घरताज्या घडामोडीशेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चांदोरी येथे चक्काजाम

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चांदोरी येथे चक्काजाम

Subscribe

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागच्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. यापार्श्वभुमीवर नाशिक औरंगाबाद महामार्गावरील निफाड येथे चांदोरी चौफुलीवर किसान सभा आणि छावा क्रांतीवीर सेनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कृषी कायदे त्वरित रदद करा या मागणीसाठी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

आंदोलना मध्ये नरेंद्र मोदी, किसान विरोधी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दिल्ली के किसान के सन्मान मे हम उतरे मैदान मे आदि घोषणा देण्यात आल्या. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, शिवाजी राजे मोरे, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत असल्याचा आरोप करण गायकर यांनी केला. सरकारकडून आंदोलनकर्त्यांची दडपशाही करण्यात येत आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकर्‍यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठादेखील खंडित केला जात आहे. काही पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक असल्याचे भासवत पोलिसांच्या मदतीने आंदोलक शेतकर्‍यांवर दगडफेक करत आहेत. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे असा आरोप करत राजू देसले यांनी सरकारच्या या दडपशाहीचा निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

या आंदोलनात शिवा तेलंग, उमेश शिंदे, संतोष माळोदे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, वंदना कोल्हे, जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, आशिष हिरे, किरण बोरसे,उत्तम कापसे, अविनाश गायकर, मनोहर मुसळे, सागर पवार, सुषमा बोरसे, निफाड तालुका अध्यक्ष सतीश नवले, सागर शेजवळ,योगेश पाटील, कुंदन हिरे, अनील भोर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -