घरफिचर्ससारांशमाझा आवडता प्राणी- गाढव!

माझा आवडता प्राणी- गाढव!

Subscribe

प्राणीसृष्टीत वाघ, सिंह, हत्ती, घोडा गेलाबाजार कुत्रा, मांजर असे मात्तबर प्राणी असताना एखाद्याला गाढव का आवडावं? याचं उत्तर दडलंय गाढवाच्या गाढवपणात! हे गाढवपण किंवा हा गाढवपणा आहे मात्र दुधारी तलवारीसारखा... तुमच्यावर उलटूही शकतो...

शीर्षक वाचून गोंधळला असाल ना? गेल्या वेळी कंगना राणावतबद्दल लिहिणारा हा माणूस अचानक गाढवाबद्दल किंवा त्याच्या आवडत्या प्राण्याबद्दल वगैरे कसा काय बोलायला लागला, असा विचार करून अचंबित झाला असाल! काहींनी तर आधी कंगना आणि आता गाढव, यात काही परस्परसंबंध आहेत काय, मी काही स्टेटमेंट करू पाहतो आहे की काय, असाही विचार सुरू केला असेल. पण तसा कोणताही विचार करू नका.

मग तुमचा प्रश्न असेल की, इयत्ता तिसरी किंवा चौथीच्या निबंध किंवा वक्तृत्त्व स्पर्धेचा विषय असलेल्या विषयावर या बाप्या माणसाने का बरं लिहावं? त्याचं काय आहे, की मानसशास्त्रात अनेक प्रयोग केले जातात. त्यापैकी एक म्हणजे तुमच्या आवडत्या प्राण्या-पक्ष्यावरून तुमच्या स्वभावाचे पैलू शोधणं! आता राजकारण्यांना वाघ वगैरे खरंच आवडतात की नाही, ते ठाऊक नाही. पण बर्‍याच राजकारण्यांना नरशार्दुल, अमुक अमुक गावचा वाघ वगैरे संबोधतात. त्यातले किती गुण त्यांच्यात खरोखर असतात, हादेखील संशोधनाचा मुद्दा आहे.

- Advertisement -

तर, ते राहू द्या. मी सांगत होतो, माझ्या आवडत्या प्राण्याबद्दल! मला खात्री आहे, लहानपणी तुमच्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी या विषयावरचा निबंध लिहिला असेल. ‘माझा आवडता प्राणी गाय आहे. गायीला दोन शिंग, एक शेपूट, चार पाय, दोन डोळे असतात. गाय दूध देते,’ वगैरे छापाचे ते निबंध असायचे. आता या अशा छापाच्या निबंधात ओरडा खाण्यासारखं काहीतरी आहे का? नाही ना! पण त्यातही मी ओरडा खाल्ला आहे. ओरड्याचं कारण शुद्धलेखनातल्या चुका हे नव्हतं, तर मला आवडणारा प्राणी, हे होतं.

अनेकांना हत्ती, वाघ, सिंह, चित्ता, घोडा, जिराफ असे मातबर प्राणी आवडतात. बर्‍याच जणांचा जीव कुत्रा, मांजर, ससा अशा प्राण्यांवर असतो. पण माझा आवडता प्राणी आहे गाढव! आता तुम्ही म्हणाल, गाढवात काय आवडण्यासारखं आहे? पण मला सांगा, न आवडण्यासाठी गाढवाने काय घोडं मारलंय? गाढव आवडण्याची अनेक कारणं आहेत.

- Advertisement -

लहानपणी आमच्या घरासमोर एक कचराकुंडी होती. त्या कचर्‍यावर अनेक गाढवं उकिरडा फुंकायला यायची. गाढव या प्राण्याची अशी चित्रमय ओळख होण्याआधीच ‘गाढव कुठला’ अशा प्रेमळ शब्दांनी त्याबद्दलचं कुतुहल वाढलं होतं. आईवडील आपल्याला गाढव म्हणतात, ते हेच, या शोधाने मी त्या प्राण्याकडे अधिकच बारकाईने बघायला लागलो. गाढव दिसायला अतिशय साधं आणि अनाकर्षक असतं. अगदी बावळट म्हटलं, तरी चालेल. उभे कान, फुललेल्या नाकपुड्या, तसेच ओठ, त्यातून सरळच्या सरळ डोकावणारे दोन दात, केसांवर जुन्या चित्रपटांमधल्या अमिताभ बच्चनच्या केसांसारखे केस असा अवतार असतो. पण गाढवाचं पिल्लू बघा! गोंडस, हे एकमेव विशेषण लागू पडतं त्या पिल्लाला.

तर, दिसायला साधं असणारं हे गाढव वागायलाही तसंच साधंसरळ असतं. माझ्या पाहण्यात आलेली 99 टक्के गाढवं अशी साधी सरळच आहेत. ‘आपण बरं आणि आपलं काम बरं’, या पंथातली असतात. पाळलेलं असेल, तर मालकाने जी काही ओझी वाहायला दिली असतील, ती मुकाट वाहायची. मोकळं असेल, तर जो काही उकिरडा समोर येईल, तो मुकाटपणे फुंकायचा! आंब्याची कोय मिळाली, म्हणून आनंद नाही किंवा वर्तमानपत्राचा कागद मिळाला म्हणून खंत नाही! एकाच चवीने रवंथ करत राहायचं. स्थितप्रज्ञ यापेक्षा वेगळा कसा असतो?

गाढवाचा हाच गूण त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. घोडा ऐटदार असला, तरी त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारची मिजास असते. ‘साला, काय मस्त हरभरे खाऊन राह्यलोय बे’ असं काहीतरी तो म्हणेल, असं वाटतं. मांजरांच्या चेहर्‍यावरचे भाव टोकाचे असतात. एक तर तुच्छतादर्शक किंवा अतिप्रेमळ! कुत्रा झोपेत नसला आणि खेळायच्या रंगात असला, तर त्याच्या चेहर्‍यावरचा बिलंदरपणा लपत नाही. वाघ-सिंह वगैरे मातबर प्राणी शिकार चांगली मिळाली की, खाँसाहेब-पंडितजींच्या थाटात आलापी करतात.

गाढव यापैकी काहीच करत नाही. खाण्याच्या बाबतीत जी गोष्ट, तीच ओझी वाहण्याच्या बाबतीतही! पाठीवर दीपिका पदुकोण बसली असो किंवा बांधकामाच्या जागेवरचे दगड, गाढवाच्या लेखी दोन्ही ओझीच असतात. दीपिका बसली म्हणून ते सुखावत नाही किंवा दगड भरले म्हणून खंतावत नाही. वर मालक जेवढा चारा देईल, तेवढा खाऊन शेपूट हलवत इतर गर्दभ बांधवांबरोबर चर्वण करत राहायचं.

याचा अर्थ, त्याला काहीच भावना नसतात, असं नाही. आपल्याला आवडणारी गाढवीण दुसर्‍या गाढवाच्या नादी लागलेली बघून भर रस्त्यात ‘हँ..हूँ…हँ…हूँ’ करत टाहो फोडणारं गाढवही मी बघितलं आहे. थोडी मजा करायची हुक्की आली की, हे गर्दभ महाशय उगाच हवेतल्या हवेत लाथा झाड, बाजूच्या गाढवाला ढुश्या दे, असले प्रकारही करतात. त्या वेळी तर गाढव खूपच गोड वाटतं. घोड्यासारखी ऐट नसली, तरी प्राणी इमानी असतो.

हे असं गाढव मला मध्यमवर्गाचं प्रतीक वाटतं. ऑफिसमध्ये साहेबाने दिलेली सगळी ओझी मुकाटपणे वाहणारा, संध्याकाळी पानात पडेल ते मुकाट खाणारा आणि ट्रेनमध्ये आपल्यासारख्या चारचौघांबरोबर त्याच त्याच विषयांवर बोलणारा मध्यमवर्गीय माणूस हादेखील गाढवासारखाच असतो. गाढवाची आणि माझी नाळ जुळते, ती या बाबतीत!

गाढव असणं हे दुधारी तलवारीसारखं असतं. कोणत्याही विषयावर आपलं मत न देता गर्दीत सामील झालं, तरी चालून जातं. आपल्याला कोणतीही भूमिका नसली, तरी खपून जातं. व. पु. काळ्यांच्या ‘पंतवैद्य’ या कथेतल्या पंतवैद्यांसारखं नामानिराळं राहता येतं. पण दुसरी बाजू हीच की, लोक सतत गाढव म्हणतात आणि तुमचा गाढवपणा चारचौघात काढतात. पण एकदा गाढव व्हायचं, हे ठरवल्यावर त्याचंही काहीच वाटेनासं होतं. ‘ठेविले अनंते, तैसेचि राहावे, चित्ति असू द्यावे समाधान’ या चालीवर सगळं व्यवस्थित चालतं.

तुम्हाला सांगतो, सध्याच्या काळात तर गाढव असणं खूप फायद्याचं आहे. एकदा का गाढव झालो की, आजूबाजूला सुरू असलेल्या अनेक घडामोडींकडे दुर्लक्ष करून आपल्या समोर पडलेला कचरा मुकाटपणे रवंथ करता येतो. वरून जे काही ओझं दिलं जाईल, ते मुकाटपणे वाहण्यातही मजा वाटायला लागते. किंबहुना ते ओझं आहे, याची जाणीवच होत नाही. ‘मालका’विरुद्ध ब्र काढायची हिंमत काय, इच्छाही राहत नाही. सरकारने घाऊक प्रमाणात गाढव या प्राण्याची महती सांगायला सुरुवात करायला हवी. मी तर म्हणतो, हा माझा आवडता असलेला प्राणी लवकरच भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हरकत नाही. बघा पटतं का तुम्हाला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -