षरी करताना आढेवेढे घेताना दिसत नाही. मात्र, काही महत्त्वाच्या फाईल्स परस्पर मातोश्रीवर गेल्याचे सांगितले जाते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आव्हाड यांच्याविषयी नाराजी असल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आव्हाड यांच्यात फार सख्य नाही. ते सत्तेत नसतानाही दिसत नव्हते.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान बडे नेते पक्ष सोडून जात असताना आणि आहेत ते गप्प बसले असताना आव्हाड मुलुख मैदान होऊन भाजपशी दोन हात करत होते. दरम्यान अजित पवार यांनी सत्तेसाठी पक्ष सोडून देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केल्याने पवार यांना आव्हाड यांच्यावरचा विश्वास आणखी वाढला. सत्तेत आल्यानंतर याचा परिणाम होऊन आमदार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांना आव्हाड यांच्या बंगल्यावर बोलावण्यात येऊ लागले. स्वतः आव्हाड हे आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काय चालले आहे, याचा लेखाजोखा घेऊ लागले होते. अजित पवार यांच्या ही गोष्ट लक्षात येत होती. याचबरोबर गृहनिर्माणमधील एकतंत्री कारभार या सार्‍याचा परिणाम होऊन फेरबदलात आव्हाड यांना सामाजिक न्यायमंत्री देऊन बोळवण करण्यात येणार असल्याचे कळते.

उत्तर महाराष्ट्रातील गणिते बदलणार

खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील गणिते बदलणार आहेत. खडसे यांना मानणारा एक मोठा राजकीय गट असून तो भाजपमध्ये गेली अनेक वर्षे खडसे यांच्या बरोबर होता. आता हे खडसे समर्थक राष्ट्रवादीत येणार असल्याने भाजपची ताकद कमी होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा मतदारसंघांमध्ये याचे दूरगामी परिणाम दिसतील. या भागात गिरीश महाजन हे भाजपचे नेते असले तरी अनुभव, संघटक आणि ताकद याचा विचार करता खडसे यांच्या जाण्याने भाजपला खूप मोठा फटका बसणार हे निश्चित.

बिहार निवडणुकीनंतर रक्षा राष्ट्रवादीत

खडसे यांच्या सुन रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्या काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आता लगेच त्या भाजप सोडणार नाहीत. बिहार निवडणुकीनंतर त्या भाजपच्या खासदारपदाचा राजीनामा देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

फडणवीस मुख्य टार्गेट

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांचे मुख्य टार्गेट असतील ते देवेंद्र फडणवीस. फडणवीस यांच्यामुळेच आपल्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला, याचा खडसे यांच्या मनात प्रचंड राग आहे. भाजपला नाही तर फडणवीस यांना कंटाळून ते बाहेर पडले आहेत, ही गोष्ट राष्ट्रवादीला ठाऊक असल्याने भाजपच्या एक नंबरच्या नेत्यावर हल्लाबोल करण्याची जबाबदारी ते खडसेंना देतील आणि स्वतः खडसे ती सोडणार नाहीत. पाच वर्षांचा वनवास संपवताना ते मुलूख मैदान तोफ होऊन फडणवीस आणि भाजपवर बरसतील. जलस्वराज्य योजनेतील भ्रष्टाचाराचे आरोपांच्या माध्यमातून फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी खडसे आपली सारी ताकद वापरतील, असे चित्र दिसत आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -