घरमहाराष्ट्रभामा-आसखेडचं पाणी पेटलं; बाबा आढाव सामूहिक सत्याग्रह करणार

भामा-आसखेडचं पाणी पेटलं; बाबा आढाव सामूहिक सत्याग्रह करणार

Subscribe

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या लढाईच्या संघर्षात ज्ञानेश्वर गुंजाळ या तरूणाने धरण पात्रात जलसमाधी घेऊन आपले जीवन संपवले होते. संत श्रेष्ठ जगद्गुरु ज्ञानेश्वर माऊंलीच्या भुमीमध्ये ज्ञानेश्वराने जलसमाधी घेतली, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. हे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी वयाचे भान न ठेवता सामूदायिक सत्यागृह उभा करणार असल्याचे कामगार नेते आणि धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी आज धरणग्रस्तांच्या बैठकीत सांगितले. सार्वजनिक खर्चाने ३० वर्षांपूर्वी आमच्या शेतात भामा असखेड धरण बांधले. आमच्या शेतावर साठवलेले आमच्या हक्काचे पाणी तुम्ही पुण्याला विकता. मात्र आमचे पुनर्वसन करत नाहीत. या पाण्यावरती आमचा हक्क कायम ठेवून त्याचा मोबदलाही आम्हालाच मिळाला पाहिजे, अशी भूमिका आढाव यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

 

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरने जलसमाधी घेतली त्याठिकाणीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच ठिकाणी आढाव यांनी बैठक घेतली. ते म्हणाले की, “आमचीच जमीन आम्हाला द्यायला नकार देता. हे काय चालवलंय सरकारने? असा खडा सवाल करत बाबा आढाव म्हणाले की, आत्महत्या झालेल्या ज्ञानेश्वरच्या मुलांना नोकरी, जमीन आणि घर देऊ, अशी आश्वासने देऊन सरकारने पुन्हा फसवणूक करू नये. जोपर्यंत आमच्या हक्काचे पुनर्वसन आमच्या मताप्रमाणे होणार नाही, तोपर्यंत जॅक वेल आणि पाईप लाईनचे काम सुरू करू देणार नाही आणि पुण्याला एक थेंबभर पाणी नेऊ देणार नाही, अशा इशारा आढाव यांनी दिला.

- Advertisement -

आपल्यातला ज्ञानेश्वर गेला त्याच्या चितेच्या अंतकरणातून आपली ज्योत पेटली. त्या ज्योतीने स्पष्टपणे विचार सांगितला पाहिजे. जर सरकारने आपला शब्द पाळला नाही तर काय करायचे? मी तुम्हाला अनुभवाने सांगतो सरकार आश्वासनांची खैरात वाटत आहे. त्यामुळे आंदोलकांनी सावधानतेने वागून पुढचे पाऊल उचलावे, असा सल्ला आढाव यांनी दिला.

माणसाला जमीन नसेल, रोजगाराचे साधन नसेल तर पैसा दोन दिवसांत निघून जातो. आमची जमीन घेऊन तुम्ही पैसे देत असाल तर चुकीचे आहे. त्यामुळे दिलेली आश्वासने न चुकता सरकार आणि आधिकाऱ्यांनी पाळावीत अन्यथा सामुहिक सत्याग्रहाला सामोरे जायला तयार रहा, असा निर्वाणीचा इशारा बाबा आढाव यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -