घरफिचर्ससारांशभयंकर आनंदाचा दिवस

भयंकर आनंदाचा दिवस

Subscribe

श्याम मनोहरांच्या बहुतांश नाटकांमध्ये त्यांनी मानवी आयुष्याला लगटून असलेल्या संकल्पनांचा उभा आडवा आणि तिरकस छेद घेतलेला दिसून येतो. प्रेम, हिंसा, लोभ, मैत्र, जगण्यातील नैतिकतेचा आग्रह आणि अपेक्षांपासून ते जगण्यात नैतिक आणि अनैतिक असं खरंच काही असतं का, इथपर्यंत या अशा अनेक संकल्पनांचा शोधही त्यांच्या नाटकांची वैशिष्ठ्ये आहेत. मानवी जगण्याला लगटून असलेली अशीच एक संकल्पना म्हणजे ‘अध्यात्म’ होय. त्यांच्या ‘भयंकर आनंदाचा दिवस’ या दोन अंकी नाटकात या संकल्पनेचा उहापोह त्यांनी केला आहे.

मनुष्य स्वभावातील विसंगतींवर नेमकं बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारं लिखाण, असं त्यांच्या लेखनाचं वर्णन केलं जातं. त्यांनी ‘नाटक’ या वाङ्मय प्रकाराची परिभाषाच बदलली, असं म्हटलं जातं. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण पध्दतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव्र जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या लेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ठ्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणार्‍या भाषेतून प्रकट करतात.

मुख्यत: कादंबरीकार म्हणून नावाजलेले तरीही मराठी नाटकाच्या प्रांतात लेखनातल्या वेगळ्या वाटा चोखाळणारे एक महत्वाचे नाटककार म्हणून श्याम मनोहर ओळखले जातात. मोजून आठच नाटकं. त्यातील महत्वाची म्हणजे दर्शन, यळकोट, हृदय, प्रेमाची गोष्ट?, यकृत, प्रियांका आणि दोन चोर. सन्मान हाऊस या नावाचं आणखी एक नाटक त्यांनी लिहिलंय. पण वाचण्यासाठी ते कुठे उपलब्ध झालं नाही. दोनेक वर्षांपूर्वी आमचा मित्र राहुल कुलकर्णी याने त्यांच्या अलीकडचं म्हणावं अशा एका नाटकाचं स्क्रिप्ट आणून दिलं. त्या नाटकाची एक दोन वाचनंही आमच्या मित्रांच्या गोतावळ्यात केली. ते नाटक म्हणजे ‘भयंकर आनंदाचा दिवस’. काही निवडक नाट्यसंस्थांनी अलिकडे या नाटकाचे निवडक प्रयोगसुद्धा केल्याचं आठवतं.

- Advertisement -

श्याम मनोहरांच्या बहुतांश नाटकांमध्ये त्यांनी मानवी आयुष्याला लगटून असलेल्या संकल्पनांचा उभा आडवा आणि तिरकस छेद घेतलेला दिसून येतो. प्रेम, हिंसा, लोभ, मैत्र, जगण्यातील नैतिकतेचा आग्रह आणि अपेक्षांपासून ते जगण्यात नैतिक आणि अनैतिक असं खरंच काही असतं का, इथपर्यंत या अशा अनेक संकल्पनांचा शोधही त्यांच्या नाटकांची वैशिष्ठ्ये आहेत. मानवी जगण्याला लगटून असलेली अशीच एक संकल्पना म्हणजे ‘अध्यात्म’ होय. त्यांच्या ‘भयंकर आनंदाचा दिवस’ या दोन अंकी नाटकात या संकल्पनेचा उहापोह श्याम मनोहर करतात. उहापोह करतात म्हणजे नेमकं काय करतात तर अध्यात्माचे माणसांच्या व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर लावण्यात येणारे अन्वयार्थ आणि त्यांची माणसांगणिक असलेली सापेक्षता नाटकातील पात्रांच्या, त्यांच्या तोंडी असलेल्या संवादांच्या आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रसंगांतून प्रेक्षकांसमोर मांडतात. ही सापेक्षता मांडतांनाही यापूर्वी अनेकदा उपयोग केलेल्या ‘ब्लॅक कॉमेडी’ या शैलीचा त्यांनी पुन्हा एकदा आधार घेतला आहे.

नाटकाचा थोडक्यात परिचय करून घेण्यापूर्वी माझ्या पिढीतील समवयस्कांच्या काळामधल्या एका महत्त्वपूर्ण वळणाचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो. नव्वदच्या दशकाच्या सुरूवातीला आपल्या देशाने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. या धोरणाचा एक परिणाम म्हणून जो नवमध्यमवर्ग तयार झाला, त्या वर्गाकडे कालपरत्वे पैशाचा ओघ आणि संपत्तीचा साठा होत गेला. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या तीन धोरणांची परिणती ‘खाऊजा’ संस्कृती निर्माण होण्यात झाली आणि या संस्कृतीचं एक अपत्य म्हणजे ते ज्याला आपण गेल्या वीसेक वर्षांत ‘चंगळवाद’ या नावाने वरचेवर ऐकत आलो आहोत. नव्याने उदयाला आलेला नवमध्यमवर्ग हा या चंगळवादाचा प्रमुख लक्ष्य आहे आणि त्याचवेळेस तो या ‘खाऊजा’ संस्कृतीचा वाहक सुद्धा आहे.

- Advertisement -

माणसांच्या जगण्यात असलेली आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य त्यांच्या जीवनविषयक मूल्य आणि धारणांवर परिणाम करण्याची क्षमता राखून असते. त्यातूनच पुढे अधिकाधिक मिळवण्याचा सोस होतो. माणसं अधिकाधिक महत्वाकांक्षी होतात. श्याम मनोहर नाटकातील एका पात्राच्या संवादातून म्हणतात तसं, आता जागतिकीकरण आलं आहे. आता कुठल्या चळवळी होणार नाहीत. आता फक्त एकच चळवळ. आर्थिक महासत्ता होण्याची चळवळ ! या महत्वाकांक्षा पूर्ण करताना निर्माण होणारे ताणतणाव सैल करण्यासाठी मग माणसं अध्यात्माकडे वळतात. आता अध्यात्माची कुठली एक अशी बंदिस्त आणि एकमेव व्याख्या सांगता येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे माणसांगणिक असलेल्या सापेक्षतेनुसार ज्याची त्याची अध्यात्माची व्याख्या बदलती असू शकते. या नाटकातील पात्रं ही याच सापेक्षतेचे प्रतिनिधी आहेत.

सुखवस्तूपणातून आणि महत्वाकांक्षेतून निर्माण झालेल्या मानसिक अस्थैर्याची आणि अस्वस्थतेची निरगत लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका कुटुंबाची गोष्ट या नाटकात श्याम मनोहर सांगतात. या अस्वस्थतेवर मात करण्यासाठी आध्यात्मिक होणं गरजेचं आहे, यावर घरातील सगळ्याच सदस्यांचं एकमत आहे. पण आध्यात्मिक होणं म्हणजे काय, याच्या प्रत्येकाच्या आपापल्या कल्पना आहेत. बहुतांशी त्या त्या पात्राच्या नाटकातील व्यवसायाचा परिणाम त्यांच्या आध्यात्मिकतेच्या कल्पनेवर झालेला दिसतो.

कुटुंबातील प्रमुख सदस्य म्हणजे घरमालक दादासाहेब, त्याची बायको रेवती, त्यांची मुलगी सरला, तिचा प्रियकर आणि होणारा नवरा कौस्तुभ, बायकोची मैत्रीण रेखा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण नाटकभर रंगमंचावर प्रसंगानुरूप वावरणा-या चिअरगर्ल्स आणि आध्यात्मिक गुरूजी नारायण महाराज. यांतील नारायण महाराज नाटककार श्याम मनोहरांची आध्यात्मिकतेची कल्पना मांडणारं पात्र आहे, हे नाटक वाचल्यावर वा त्याचा प्रयोग पाहिल्यावर कुणाच्याही लक्षात येईल. त्यांच्या कल्पनेप्रमाणे आध्यात्मिक होणं म्हणजे माणसाने आपला अहं सोडून देणं, अहंकार पुसून टाकणं. आध्यात्मिक होण्यासाठी या कल्पनेवर काम करत ती अंगवळणी पाडून घेणं, यापेक्षा कर्मकठीण साधना दुसरी कुठली असेल?

अशक्य नसली तरी सर्वसामान्य माणसांसाठी तितकीच अवघड असलेली ही साधना टाळण्यासाठी मग नाटकातील पात्रं आपापले मार्ग चोखाळतात. दादासाहेब एक यशस्वी उद्योगपती आहेत. आपल्या व्यवसायातील यश ही नारायण महाराजांचीच कृपा आहे असं समजत त्यांनी खुद्द महाराजांनाच आपल्या घरात आश्रय दिला आहे. त्यांच्या तसबीरी घरात मांडल्या आहेत. आध्यात्मिक प्रवचने देण्यासाठी देश-विदेशात आश्रम बांधायची योजना ते आखत आहेत. त्यांची बायको रेवती सुखवस्तूपणातून आलेल्या अस्वस्थतेने ग्रस्त आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक क्षण ‘एंजॉय’ करत राहण्याचा संकल्प तिने सोडला आहे.

हे क्षण साजरे करण्यासाठी तिने भाड्याने चिअरगर्ल्स मागवल्या आहेत! त्यांची मुलगी सरला राजकारणात करिअर घडवण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. त्यासाठी तिला नारायण महाराजांच्या कृपेची गरज वाटते आणि त्या बदल्यात एखादं सांस्कृतिक प्रतिष्ठान स्थापन करून त्या कृपेतून उतराई व्हायची आध्यात्मिक संकल्पना ती मांडते. रेवतीची मैत्रीण रेखा आपला वेळ जात नाही म्हणून त्या सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या कामासाठी पूर्णवेळ झोकून देत आपली आध्यात्मिक तहान भागवायची इच्छा बोलून दाखवते. सरलाचा प्रियकर कौस्तुभजवळ अध्यात्म या संकल्पनेविषयी स्वत:ची अशी स्पष्टता नाहीय. तो इतर सगळ्यांच्या संकल्पनांतून थोडं थोडं घेत आपली आध्यात्मिक धारणा घडविणारा आणि आपले ईप्सित साध्य करू पाहणार्‍या शेवटपर्यंत गोंधळलेल्या पिढीचा प्रतिनिधी आहे.

नाटककार श्याम मनोहर ज्या आध्यात्मिकतेविषयी बोलतात, ती सहज साध्य करता येत नसल्याने त्यांची पात्रं आपापल्या सोयीची आध्यात्मिकता निर्माण करतात. किंबहुना, लेखक समर्थित (Auther backed) अशा आध्यात्मिकतेच्या व्याख्येला आपल्या अनुरूप वळवून घेत आध्यात्मिक झाल्याच्या भ्रमात आणि भासात जगत राहतात. या भासातूनच त्यांच्या जगण्यात उगवतो तो म्हणजे एक ‘भयंकर आनंदाचा दिवस.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -