घरफिचर्सनातं तुटलेलं

नातं तुटलेलं

Subscribe

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जिव्हाळ्याचं नातं तुटतं तेव्हा आपल्याला होणारी दुःखाची, रागाची, अपराधीपणाची आणि तणावाची भावना नेहमीच मनात टोचत राहते. आपल्याबरोबरच हे का घडलं? ही टोचणी सतत राहते आणि आपण काहीशा नकारात्मकतेच्या भोवर्‍यात अडकत जातो. मनात खोलवर रुजलेलं नातं तुटतं तेव्हा पुन्हा एकदा नव्यानं उभं राहणं ही प्रत्येक माणसासाठी परीक्षा असते.

नातं ही आयुष्यातली सर्वात महत्त्वाची आणि हळवी गोष्ट. आपल्या माणसाबरोबर कायमस्वरूपी जिव्हाळ्याचं, प्रेमाचं नातं टिकून राहावं आणि ते जपलं जावं यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पण बर्‍याच लोकांच्या आयुष्यात अशीही वेळ येते जेव्हा ते नातं तुटतं. काही अंशी हे नातं तुटलेलं दोन्ही व्यक्तींसाठी चांगलं असतं तर काहीवेळा केवळ परिस्थितीच या ताटातुटीचं कारण ठरतं. नातं टिकून राहणं वा नातं तुटणं या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत.अगदी एकलकोंडी राहणारी माणसंदेखील एखाद्या नात्याला धरून असतातच. जगात असा एकही माणूस सापडणार नाही, ज्याचं कोणाशीही कोणत्याही प्रकारचं नातं नाही. पण ही नाती जपताना करायला लागणारी तारेवरची कसरत फारच कमी जणांना जमते. कधीना कधीतरी कोणतं ना कोणतं नातं हे मागे सुटतं आणि तुटतं.

आपल्या आयुष्यात असणार्‍या नात्यांचे बंध तुटताना किती मन:स्ताप होतो, दु:ख होतं, हताश वाटतं आणि तणावग्रस्त वाटतं हे आपल्यापैकी प्रत्येकालाच पुरेपूर माहीत आहे. नातं तुटलं तरीही एकमेकांबरोबर घालवलेले क्षण हे नेहमीच आपल्या मनात जिवंत राहतात. खरं तरं नाती का तुटतात? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच कधीतरी पडतो. बर्‍याचदा नात्याचं स्वरुप नक्की काय आहे? त्यात काय बिनसतं? नात्यांमध्ये कुरबुरी का होतात? दुरावा का निर्माण होतो? दोघांमधील नक्की कोणाचं चुकतं? हे सगळेच प्रश्न फक्त प्रश्नच राहतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रश्न एका वळणावर येऊन हातातून ही उकल निसटत जाते आणि त्यामुळंच हा बंधही तुटतो. काही नाती ही तोंडापुरती उरतात, पण मनोमन त्यातील बंधांची मात्र ताटातूट होते. तर काही नाती ही केवळ उपचारापुरती उरतात. पण काही वेळा तर तो उपचारही राहत नाही. काही नात्यांच्या बाबतीत उरतो तो कागदोपत्री व्यवहार. नाती नक्की तुटतात ती कशामुळे? तर काही नाती गैरसमजातून तुटतात, काही बोलण्यातील धारदार शब्दांमुळं, काही नाती ही न बोलण्यामुळं, तर काही नाती ही लक्ष न दिल्यामुळं तुटतात. नातं तुटत असताना केवळ संबंधित व्यक्तींनाच नाही, तर त्यांच्याशी जोडलेल्या व्यक्तीमध्येही दुरावा आणते.

- Advertisement -

नातं तोडणं नक्कीच कोणालाही आवडत नाही. पण अशी वेळ आलीच तर नातं तोडण्यापूर्वी प्रत्येकानंच आपलं कुठे आणि नक्की काय चुकतं याची उजळणी करणं गरजेचं आहे. नात्याला सुरुवात झाल्यापासून ते तुटत आलेल्या क्षणापर्यंत प्रत्येक क्षणाची उजळणी करावी. जमत असेल तर समोरच्या व्यक्तीला समोर बसून नीट बोलून घ्यावं. त्यातून जर नातं वाचणार असेल आणि टिकणार असेल तर ते तोडण्यापर्यंत नेऊ नये. नात्यात जर काही त्रुटी असतील तर त्याची वेळीच डागडुजी केल्यास जास्त चांगलं. आपल्या नात्यामध्ये नक्की कोणते बदल अपेक्षित आहेत? आपली त्यामध्ये कोणती भूमिका असायला हवी, दोन्ही बाजूनं हे नातं शंभर टक्के सहभाग असणारं आहे का? या सगळ्याची उत्तरं शोधून त्यानंतर हे नातं तुटण्यापासून वाचवण्याची गरज असते. पण सुरुवातीपासून छोट्या मोठ्या कुरबुरींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि याच गोष्टीचं रुपांतर नंतर मोठ्या भांडणांमध्ये होत असतं. या सगळ्यातून बर्‍याचदा नात्यामध्ये इतका उशीर होतो की, मग या नात्यामधून बाहेर पडणं अर्थात नालाईलाजानं बाहेर पडणं गरजेचं होऊन बसतं. कारण अशा तर्‍हेनं हे नातं रेटत राहिल्यास, दोन्ही माणसाचं आयुष्य खराब होऊन जातं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जिव्हाळ्याचं नातं तुटतं तेव्हा आपल्याला होणारी दुःखाची, रागाची, अपराधीपणाची आणि तणावाची भावना नेहमीच मनात टोचत राहते. आपल्याबरोबरच हे का घडलं? ही टोचणी सतत राहते आणि आपण काहीशा नकारात्मकतेच्या भोवर्‍यात अडकत जातो. मनात खोलवर रुजलेलं नातं तुटतं तेव्हा पुन्हा एकदा नव्यानं उभं राहणं ही प्रत्येक माणसासाठी परीक्षा असते. पण हे नातं जपण्यासाठी आपली होणारी कुतरओढ, त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, नातं तुटायला सुरुवात झाल्यापासूनच प्रत्येकाला होत असते. आपण शंभर टक्के आपला सहभाग देत असू, पण समोरची व्यक्ती मात्र आपल्याला कारणंच देत असेल तर असं नातं तोडण्यातच समंजसपणा आहे. कारण, आपण त्या व्यक्तीसाठी सर्व काही करत असतो, पण समोरची व्यक्ती त्याच्या वेळेप्रमाणं, त्याच्या सवडीप्रमाणं हे नातं जपत असते. त्यामुळं एक वेळ अशी येते की, हे नातं तुटलेलं जास्त चांगलं हे आपल्या मनालाही माहीत असतं. असं नातं ओढून ताणून जपण्यापेक्षा एकदाच तोडून टाकलेलं दोन्हीही व्यक्तींच्या भविष्यासाठी चांगलंच असतं. आयुष्यभर हे नातं मनात जपून राहतं. पण कडवटपणा घेऊन नातं सांभाळण्यापेक्षा एका वळणावर असं नातं तुटलेलं चांगलं.

- Advertisement -

‘मला काही फरक पडत नाही’ हा अ‍ॅटीट्यूड तर नात्यांमध्ये कधीच रुजू शकत नाही. कारण असं म्हणून अथवा ऐकवून आपण समोरच्या व्यक्तीला अजून त्रास देत असतो. त्यामुळं अशी दुराग्रही भूमिका टाळून एकमेकांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावाही आणि घ्यावाही. नातं न तुटण्यासाठी जितकं जमतं तितकं करावं. मात्र जर नातं योग्य तर्‍हेनं आयुष्यभर जपता येणार नसेल, तर तुटू द्यावं. जिव्हाळा, प्रेम आणि काळजी असेल तरच नातं टिकून राहू शकतं. अन्यथा, ओढाताण करून नात्याला वाचवण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळं तुटलेलं नातं हे मनाला त्रासदायक असेल, पण आयुष्यभरासाठी हा भार मात्र नक्कीच सहन करावा लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -