घरफिचर्समायमहानगर ब्लॉगखरे उद्धव ठाकरे कुठले?

खरे उद्धव ठाकरे कुठले?

Subscribe

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडल्यानंतर एरवी सगळ्या कौटुंबिक कार्यक्रम, क्रिकेट मॅचेस आणि सण-उत्सवांना अंबानींकडे जाणार्‍या उद्धव ठाकरे यांनी 25 फेब्रुवारीनंतर मुकेश अंबानींना किंवा कुटुंबियांना एक साधा फोनही केलेला नाही. तीच गोष्ट स्वर्गीय शिवसेना उपनेते आणि तीन वेळ ठाण्याचे माजी महापौर असलेल्या अनंत तरेंची. कोरोनानंतर बाथरूममध्ये पडल्यावर मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झालेल्या अनंत तरेंच्या कुटुंबीयांनाही उद्धव यांनी साधा फोन केलेला नाही किंवा त्यांची विचारपूसही केली नाही. कोविडकाळात उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करून राज्यातील जनतेला कुटुंबातील सदस्य असल्यासारखं समजावत होते, ते उद्धव ठाकरे खरे की अंबानी-तरे यांच्यावर आलेल्या संकटानंतर त्यांची विचारपूसही न करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खरे?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अल्ट्रा माऊंट रोडवरील अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्यात आल्याच्या घटनेला आज बरोबर एक महिना झालेला आहे. या एका महिन्यात घडलेल्या प्रशासकीय आणि राजकीय घटनांनी राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. पन्नास वर्षं राजकारण करणार्‍या शरद पवारांना चुकीची माहिती देऊन सपशेल तोंडावर पाडण्याचे उद्योग राष्ट्रवादीतच सुरू आहेत. अवतीभवती राजकीय रणकंदन माजलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मूग गिळून गप्प आहेत. ठाकरे यांनी शपथ घेतल्यापासून हे सरकार आज पडेल उद्या पडेल असं म्हणणार्‍या राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी आपली संपूर्ण रणनीती बदलून टाकली. आणि त्या बदललेल्या रणनीतीने सेना-राष्ट्रवादीची पळता भुई थोडी झाली आहे. यात उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. मुख्यमंत्री बनून त्यांनी ती उघडली आणि त्यांच्या मुठीत काहीच नसल्याचं एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. संघटना, सरकार आणि कुटुंब या सगळ्याच पातळीवरून उद्धव ठाकरे पुरते त्रासून गेल्याचं दिसत आहे. आणि तरीही ते शांत आहेत त्या तोंड झाकलेपणाला एक सलाम करावाच लागेल. कदाचित शांत बसण्याचं ऑलिम्पिक झालं तर भारताचं सुवर्णपदक उद्धव यांच्याच गळ्यात असेल.

उद्धव ठाकरे यांना राडा संस्कृती लफडेबाजी, मॅटर वाजवणं, कामं काढणे आणि घेऊन टाकणे या सगळ्या गोष्टींपासूनच नव्हे तर अगदी शब्दप्रयोगापासूनही लांब राहावं असं सतत वाटत असतं. त्यांची प्रकृती तशी नसल्याचंच गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्याबाबतच्या निरीक्षणावरुन आपण सांगू शकतो. पण त्यांची प्रवृत्ती तशी होती का, असा प्रश्न पडावा इतपत गोष्टी हाताबाहेर गेल्याचं महिन्याभरात दिसून आलं. गेल्या 30 दिवसांत तर उद्धव यांच्या सरकारविरोधात वातावरण निर्माण झाल्याचं आमदारांमध्येच बोललं जायला लागलंय. कमालीचा वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे असो किंवा व्यक्तिमत्वानं पांढरपेशा असून प्रशासनात लुडबुडीने घोळ करणारा रश्मी ठाकरेंचा भाचा वरूण सरदेसाई असो किंवा आदित्य ठाकरेंच्या भोवताली पडलेल्या पैसेवाल्यांच्या पोरांच्या गराड्यातली फिल्मीगिरी असो इतकंच काय पण केबल व्यवसाय ते ‘पॉवरप्लेअर’ असा प्रवास करणार्‍या मंत्री अनिल परब यांचा विषय असो प्रत्येक विषयानंच उद्धव ठाकरे यांना धोका दिला आहे. वाझे प्रकरणानंतर तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी अत्यंत निकटवर्तीयांकडे ‘मी वाझेवर खूपच जास्त विश्वास ठेवला. त्याने घात झाला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

- Advertisement -

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेनेचं काय होणार, असा प्रश्न ज्या मंडळींना पडत होता त्यांना मुंबई, महाराष्ट्र आणि दिल्ली या तिन्ही ठिकाणी सत्तेतला सहभागी बनून उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय चाणाक्षपणाची कल्पना दिली होती. पण त्याच उद्धव ठाकरे यांना स्वतःच मुख्यमंत्री होण्याचा मोह आवरता आला नाही आणि तिथेच सगळ्यात मोठा घोळ झाल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ना आमदारांची मतदारसंघातली महत्त्वाकांक्षी विकासाची कामं मार्गी लागली की विधानसभेच्या आधी वेगवेगळ्या पक्षातून ‘इम्पोर्ट’ केलेल्या नेत्यांच्या पदरी काही पडलं. साध्या महामंडळांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत की सत्तेसाठी घाम गाळणार्‍या कार्यकर्त्यांच्या पदरी काही पडलंय असंही दिसत नाहीय. दिवाळी-दसरा आला तो फक्त बांद्य्रात, पार्ल्यात आणि गोरेगावातच. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री असलेल्या एका मंत्र्याचा मुलगा ‘मातोश्री’वर येताना प्रत्येक भेटीत नवी इम्पोर्टेड आलिशान महागडी गाडी घेऊन येतो. ज्येष्ठ मंत्र्यांच्या कारभारातला त्यांच्या मुलाचा सहभाग हा तर अख्ख्या पक्षाला आणि मंत्र्यांनाही एकदिवस ‘उद्योगा’ला लावण्याचं काम करतो की काय अशी परिस्थिती सध्या मंत्रालयापासून थेट कोकणापर्यंत सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकण्याच्या आधी देशमुखांनी अनिल परब यांचा गृहमंत्रालयातला हस्तक्षेप हा जाहीरपणे बोलून दाखवलाय.

इतकंच काय पण मातोश्री ते वर्षा आणि मंत्रालयाचा सहावा मजला या सगळ्या ठिकाणी जळी-स्थळी परिवहन मंत्री अनिल परब हेच दिसत असल्यामुळे सरकार आणि शिवसेनेमध्ये कमालीची नाराजी आहे. जी गोष्ट वरून सरदेसाईंच्या बाबतीत घडली तीच गोष्ट परब यांच्या बाबतीत लवकरच घडेल असं सनदी अधिकार्‍यांच्या वर्तुळात बोललं जातंय. इतकंच नाही तर आदित्य यांना ‘बॉस’ म्हणत मोहरुन टाकत आपल्याला हवी ती ‘दिशा’ गाठणार्‍या वांद्य्राच्या अनेक ‘मोरांचा’ मुंबई पोलीस लवकरच ‘मोरया’ करणार आहेत. आदित्य यांना ‘बॉस’ म्हणत अनेक पैसेवाल्या अमराठी मंडळींनी स्वतःचं उखळं पांढरं करुन घेतलं आहे. आणि त्याची माहिती आदित्य ठाकरे यांच्याभोवती वावरणार्‍यांनीच भाजपच्या मंडळींना दिली आहे. ठाकरे पिता-पुत्रांनी आपल्या निष्ठावंत मंडळींपेक्षा काल-परवा उगवलेल्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळेपण आलेल्या अनेक मंडळींना जी ढिल दिली त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचं आमदार-पदाधिकारी आता उघडपणे बोलू लागलेत. पस्तीस वर्षांची युती असलेल्या भाजपबरोबरच्या वाटाघाटी असो किंवा येणार्‍या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या आधी मुंबई-ठाण्यातील राजकीय पक्ष चाचपणी असो या सगळ्या कामांमध्ये वरुण सरदेसाई यांना विलक्षण महत्त्व देण्यात आलं.

- Advertisement -

रश्मी ठाकरे यांचा भाचा याव्यतिरिक्त कोणतंही ‘पोलिटिकल क् वालिफिकेशन’ नसलेल्या वरूण सरदेसाई यांनी मुंबई महापालिकेसह राज्य सरकारमध्ये जो ‘स्वैर’ वावर सुरू केला आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी सरदेसाईंची लक्तरं फाडली आहेत. वरुण यांचे वडील सतिश सरदेसाई एक सुशिक्षित स्वाभिमानी मराठी व्यावसायिक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी पार्ल्याच्या किल्लावाला कुटुंबियांची प्रापर्टी घेऊन त्यावर ‘संकल्प’ ही इमारत उभारली तिथेच वरुण राहतात, पण त्यांची ऊठबस मिनिटागणिक भाजप नेत्यांना कळत असते. पार्ल्यात अजातशत्रू असणार्‍या या सरदेसाई कुटुंबियांवर वरुणमुळे ज्या गोष्टींचा सामना करावा लागेल त्याचा ‘टिझर’ नितेश राणे यांनी नुकताच सादर केला आहे. पिक्चरची रिळं तर फडणवीस आणि नारायण राणे यांच्याकडे पडून आहेत. हे सगळं आदित्य ठाकरेंच्या ‘काऊंटर’साठी सुरू आहे. कारण ‘अब की बार-151’ वरुन युती तुटली ती आदित्य यांच्यामुळेच. हे भाजप विसरलेली नाही. आदित्य भाजपशी जसं वागलेत तसंच पोलीस अधिकारी परमबीर सिंह हेही गृहमंत्री अमित शहांच्या रडारवर आहेत.

बंगाल निवडणुकीपूर्वी परमबीर सिंह यांच्याकडून गरम मसाला घेऊन बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय फोडणी देण्याचा केंद्रीय भाजपने कार्यक्रम बनवलाय, हे आता फडणवीस यांच्या हालचालींनी स्पष्ट झालंय. नितेश राणेंच्या आरोपानंतर वरूण सरदेसाई रडारवर आले आहेत. हा अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित कुटुंबातून आलेला तरुण आहे. पण त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगताना अवलंबलेली कार्यशैली ही त्यांना आणि ठाकरेंना अत्यंत कठीण परिस्थितीत घेऊन जाण्याचे संकेत गेल्या महिन्याभरातच मिळालेले आहेत. संघटनेतील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांनाही तिशीही न ओलांडलेल्या वरूण सरदेसाईला रिपोर्ट करावा लागतो ही गोष्ट शिवसेनेत अनेकांच्या जिव्हारी लागलेली आहे. मंत्रीपद असताना अनेकांचा पानउतार करणारे दिवाकर रावते आणि रामदास कदम यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्यांच्या अवगुणांमुळे सध्या खूपच अडचणीत सापडले आहेत. या दोन्ही नेत्यांचं शिवसेनेसाठी मोठं आणि भरीव योगदान आहे. पण कसं बोलायचं, कसं वागायचं आणि सत्तेचा कैफ किती चढू द्यायचा याची आचारसंहिता विसरलेल्या रावते-कदम यांना राजकीय विजनवासानं इतकं पछाडून टाकलंय की, दिवाकर रावते यांनी विधान परिषदेतून थेट स्वर्गात जाण्याची भाषा करायला सुरुवात केली आहे. जिथे रावतेंना स्वर्ग खुणावतोय, छगन भुजबळांसारखा नेता साडेतीन वर्षं तुरुंगात जातोय, तिथे वरूण सरदेसाईंसारख्यांचं काय होऊ शकतं, असा प्रश्न पडण्याइतपत परिस्थिती गंभीर आहे.

उध्दव हे शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री. आधीचे पायउतार झाले त्याला निकटवर्तीयच जबाबदार होते. मनोहर जोशींना जावई गिरीश व्यास यांनी घरी बसवलं. तर पुण्याचा बिल्डर रवि कामत नारायण राणेंच्या बदनामीला कारणीभूत ठरला आहे. उध्दव यांच्याबाबतीत ती जबाबदारी घेतलेल्या वरुण सरदेसाई यांना पार्ल्यातून विधानसभा लढवायची आहे आणि मातोश्रीवरील मिलींद नार्वेकरांचा पर्याय व्हायचं आहे. त्यासाठी त्यांना आधी अस्सल पार्लेकर पराग अळवणी यांचा पराभव करावा लागेल. पराग अळवणी हे पार्लेकरांना मनापासून आपले वाटतात. म्हणूनच भाजपच्या दुढ्ढाचार्यांनी नाकारल्यानंतरही अळवणी पत्नीला नगरसेविका बनवतात आणि मग भाजपा उभयतांना पुन्हा पक्षात घेतो. पार्ल्यातच लहानाचा मोठा झालेल्या अळवणी यांना आबालवृद्ध ‘पराग’ या एकेरी उल्लेखाने हाक मारतात आणि तीच अळवणींची ताकद आहे.

अशा अळवणींना हरवण्यासाठी सरदेसाई यांना किती कष्ट करावे लागतील याचा विचारच न केलेला बरा. पार्लेकरांची अळवणींबद्दल आहे तशीच, किंबहुना त्याहूनही छान आपुलकी शिवसेनेतही होती. मात्र ती आपुलकी संपते की काय अशी धोक्याची घंटा स्वतः उद्धव ठाकरे यांनीच वाजवली आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडल्यानंतर एरवी सगळ्या कौटुंबिक कार्यक्रम, क्रिकेट मॅचेस आणि सण-उत्सवांना अंबानींकडे जाणार्‍या उद्धव ठाकरे यांनी 25 फेब्रुवारीनंतर मुकेश अंबानींना किंवा कुटुंबियांना एक साधा फोनही केलेला नाही. तीच गोष्ट स्वर्गीय शिवसेना उपनेते आणि तीन वेळ ठाण्याचे माजी महापौर असलेल्या अनंत तरेंची. कोरोनानंतर बाथरूममध्ये पडल्यावर मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झालेल्या अनंत तरेंच्या कुटुंबीयांनाही उद्धव यांनी साधा फोन केलेला नाही किंवा त्यांची विचारपूसही केली नाही. कोविडकाळात उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करून राज्यातील जनतेला कुटुंबातील सदस्य असल्यासारखं समजावत होते ते उद्धव ठाकरे खरे की अंबानी-तरे यांच्यावर आलेल्या संकटानंतर त्यांची विचारपूसही न करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खरे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -